-->
संपादकीय पान मंगळवार दि. ०५ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
तणावग्रस्त पोलीस
मुंबई पोलिसांच्या इतिहासातली एक काळी घटना नुकतीच झाली. नेहमीप्रमाणे गजबज असणार्‍या वाकोला पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडून स्वत: आत्महत्या केली. शिर्के यांच्या गोळीबारात वायरलेस ऑपरेटर अहिरसुद्धा जखमी झाले. जोशी यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनपेक्षीत अशा झालेल्या या घटनेनंतर वाकोला पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी या धक्यातून सावरले नाहीत. शुक्रवारी रात्री दोनदा बंदोबस्ताच्या ठिकाणी न आढळल्याने रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी शिर्के यांची डायरी नोंद केली होती. मी डयुटीवर हजर होतो असा दावा शिर्के यांनी केला होता. पण तरीही डायरीत नोंद केल्याचा राग आल्याने शनिवारी शिर्के वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. जोशी आणि शिर्के यांच्यात पूर्वीपासून वाद होताच. त्यांच्यात या मुद्दयावरून पुन्हा वाद झाला. साडेआठच्या सुमारास विलास जोशी बाहेर पडण्यासाठी निघाले. गाडी पोलीस ठाण्याच्या दारातच उभी होती. दार उघङून त्यांनी एक पाय गाडीत टाकला तेव्हा संतापलेल्या शिर्के यांनी अचानक येऊन अगदी जवळून आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून जोशी यांच्यावर गोळी झाडली. पहिली गोळी चुकली. तेव्हा दुसरी गोळी थेट कमरेच्यावर मारली. ते पाहून गाडीचा वायरलेस ऑपरेटर बाळासाहेब अहिर मदतीला आला तर त्याच्यावरही शिर्के यांनी गोळी झाडली ती अहिर यांच्या पायाला लागली. यानंतर शिर्के जोशी यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसले आणि डोक्यात गोळी झाडली. अवघ्या काही सेंकदात हे रक्तरंजित नाटय घडले. जोशी आणि अहिर यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिर्के यांना व्ही.एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. जोशी यांच्या किडनीत गोळी रुतल्याने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. अहिर यांच्या पायाला गोळी लागली असून एक शस्त्रक्रिया करून ती गोळी काढण्यात आली. त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. जेथे घटना घडली तेथील सीसीटीव्ही गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. या प्रकरणाचा गुन्हे शाखा तपास करत आहे. शिर्के यांचा मुलगा अभिषेक याने आरोप केला आहे की शिर्के यांना वरिष्ठांकडून सतत त्रास होत होता. २०१२ साली त्यानी २८ दिवसांची आजारपणाची रजा काढली होती. त्याची चौकशी दोन वर्षांनी लावण्यात आली होती. त्यांना सतत दुय्यम दर्जाची कामे दिली जात होती. त्यामुळे ते घरी आल्यावर सतत झालेल्या अपमानाबद्दल आणि त्रासाबद्दल बोलत असायचे. शिर्के यांनी जोशी यांच्यासहीत आधीच्या दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरोधातही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. तर माझ्या आईनेही वरिष्ठांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती, असे अभिषेकने सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून माझे वडिल अधिक तणावात होते. त्यांचा मानसिक छळ व्हायचा असा आरोप अभिषेकने केला आहे. हे प्रकरण पाहता पोलीस दलात कशा प्रकारे खदखद आहे त्याचे दर्शन होते. अर्थातच ही घटना पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करणारी आहे. त्यामुळे यापुढे सरकारला पोलिस दलाला मजबूत करण्यासाठी अने क महत्वपूर्ण पावले उचलावी लागतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पोलिसांना असलेल्या अधिकारांमुळे त्यांना प्रत्येक माणूस हा गुन्हेगारच आहे असे वाटू लागते. मग आपला सहकारी असो किंवा प्रत्यक्ष गुन्हेगार म्हणून अटक झालेला असो. वरिष्ठ पोलिसांनी आपल्या कनिष्ठ सहकार्‍यांशी सौजन्याने वागले पाहिजे. पोलिस हा एक माणूसच आहे, त्याच्या भोवती असलेल्या समस्या समजावून घेऊन त्यावर कशी मात करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता असते. एक तर पोलिस खात्यातील भ्रष्टाचार हा खालपासून वर पर्यंत एखाद्या वाळवीप्रमाणे पसरलेला असल्यामुळे सर्वच जण एकमेकांशी संशयीत नजरेने पाहत असतात. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होतो. पोलीस भ्रष्टाचार करतात त्यामागची जी अनेक कारणे आहेत त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे त्याचे तटपुंजे असलेले वेतन. विदेशात पोलिसांना भरपूर पगार, भत्ते दिले जातात. त्यांनी भ्रष्टाचार करु नये अशी अपेक्षा त्यामागे असते. पोलीसही चांगला पगार असल्यामुळे पैसे खाण्यासाठी सरसावत नाहीत. आपल्याकडे पोलीस हा दुर्लक्षीत घटक ठरला आहे. एक तर कमी पगार, निवासासाठी अपुरी घरे, पोलीसांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यावर कामांचा वाढलेला बोजा यामुळे पोलीस पूर्णपणे कार्यक्षमतेने काम करु शकत नाही. महिला पोलिसांनाही अशाच प्रकारे नोकरी करावी लागते. त्यामुळे घरगुती समस्या उभ्या राहातात. पोलीसांच्या भ्रष्टाचारावर नेहमीच चर्चा होते परंतु त्यांच्यावर असलेल्या ताणाचा किंवा बोज्याचा कुणीच विचार करीत नाही. यातून अनेक समस्या उद्भवतात. पोलीस दल सुसज्ज करण्याअगोदर पोलिसांच्या या प्रश्‍नांची सोडवणूक करावी लागणार आहे. पोलीस तणावग्रस्त राहून कार्यक्षमतेने काम करु शकत नाही. नागरिकांना पोलीस हा आपला मित्र वाटला पाहिजे. पोलिस स्टेशनमध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य माणूस बाचकतो हे आपल्याकडील पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. यावर उपाय म्हणजे आधी पोलिसांचे प्रश्‍न सोडविले गेले पाहिजेत. त्यानंतर त्याला समाजात कसे वागायचे, जनतेशी कसे वागायचे यावर त्यांचे प्रशिक्षण करावे लागेल. नवीन सरकार हे करणार का, असा सवाल आहे.
--------------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel