-->
तापमान वाढीचे संकट

तापमान वाढीचे संकट

गुरुवार दि. 02 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
तापमान वाढीचे संकट
गेले तीन दिवस ज्या प्रकारे देशातील तापमानाचा पारा वाढत चालला आहे ते पाहता भविष्यात आपल्याकडे किती तापमान वाढू शकते याचा धोका दिसू शकतो. राज्यातील वीसहून जास्त शहरात आता पारा 40च्या वर गेला आहे. आजवर कधी नव्हे तो 45 अंशांचा उच्चांक अकोला शहरात गाठण्यात आला आहे. त्यातच यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने आणखीनच या चिंतेत भर पडली आहे. तापमान वाढीचे हे संकट केवळ आपल्याच देशात नाही तर जागतिक पातळीवरील आहे. ज्या देशांना थंडगार समजले जात होते त्या अमेरिका व युरोपातही उष्मा गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढला आहे. भविष्यात जगाचे वातावरण अधिकच तापत जाण्याची चिन्हे दिसत आहेत. अर्तात हे संकट मानवामुळेच झाले आहे. त्यावर उपाय करण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक चर्चा, परिसंवाद झडले परंतु त्यावर काही ठोस उपाययोजना करण्यात आले नाहीत. यातील सर्वात गुन्हेगार हे विकसीत देशच आहेत. आज सर्वाधिक कार्बन उत्सर्जन हे विकसीत देशातूनच होते आणि हेच देश अविकसीत व विकसनशील देशांवर ठपका ठेवत आले आहेत. इंधनाचा वाढता वापर, पाण्याचा बेसुमार गैरवापर, हवेचे प्रदूषण, वृक्षतोड यामुळे जगाचे संतुलन झपाट्याने बिघडत चालले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याची नितांत आवश्यकता आहे. जे जगाला पटले आहे पण अजूनही एवढे दुष्परिणाम दिसूनही अजून काही त्यांना वळत नाही, अशी स्थिती आहे. अवघे जगच अडचणीत येते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता कुठे मे महिना सुरु झाला आहे व उन्हाळ्याने परिसीमा गाठली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा यांच्याबरोबरीने आता जवळजवळ संपूर्ण देशातच उष्णतेचा पारा सरासरी 40 अंशावर पोहोचला आहे. महाबळेश्‍वर आणि बेळगाव ही या दिवसात थंड हवेची ठिकाणे म्हणून लोकप्रिय असलेल्या ठिकाणी देखील उकाडयाने नवीन उच्चांक गाठला आहे. एकीकडे ही उष्णता वाढत असताना विहिरींनी तळ गाठले आहेत, पिके करपत आहेत. पाणी टंचाईने अनेक गावे त्रस्त आहेत. दुष्काळामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना आपली जनावरे पोसणे कठीण जाऊ लागले आहे. चार्‍याची सोय अजूनही सरकारने बर्‍याच ठिकाणी करण्यात आलेली नाही. वन्यप्राणी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. उष्माघाताने बळी जायला प्रारंभ झाला असून विदर्भात आत्तापर्यंत सहा बळी गेले आहेत. द्राक्ष, डाळिंब, चिकू, आंबा, नारळ अशा फळबागा जगवणे कठीण झालेे आहे. सरकारी यंत्रणा निवडणुकीत गुंग असल्याने आचारसंहितेचे निमित्त करुन दुष्काळी जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहेे. पाणी साठे संपत चालले आहेत. अनेक धरणे आणि पाझर तलाव यांनी तळ बघितला आहे. पुण्यासारख्या शहरात आता बहुदा एक दिवस आड पिण्याचे पाणी देण्याची आपत्ती आली आहे. आता सलग तिस़र्‍या दिवशी उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. सूर्यदेव जणू काही या बूतलावर आगच ओकत असल्याचे जाणवू लागले आहे. कोकण व महाबळेश्‍वर वगळता इतरत्र पारा 40अंशावर गेला आहे. रायगड जिल्ह्यातील भीरा येथे मात्र तापमानाने 40शी पार केली आहे. अकोल्याचे तापमान 47 अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस असेल. राजयातील किमान 20 शहरांनी उष्णतेची 40शी पार केली आहे. आजवर एवढा उन्हाळा या शहरांनी पाहिला नव्हता. अवघा मराठवाडा व विदर्भ होरपळून निघतो आहे. अर्थात ही केवळ आपल्याकडीची स्थीती नाही तर जगभरात उष्णता वाढली आहे. जगभर जी हॉट शहरे म्हणून नोंदली गेली आहेत, त्यामध्ये पहिल्या दहापैकी नऊ शहरे भारतातली आहेत. यामुळे आपण निसर्गाचा र्‍हास अधिक वेगाने केला आहे, हेच यावरुन सिध्द होते. आपण केवळ विकासाच्या गप्पा केल्या. मात्र विकास करीत असताना निसर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी आपल्याकडे सरकार नवीन झाले लावण्याचा सकल्प करते, त्याचे बोगस आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र शेवटी त्यातून निष्पन्न काहीच नाही अशी स्थिती आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागाचे वाळवंट होणार असे इशारे देऊनही काही वर्षे झाली, परंतु आपण त्यातून काहीच धडा घेतला नाही. मराठवाड्यातील अनेक भागात पाण्याचा उपसा करुन आता त्याचे वाळवंट झाले आहे. पाण्याचे नियोजन नाही, त्याचे व्यवस्थापन नाही, अशा स्थितीत आपण केवळ आजचा विचार करीत आलो, भविष्याचा कोणच विचार करीत नाही. त्यामुळेच ही सर्व आपत्ती ओढावली आहे. पश्‍चिम घाट आता अडचणीत आहे. अनेक डोंगर आता मातीच्या ढिगारे उपसल्याने बोडके झाले आहेत. माणूस चंगळवादासाठी निसर्गाचे लचके तोडतो आहे. आता त्याचे परिणाम या उष्णतेच्या लाटेतून दिसू लागले आहेत. आता तरी आपण शहाणे होणार का हा सवाल आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "तापमान वाढीचे संकट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel