-->
आता चौथा टप्पा

आता चौथा टप्पा

सोमवार दि. 29 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
आता चौथा टप्पा
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. 9 राज्यातील 71 मतदारसंघात आज निवडणूक होईल. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, मावळ या मतदारसंघासह राज्यातील एकूण 17 मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ई.व्ही.एम.मध्ये बंद होईल. रायगड जिल्ह्यातील काही भाग असलेल्या मावळ मतदारसंघातील निवडणूक ही चुरशीची व अनेकांचा लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व राष्ट्रवादीचे तरुण उमेदवार व शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्यात ही लढत होणार आहे. पवार घराण्यातील व्यक्ती मावळमधून निवडणूक लढवित असल्याने या मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. हा चौथ्या टप्प्यानंतर जवळपास अर्धे मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या या लोकशाहीच्या प्रक्रियेत 40 दिवसांत सात टप्प्यांत होणार्‍या निवडणुकांचे व्यवस्थापन करणे ही काही सोपी बाब नाही. यंदाच्या निवडणुकीत 90 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. सुमारे दहा लाख मतदान केंद्रावर मतदान होईल. अमेरिका, युरोप या विकसीत देशांच्या तुलनेत आपले मतदार हे दुपटीने जास्त आहेत. 2014 च्या निवडणुकांच्या वेळी मोदी आणि भाजपच येणार यावर पैजा लावली तरी त्यावर विजयी होण्याची खात्री होती. यावेळी मात्र छातीठोकपणे भाजपाच पुन्हा सत्तेत येईल असे कुणी सांगू शकत नाही. अनेकदा ओपिनियन पोलचे अंदाज हे खोठे ठरतात. अनेकदा हे अंदाज मॅनेज केलेले असताता हे आत अनेकदा सिध्दच झाले आहे. अशा स्थितीत हे अंदाज काही खरे होतीलच असे नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यानुसार भाजपाची मित्र पक्षांची आघाडी 190 जगा मिळवेल असा अंदाज आहे. एक बाब स्पष्ट आहे की, गेल्यावेल पेक्षा कॉँग्रेसची स्थिती चांगलीच सुधारलेली असेल. याचा अर्थ भाजपाला फटका सहन करावा लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिले तर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपला महत्त्वाची हार पत्करावी लागलेली आहे. याच राज्यांत 2014च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि त्यात भाजपला चांगलेच यश मिळाले होते. परंतु यावेळी नेमकी उलटी स्थिती आहे. त्यामुळे भाजपाला तेते फटका सहन करावा लागणार आहे. या राज्यात विधानसभा निवडणुकांचे प्रतिबिंब लोकसभा 2019 मध्ये पडले तर भाजपला महत्त्वाच्या जागा गमावाव्या लागतील. यामुळे एनडीएला बहुमताचा आकडा गाठता येणे अशक्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, 2014 प्रमाणे यंदा मोदी लाट दिसत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेतही मोठी घसरण झालेली आहे, पण मोठ्या शहरात त्यांचे तेवढे समर्थकही आढळतात. मागील निवडणुकीत भाजपने 31 टक्के जागा मतविभागणीने जिंकल्या होत्या. 1999, 2004 आणि 2009 च्या निवडणुकांमध्ये भाजपने 21 टक्के जागा मतविभागणीने जिंकल्या होत्या. झालेली दहा टक्के वाढ भाजपला सत्ता देणारी ठरली. आता हा मतदार पुन्हा भाजपलाच चिकटून राहील काय? का काही मतदार पुन्हा काँग्रेसच्या बाजूला झुकतील? मतदार फिरल्याने 25 दशलक्ष मते जरी फिरली तर जागांमध्ये मोठा फरक पडू शकतो. सर्व 90 कोटी मतदारांचा विचार करता 25 दशलक्ष मते फिरणे काही कठीण नाही. कोणत्याही सत्ताधार्‍यांना आपली सत्ता टिकविणे ही बाब काही सोपी नसते. कारण जनता त्यांनी केलेल्या कामांचा विचार करुन त्यांना मतदान करते. हे पाहता काही गोष्टी भाजपच्या विरोधात गेल्याचे दिसते. अर्थव्यवस्था मंदावणे, ग्रामीण भागाची अधोगती आणि वाढती बेरोजगारी महत्वाचे मुद्दे आहेत. केवळ पुलवामा हल्याचे भांडवल करुन भाजपाला ही निवडणूक जिंकता येणार नाही. त्याउलट काँग्रेसने न्याय योजनेचे जे आश्‍वासन दिले आहे, ते त्या पक्षाला फायद्याचे ठरणार आहे. कॉँग्रेससध्या उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीत किती जास्तीत जास्त पटकाविते हे पहावे लागेल. विरोधी आघाडी भाजपला विशेषत: उत्तर प्रदेशात धक्का देईल असे वाटते. तेलंगानातील के. चंद्रशेखरराव, पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्यापासून ओडिसातील नवीन पटनाटक, महाराष्ट्रात शरद पवार यांच्यापर्यतचा प्रत्येक नेता कमीत कमी सध्यातरी आपल्या बालेकिल्ल्यातील राजकारणात मोदींच्या एकाधिकारशाहीला आव्हान देत आहे. ज्यावेळी त्रिशंकू लोकसभा जन्माला येईल त्यावेळी स्थानिक नेत्यांना पंतप्रधानपदी जाण्याची एक उत्तम संधी उपलब्ध होईल व त्यात शरद पवार हे आघाडीच्या स्थानावर असतील. आज चौथा टप्पा पार पडल्यावर अजून तीन टप्पे शिल्लक आहेत. आता जवळपास अर्धे टप्पे पार पडलेले असताना विविध राजकीय पक्षांना आपल्या भविष्यात किती जागा मिळतील त्याचा अंदाज येऊ लागलेला असेल. हे अंदाज अगदी खरे ठरणारे नसले तरी बहुतांशी निकालाच्या जवळ जाणार असतात. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या भाषणाचा किती प्रभाव जनतेवर पडून मोदी विरोधात किती मतदान होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या राज यांच्या सभेनंतर जो आवाज गुंजत आहे ते पाहता, मोदी विरोधी मतप्रवाह निर्माण करण्यात ते यशस्वी होतील हे दिसते.
----------------------------------------------------------

0 Response to "आता चौथा टप्पा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel