-->
पंतप्रधान कौन?

पंतप्रधान कौन?

मंगळवार दि. 30 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पंतप्रधान कौन?
लोकसभेच्या निवडणुकांचा चौथा टप्पा पार झाला असताना व केवळ तीन टप्पे शिल्लक राहिले असताना देशाचा भावी पंतप्रधान कोण असेल याबाबत चर्चेने वेग घेतला आहे. खरे तर या पदाचे प्रदीर्घ काळ दावेदार असलेले शरद पवार यांनीच या चर्चेला तोंड फोडले आहे. अजूनही भाजपा वगळता कोणताही पक्ष ठामपणाने नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असे म्हणत नाहीत. सध्या छुप्या मार्गाने बाहेर येत असलेल्या निकालाच्या सर्व्हेतून फारसे ठोस काही हाती लागत नाही. खरे तर या सर्व्हेंवर विश्‍वास ठेवणेही कठीण झाले आहे. कारण आपल्याकडे फारच अपवादात्मक परिस्थितीत सर्व्ह्ेंचे निकाल खरे ठरले आहेत. कारण हे सर्व्हे देखील फिक्स केले जात आहेत, हे आता उघड सत्य आहे. गेल्या वेळी मोदींची लाटच होती व ती उघडउघडपणे दिसत होती. त्यामुळे सर्व्हेंचे निकाल खरे ठरले हे म्हणण्यात काहीच अर्थ नव्हता. यावेळी मात्र मोदींची लाट नाही हे स्पष्ट आहे. मात्र असे असताना पंतप्रधान कोण होणार? कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील? असे अनेक प्रश्‍न आता चर्चेत येऊ लागले आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांंनी चंद्राबाबू, ममता, मायावती यांच्यापैकी कुणी पंतप्रधानपदासाठी दावेदार असू शकतात असे म्हटले आहे. शरद पवारांनी यातून आपले नाव वगळले आहे. अर्थात त्यात काही चुकीचे नाही, सध्या त्याची घाई करणे योग्य नाही, हे शरद पवारांसारखे ज्येेष्ठ राजकारणी जाणतात. या पदासाठी वाढत्या वयाचा किंवा शारीरिक कमकुवतपणाचा विचार करता येणार नाही. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या दोन बायपास झालेल्या होत्या व त्यांनी निवृत्ती घेण्याचे मनाशी नक्की केले होते त्यावेळी ते पंतप्रधान झाले आणि त्यांनी अल्पमतातील सरकार पाच वर्षे चांगले चालवून दाखविले. त्यांचे हे उत्तम उदाहरण आहे. तेलंगाणातील के. चंद्रशेखरराव, पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्यापासून ओडिसातील नवीन पटनाटक यांच्यापर्यतचा प्रत्येक नेता कमीत कमी सध्यातरी आपल्या बालेकिल्ल्यात मोदींच्या एकाधिकारशाहीला आव्हान देत आहे. पटनाईक यांची प्रकृती ढासाळतेय या ज्या अफवा पसरल्या होत्या त्यावर त्यांना पूर्ण विराम देण्यासाठी त्यांनी जिममध्ये व्यायाम करीत असलेला व्हिडिओ प्रसारित केला. देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेल्यांपैकी एक असणार्‍या पटनायक यांनी निवडणूक जिंकण्यासाठी गेले काही महिने ओडिसात उन्हातानात पायपीट केली आहे. उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत असेही नाही, परंतु ते ओडिसात लोकप्रिय आहेत, हे मात्र खरे. राजकारणात ते दोन दशकांहून अधिक काळ अजेय आहेत. एकीकडे मोदी, हजारो कोटी रूपये खर्च करून आपली भव्य प्रतिमा उभी करत असताना नवीन पटनायक आपल्या शांत व्यक्तीमत्वातून नवीन मॉडेल उभे करत आहेत. दिग्गज नेते बिजू पटनायक यांचे ते सुपूत्र. 1997 मध्ये बीजू यांच्या निधनाने नवीन यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. दिल्लीतील चमक-धमक सोडून नवीन यांना भुवनेश्‍वरला परतावे लागले. त्यांना अजूनही ओरिया भाषा येत नाही परंतु जनमानसात लोकप्रिय आहेत. तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या देखील तळागाळातून आलेल्या व मार्क्सवादी कम्युनिस्टांना धक्का देत आपली सत्ता पश्‍चिम बंगालात आणणार्‍या एक लढाऊ नेत्या. माकपची 35 वर्षाची सत्ता त्यांनी मोडीत काढली आणि तृममूल कॉँग्रेसला सत्तास्थानी बसविले. आजही त्यांचे कम्युनिस्टांशी हाडवैर आहेच. चंद्राबाबू हे आंध्राप्रदेशचे मुख्यमंत्री हे नेहमीच सत्तेच्या भोवती राहिले आहेत. त्यांनी गेल्या वेळी मोदींना साथ दिली होती, परंतु यावेळी ते त्यांचे पाच वर्षानंतर कट्टर विरोधक झाले आहेत. आंध्रप्रदेशाला विशेष दर्जा देण्याचे आश्‍वासन मोदींनी पाळले नाही हे कारण दाखवून त्यांनी मोदींशी फारकत घेतली. असे म्हटले जाते की, चंद्राबाबूंना बदलते राजकीय समिकरण सर्वात पहिल्यांदा समजते. यावेळी मोदी सत्तेत येणार नाहीत हे त्यांना वर्षापूर्वीच समजले होते आणि त्यानुसार त्यांनी मोदी विरोधात भूमिका घेण्यस सुरुवात केली होती. विरोधकांच्या आघाडीत ते सामिल झाल्यावर त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. चंद्राबाबूंची एक कुशल प्रशासक व धुर्त नेते अशी त्यांची ख्याती आहे. मात्र या सर्व नेत्यांची नावे शरद पवारांनी पुढे केली असली तरीही शरद पवार हेच अंतिमत: पंतप्रधानांच्या स्पर्धेत अग्रभागी राहाणार आहेत, हे नक्की. सर्व पक्षांना एकत्र आणण्याची कुवत पवारांकडे आहे. तसेच सर्व थारातून अगदी उद्योगपतींपासून ते विविध संघटना या पवारांच्या मागे उभे राहू शकतात. तशी ताकद उभे करण्याची क्षमता मायावती, चंद्राबाबू, ममता किंवा पटनायक यांच्यापैकी कुणाकडे नाही, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. जर लोकसभेचे निकाल लागल्यावर त्रिशंकू अवस्ता निर्माण झाली व भाजपा सरकार स्थापनेपासून दूर राहाणार असेल तर शरद पवार हे कॉँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापनेसाठी हालचाली करु शकतात. कॉँग्रेसही अन्य कोणत्या नेत्यांच्या मागे राहाण्यापेक्षा शरद पवारांच्या मागे उभे राहिले हे देखील तेवढेच सत्य आहे. अर्थात हे जर तर चे झाले. निकाल लागेपर्यंत यासाठी थांबावेच लागेल.
--------------------------------------------------

0 Response to "पंतप्रधान कौन?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel