-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ०८ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रस्ते की यमदूत?
रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण पाहता हे रस्ते म्हणजे यमदूतच ठरले आहेत. गेल्या वर्षात जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर हजाराहून जास्त प्रवासी मरण पावले. ही आकडेवारी भयानक आहे. रायगड जिल्हातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना रस्ता व मुंबई-गोवा महामार्ग असे मुख्य रस्ते जातात. यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातील एक उत्कृष्ट रस्ता म्हणून ओळखला गेला. या रस्त्यामुळे मुंबई-पुण्याचे अंतर कमी झाले. ही दोन महानगरे जोडल्यासारखी झाली, मात्र या द्रुतगती महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना उपचार तातडीने करता येतील अशी अत्याधुनिक रुग्णालय सेवा नाही. लोकांना वाहानाच्या वेगाचे वेड असते. या वेगामुळेच अनेकदा अपघात होतात. मात्र या द्रुतगती महामार्गावर जी खबरदारी घेतली पाहिजे त्याचा अंदाज येथून प्रवास करणार्‍यांना अजूनही आलेला नाही, ही दुदैवाची बाब म्हटली पाहिजे. अनेकदा या द्रुतगती महामार्गावर जास्त वेगात वाहने गेल्यामुळे प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात जास्त घर्षण झाल्यामुळे टायर फुटण्याचे प्रकार घडतात. वारंवार या संबंधी सूचना देऊनही त्यांचे पालन केले जात नाही. मुंबई-गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळाच ठरला आहे. एक तर या रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक गेल्या दशकात झपाट्याने वाढली. मात्र हा रस्ता तेवढाच राहिला. या रस्त्याला खरे तर महामार्ग म्हणणेच चुकीचे आहे. या रस्त्याचा विस्तार करण्याच्या अनेक वर्षे गप्पाच झाल्या. आता राज्यातील नवीन सरकारनेही तसेच आश्‍वासन दिले आहे. परंतु ते प्रत्यक्षात   कधी उतरेल हे सांगता येत नाही. मात्र तोपर्यंत या रस्त्यावर हजारो लोकांचे प्राण जातच आहेत. रायगड जिल्ह्याचा विचार करता दिवसाला सरासरी चार रस्त्यांवरील अपघात होत असून त्यामध्ये एकाचा मृत्यू होत असतो. तर तीन जण जखमी होतात. अपघातांचे प्रमाण रोखण्याकरीता जिल्हा पोलीस विभाग तसेच वाहतुक विभागामार्फत विविध उपाययोजना तसेच जनजागृतीही करण्यात येते. तरीहि अपघातांची मालीका काही थांबलेली दिसत नाही. जिल्ह्यातल्या अपघातांची नेमकी कारणे कोणती आहेत? जिल्हातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहेत. सरासरी दर सहा व्यक्तीमागे एक वाहन असे प्रमाण आहे. वाहनांची संख्या वाढत असतानाच रस्ते मात्र तितक्या प्रमाणात रुंद झाले नाहीत. वेगाची स्पर्धा, दारुच्या नशेत वाहन चालवणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणे ही सर्वसाधारणपणे अपघाताची कारणे आहेत. याचबरोबर अरुंद पुल, नाले, तुटलेले दुभाजक, वाढलेली झाडे-झुडपे, अरुंद रस्ते, वेडीकवाकडी वळणे, खड्डेमय रस्ते यामुळेही मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात. राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात होत असतात. रायगड जिल्ह्यातून जाणार्‍या तीन राष्ट्रीय महामार्गातील मुंबई-गोवा महामार्गा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग या मार्गांवरुन वाहतूक गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने वाढली. तसेच या मार्गांवर वेगाने वाहन पळविण्याची जणु स्पर्धाच वाहनचालकांमध्ये लागलेली असते. यामुळेच महामार्गांवर जिल्ह्यात होणार्‍या एकूण अपघातांपैकी सुमारे ७० टक्के अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अपघातांबाबत प्रबोधन चालकांमध्ये करण्याची गरज आहे. आपल्याकडे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे वाहतूक नियमांचे पालन न करणे. आपल्यासाठी कायदे नाहीत ते दुसर्‍याने पाळावेत, अशी सर्वसाधारण समजूत वाहन चालकांची झालेली आहे. त्यामुळे एखादा वाहन चालक योग्यरित्या चालत असला तरीही समोरच्या वाहन चालकामुळे त्याचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे सर्वात महत्वाची बाब म्हणजे वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन करणे चुकीचे ठरते. त्याचबरोबर सरकारने यापूर्वी महामार्गावर कॅमेरे बसवून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची घोषणाही अजून प्रत्यक्षात उतरलेली नाही. मुंबई-गोवा महामार्ग सरकारने चार पदरी करावयास हवा होता. पर्यटनांच्या दृष्टीकोनातूनही याला महत्व आहे. मात्र सरकार याचा विचारच करीत नाही. एक तर मुंबई-गोवा महामार्गावर वाढती वाहतूक दुसरीकडे कोकण रेल्वेच्या गाड्याही नियमीत फूल्ल असतात या पार्श्‍वभूमीवर रेल्वेचा दुसरा ट्रॅक टाकणे व महामार्गाचा विस्तार करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच याच मार्गावर सागरी महामार्गाचे काम हे अर्धवटच पडून आहे. हा मार्ग पूर्ण कधी होणार असा प्रश्‍न आहे. सागरी महामार्ग पूर्ण झाल्यास कोकण रेल्वे व मुंबई-गोवा महामार्गावरील भार कमी होण्यास हातभार लागणार आहे. नवीन रस्ते करणे तर सोडाच जुन्या रस्त्यांचे विस्तारही करायला सरकार पुढे येत नाही. एकीकडे सध्याचे रस्ते हे यमदूत ठरलेले असताना रस्त्यावर उपघात झाल्यास तातडीने उपचार करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. रायगड जिल्ह्यात रस्ते अपघात झाला की जखमींना उपचार मिळण्यात अडचण निर्माण होते. जिल्ह्यात आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आहेत. अलिबाग येथे सिव्हिल रुग्णालय आहे. परंतु स्थानिक पातळीवर प्राथमिक उपचार करुन मुंबई-पुण्यातील मोठ्या रुग्णालयात जखीला पाठविण्याकडे डॉक्टरांचा कल जास्त आहे. अलिबाग येथील सिव्हील रुग्णालयात सध्या असलेल्या सुविधा नेमक्या कोणत्या चालू आहेत हा एक संशोधनाचा विषय ठरेल. अपघातग्रस्त रुग्णाचा सिटिस्कॅन करण्यासाठी वडखळ येथे पाठविले जाते. अशा स्थितीत रुग्णावर उपचार होणार कधी असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आपले प्राण गमवावे लागतात. कित्येक वर्षानुवर्षे हे सुरु आहे. अजून हे कितीकाळ चालणार असा सवाल आहे.
------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel