-->
सागरीमाला प्रत्यक्षात उतरावा

सागरीमाला प्रत्यक्षात उतरावा

संपादकीय पान सोमवार दि. १८ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सागरीमाला प्रत्यक्षात उतरावा
आपल्या देशाला लाभलेल्या ७५०० किलो मीटर सागरी किनारपट्टीचा आपण व्यापारी पध्दतीने वापर केल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला चांगलीच चालना मिळू शकते. परंतु आजवर सरकारने याचा कधीच विचार केला नव्हता. परंतु आता सरकारने प्रामुख्याने केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सागरीमाला हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या भारतीय नौकानयन मंत्रालयातर्फे तीन दिवसांच्या सागरी परिषदेमध्ये या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे ठरविण्यात आले. या घटनेचे स्वागत केले पाहिजे. या क्षेत्रात सुमारे दशकभरात एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या योजना हाती घेतल्या जाणार आहेत, ही पंतप्रधानांची घोषणा देखील उत्साहवर्धक ठरावी अशीच आहे. जल वाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक असते. आपल्याकडे जसा समुद्रकिनारा आहे तसेच अनेक नद्या आपल्याकडे आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी व माल वाहतूक करता येते. देशातील बंदर माल वाहतूक क्षमता सध्याच्या १४० कोटी टनवरून २०२५ पर्यंत ३०० कोटी टनपर्यंत नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर देशात पाच आणखी नवीन बंदरेही विकसित केली जाणार आहेत. भारतात देशांतर्गत १४,००० किलो मीटरचे जलमार्ग विकसित करण्याची क्षमता आहेे. सागरमाला प्रकल्प अवघ्या पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. यापूर्वीच हे उद्दिष्ट १० वर्षांचे होते. एक कोटी रोजगार निर्मिती यातून होऊ शकते. या प्रकल्पामुळे भारताच्या ११० अब्ज डॉलर निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. चार टप्प्यात पूर्ण होणार्‍या या प्रकल्पांतर्गत बंदरानजीकच निर्मिती केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. बंदरांशी निगडित विविध १५० हून अधिक प्रकल्पांचाही सागरमाला मोहिमेंतर्गतच समावेश करण्यात आला आहे. ५३ प्रकल्पांमुळे वार्षिक बंदर गुंतवणुकीमुळे विकास दरात १.४ टक्के वाढेल. व देशातील बंदरांमध्ये होणार्‍या वाढीव गुंतवणुकीमुळे राष्ट्रीय सकल उत्पादनात १.४ टक्के वाढ होऊ शकते. बंदर तसेच त्याच्याशी संबंधित क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ वाढला तर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढ निश्चित होऊ शकते. बंदराभिमुख विकासात जगभरातील व्यावसायिकांनीही सहभागी व्हाव, यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. सागरमाला हा देशातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प ठरेल. यामुळे देशाच्या उत्पन्नात वाढ तर होईलच शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. सरकारने हा महत्वाकांक्षी प्रकल्प आखला असून तो पूर्णत्वाला नेण्याची आवश्यकता आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले होते, मात्र आत्ताच्या सरकराने यात पुढाकार घेतला आहे त्याचे स्वागत करताना हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावी हीच इच्छा.

0 Response to "सागरीमाला प्रत्यक्षात उतरावा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel