-->
एक ही भूल, कमल का फूल!

एक ही भूल, कमल का फूल!

रविवार दि. १७ एप्रिल २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
एक ही भूल, कमल का फूल!
--------------------------------------
एन्टो- सरकारनेच आता करांच्या रचनेत सुधारणा करुन ही रचना जर सुटसुटीत केली तर व्यापारी उत्साहाने कर भरतील असे वातावरण निर्माण केले पाहिजे. भाजपाकडून तरी निदान ही अपेक्षा होती. कॉँग्रेसने आपल्या राजवटीत चुका केल्या आहेत. त्यामुळेच लोकांनी कंटाळून कमळाचे फूल फुलविले. परंतु आता या फुलावरच विश्‍वास राहिला नाही. व्यापारी हा देशातील मोठा करदाता आहे. त्याला कर भरताना सुटसुटीपणा पाहिजे आहे, यात त्यांचे काहीच चुकले नाही. त्यांची अपेक्षा माफक आहे. सोने-चांदी व्यापार्‍यांनी आता संप सध्या मागे घेतला असला तरी हा प्रश्‍न न सोडविल्यास २४ पासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. सरकारला काही तरी नवीन करुन दाखवून महसुलात वाढ करण्याची यावेळी चांगली संधी होती. तसे न करता त्यांनी अबकारी कर लावून पूर्वीच्याच सरकारचा कित्ता गिरविला. त्यामुळेच व्यापारी एक ही भूल, कमल का फूल, अशी घोषणा देत आहेत...
--------------------------------------------------------
एक ही भूल, कमल का फूल, ही घोषणा कुणा दुष्काळग्रस्त भागातील जनतेची नव्हे तर सोन्या-चांदींच्या दागिन्यांच्या विक्रेत्यांची आहे. केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्याला अजून दोन वर्षे पूर्ण झालेली नाही तर भाजपाची व्होट बँक असलेल्या व्यापारी मंडळींना कमळाला मतदान करुन चूक केल्याचे आता वाटू लागले आहे. असे काय बरे झाले की, भाजपाचा हा पारंपारिक मतदार वर्ग त्यांच्यावर रुसला आहे? केवळ याच वेळी नव्हे तर दरवेळी भाजपाला मतदान करण्यात पुढाकार घेत असलेला हा व्यापारी समाज आता पूरता निराशेच्या गर्तेत सापडला आहे. त्यामागे तसे कारणही ठोसच आहे. सरकारने अर्थसंकल्पात सोने-चांदी व्यापार्‍यांवर एक टक्का अबकारी कर बसविण्याचा निर्णय जाहीर केला आणि या वादाला तोंड फुटले. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी देशात सोन्यात मोठ्या प्रमाणात काळा पैसा दडला असल्याचे जाहीर केले व हा पैसा सोन्यात गुंतविला जाऊ नये यासाठी एक टक्का कर बसवित असल्याचे जाहीर केले. अर्थमंत्र्यांच्या सांगण्यानुसार, आपल्याकडे देशात सुमारे दरवर्षी बाराशे टन सोन्याची आयात होते. त्यातील सहाशे टन सोने कुठे जाते याचा काही पत्ता लागत नाही. म्हणजेच या सोन्यात काळा पैसा गुंतविला जातो. मग अशा प्रकारे जर सोन्यातील काळा पैसा हुडकणे हे सरकारचे काम ठरते. त्यावर उपाय म्हणून एक टक्का अबकारी कर बसविण्यात आला. यापूर्वी कॉँग्रेसच्या सरकारने असाच प्रकारचा कर आणण्याचा प्रयत्न २०१२ साली केला होता. मात्र त्यावेळी भाजपाने त्याला विरोध केला होता. मग आता हाच कर भाजपा कसे आणत आहे, हा सोने-चांदी व्यापार्‍यांचा सवाल योग्यच आहे. म्हणजे भाजपाचा त्यावेळी विरोधासाठी विरोध होता हे सिध्द होते. भाजपाचा हा भोंदूपणा विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही सिध्द झाला आहे. रिटेल उद्योगासह विमा उद्योगात विदेशी गुंतवणुकीला विरोध करणारा भाजपा सत्तेत आल्यावर मात्र याच उद्योगांना विदेशी गुंतवणुकीची दारे कशी काय उघडतो? सोन्यावरील अबकारी कराबाबतही असेच झाले आहे. सर्वात वाईट म्हणजे पंतप्रधानांनी या व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाला भेटही दिली नाही. विरोधात असताना मी पंतप्रधान झाल्यास तुम्हाला माझे दरवाजे सताड खुले असतील, मी जनतेचा सेवक म्हणून काम करेन असे सांगणारे हे नरेंद्रभाई व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळास भेटणे टाळतात हे व्यापार्‍यांना खटकणे योग्यच आहे. सोने-चांदी सराफांचा विरोध हा जादा कर भरण्यास अजिबात नाही. तर अबकारी कर लादून आणखी नवीन कर लादू नकात, त्याला विरोध आहे. कारण त्यात पुन्हा नवीन सरकारी खाते सहभागी होते व त्यातून लाल फितीचा कारभार वाढतो. सरकारला जर महसूल वाढवायचाच असेल तर सध्या असलेल्या करातच वाढ करावी, ही व्यापार्‍यांची सूचना काही चुकीची नाही. परंतु सरकार यासंबंधी काहीही व्यापार्‍यांचे म्हणणे एैकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. बरे एवढे सर्व करुन सरकारच्या तिजोरीत केवळ २६०० कोटी रुपयेच जमा होणार आहेत. त्याचबरोबर सरकार १२ कोटींच्या वर उलाढाल असलेल्यांनाच हा कर लागू आहे, त्यामुळे यातून लहान व्यापार्‍यांना वगळण्यात आले आहे, असा सरकारचा दावा आहे. परंतु सरकारची ही फसवेगिरी आहे, सरकारने सहा कोटींच्या वर उत्पन्न झाल्यास हा कर शून्यापासून भरण्याची सूचना केली आहे, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. अर्थात सहा कोटी रुपयांची उलाढाल ही केवळ नवीन सोन्यांच्या उलाढालीवरील नाही तर जुने आलेले सोने देखील यात गृहीत धरले जाणार आहे. त्यामुळे लहान व्यापारीही या कचाट्यात सापडणार आहे, असा व्यापार्‍यांनी केलेला दावा काही खोटा नाही. अशा प्रकारे सध्याचे वातावरण हे अविश्‍वासाचे झाले आहे. व्यापार्‍यांचा सरकारववर विश्‍वास न राहाणे ही बाब देशाच्या हिताची निश्‍चितच नाही. भाजपाचे प्रवक्ते माधवराव भंडारी यांनी चॅनेलवरील चर्चेत बोलताना व्पारी हे चोरीमारी करतात असा उल्लेख केला. अर्थात त्यांनी आपल्या वक्तव्याचा लगेचच उल्लेख केला व आपले तसे बोलण्याचा उद्देश नव्हता असेही सांगितले. परंतु भंडारी यांच्या सांगण्यानुसार, जर व्यापारी चोर्‍यामार्‍या करीत नाहीत तर त्यांनी कर भरायला कशाला घाबरायचे? परंतु व्यापार्‍यांचा कर भरण्यासा विरोध नाहीच आहे. त्यांचा अबकारी कर भरण्यास विरोध आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, करांचे ओझे कमी करण्यासाठी बहुतांशी व्यापारी आपली उलाढाल कमी दाखवितो. परंतु सरकारनेच आता करांच्या रचनेत सुधारणा करुन ही रचना जर सुटसुटीत केली तर व्यापारी उत्साहाने कर भरतील असे वातावरण निर्माण केले पाहिजे. भाजपाकडून तरी निदान ही अपेक्षा होती. कॉँग्रेसने आपल्या राजवटीत चुका केल्या आहेत. त्यामुळेच लोकांनी कंटाळून कमळाचे फूल फुलविले. परंतु आता या फुलावरच विश्‍वास राहिला नाही. व्यापारी हा देशातील मोठा करदाता आहे. त्याला कर भरताना सुटसुटीपणा पाहिजे आहे, यात त्यांचे काहीच चुकले नाही. त्यांची अपेक्षा माफक आहे. सोने-चांदी व्यापार्‍यांनी आता संप सध्या मागे घेतला असला तरी हा प्रश्‍न न सोडविल्यास २४ पासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. सरकारला काही तरी नवीन करुन दाखवून महसुलात वाढ करण्याची यावेळी चांगली संधी होती. तसे न करता त्यांनी अबकारी कर लावून पूर्वीच्याच सरकारचा कित्ता गिरविला. त्यामुळेच व्यापारी एक ही भूल, कमल का फूल, अशी घोषणा देत आहेत.
--------------------------------------------------------

0 Response to "एक ही भूल, कमल का फूल!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel