-->
संपादकीय पान बुधवार दि. ०६ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वादाच्या चक्रव्यूहात आप
विविध वादविवादांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आम आदमी पार्टीचा (आप) ताप आणखी वाढला आहे. आता पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने पक्षनेते कुमार विश्वास यांना आरोपीच्या पिंजर्‍यात खेचले आहे. कुमार यांनी त्यांच्या सोबत अनैतिक संबंधांबाबत पसरलेल्या खोट्या अफवा फेटाळल्या नसल्याने आपली प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आपकडे सत्ता आल्यापासून काही ना काही तरी वादविवाद उपस्थित होऊन हा पक्ष एका चक्रव्यूहात आडकल्यासारखा झाला आहे. कॉंग्रेस आणि भाजपने या मुद्यावरून आपविरुद्ध हल्लाबोल सुरू केला असतानाच आम आदमी पक्ष मात्र विश्वास यांच्या बाजूने उभा राहिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी पोलिसांवर टाकली. हे प्रकरण कसे फसवे आहे याचे वृतांकन काही वाहिन्यांनी केले असले तरी या महिलेचा आरोप दुर्लक्षीत केला जाऊ शकत नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सदर महिलेने अमेठीत विश्वास यांच्यासाठी निवडणूक प्रचार केला होता. त्यानंतर विश्वास यांचे या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप झाला होता; परंतु विश्वास यांनी या आरोपांचे खंडन न केल्याने आपली प्रचंड बदनामी झाली असून खासगी आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी व्यथा तिने मांडली आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. पक्षाच्या रॅलीत शेतकर्‍याची आत्महत्या, कायदेमंत्र्यांची बनावट पदवी, पक्षांतर्गत बंडाळी यामुळे पक्ष बेजार आहे. विश्वास यापूर्वीही महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधानांमुळे अडचणीत आले आहेत. या मुद्यावरून माध्यमांवर आगपाखड करताना माध्यमे भाजपच्या हातची खेळणी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विश्वास यांच्या सांगण्यानुसार कथित महिलेने १५ दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होती; परंतु पोलिसांनी अद्याप यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे तिने कुमार यांना मेल करून आता मी काय करू, अशी विचारणा केली होती. पक्षाच्या कायदेविषयक समितीने तिला पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा सल्ला दिला होता. एकीकडे दिल्लीत या घडामोडी घडत असताना महाराष्ट्रातील आपचे अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. खरे तर महाराष्ट्रात आप नावापुरताच आहे. मागची विधानसभा निवडणूकही आपने लढविण्याचे धारिष्ट्य दाखविले नव्हते. त्याचवेळी राज्यातून आप हद्दपार झाल्यासारखी स्थिती होती. मात्र दिल्लीत आपचा सत्ता आली व महाराष्ट्रात आपच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ जमा होऊ लागले. परंतु त्यातही अनेकांचे वादविविद झाल्याने पक्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. आपची स्थापना भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाल्याने या पक्षाविषयी जनतेच्या मोठ्या अपेक्षा तर होत्याच शिवाय या पक्षाने पारंपारिक राजकारण्यांना बगल देऊन कार्यकर्त्यांची एक नवी फळी तयार केली होती. परंतु आपमध्ये सुरु झालेली धुसफूस पाहता हा पक्ष देशील लोकांच्या अपेक्षाभंगच करणार असे वाटू लागले आहे. अरविंद केजरीवाल हे आपल्या पक्षाला संपविण्यासाठी पत्रकार व प्रसारमाध्यमे कार्यरत असल्याचा आरोप करीत आहेत. अर्थात याच प्रसारमाध्यमांच्याच जीवावर केजरीवाल आणि त्यांचा पक्ष मोठा झाला आहे, हे त्यांनी वसरता कामा नये. पक्षातील कुरबुरी सोडविण्याऐवजी त्याच खापर प्रसारमाध्यमांवर फोडणे चुकीचेच आहे. केजरीवाल हे संधीसाधू आहेत हे अनेकदा जनतेपुढे दिसले आहे. पहिल्यांदा ज्यावेळी पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी आपला आमदार कमी पडत होते त्यावेळी त्यांनी कॉँग्रेसचा पाठिंबा घेतला होता. मात्र याच कॉँग्रेसवर मोठी टिकेची झोड उठवून आपण सत्तेच्या दारापर्यंत पोहोचलो हे केजरीवाल विसरले. त्यानंतर त्यांनी ४९ दिवसात राजीनामा दिला. मात्र नंतर झालेल्या प्रकाराबाबत दिल्लीकरांची नाराजी पाहून त्यांची माफीही मागितली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आपला पाशवी बहुमत मिळाले. खरे तर यानंतर केजरीवाल सर्वांना बरोबर घेऊन जाऊन दिल्लीत एक चांगले सरकार देतील असे वाटले होते. आता मात्र सध्याच्या घडामोडी पाहता त्यांच्या पक्षाकडून साफ निराशा झाली आहे. मागच्या चुकांपासून काही शिकावे हा अरविंद केजरीवाल यांचा स्वभाव नाही असेच दिसते. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा वारू त्यांनी अडविला, या उन्मादात धुंद असलेल्या केजरीवालांचे सगळे राजकारण हे व्यक्तिकेंद्री स्वरूपाचे बनलेले आहे. पर्यायाने आपमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीविषयी पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत बैठका किंवा जाहीर सभांमध्ये बोलणे हेही महापाप बनले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर आपच्या एकखांबी तंबूची सारी मदार टिकून आहे. आप स्थापन झाला तेव्हा स्वप्नाळू डोळ्यांचे अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक या कुंभमेळ्यात सामील झाले होते. विदेशातून त्यांना मोठा आर्थिक निधीही आला. तीनच वर्षांचे वय असलेल्या आपमध्ये लोकशाही संस्कृती अजून पुरेशी रुजलेली नाही. कॉंग्रेस, भाजप या पक्षांपेक्षा आपही फार वेगळा उरलेला नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची आपमधून अरविंद केजरीवालांच्या समर्थकांनी हकालपट्टी केली त्या वेळी या दोघांनी आपमधील सावळ्या गोंधळाचे अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यालाही केजरीवालांनी केराची टोपली दाखविली. याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील नेत्या मेधा पाटकर आपमधून बाहेर पडल्या. दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांची कायद्याची पदवी बनावट आहे, अशा आशयाचे वृत्त झळकल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा संयम आता पुरता सुटला. आता केजरीवाल व त्यांच्या भोवती असलेल्या कोंडाळ्याने आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे अन्यथा ते याच चक्रव्यूहात असेच अडकत जातील.
--------------------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel