-->
रणधुमाळी सुरु

रणधुमाळी सुरु

बुधवार दि. 03 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
रणधुमाळी सुरु
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये या वर्षअखेरपर्यंत विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यानंतर लगेचच तीन-चार महिन्यांत लोकसभेचीही निवडणूक वेळापत्रकानुसार होईल. कदाचित सरकार या विधानसभा व लोकसभा एकत्र घेणार का, असाही प्रश्‍न आहे. अजून मोदी व शहा यांच्या पोटात याविषयी नेमके काय आहे ते सांगता येत नाही. एकूणच काय तर येत्या महिन्याभरात निवडणूक रणधुमाळी सुरु होईल. केंद्रात सत्तेत असलेला भाजपा सध्या पूर्ण तयारीनिशी व ताकदीनुसार यात उतरणार आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथे भाजपाची पंधरा वर्षे सत्ता आहे. तर राजस्थानात गेली पाच वर्षे सत्ता भाजपाची आहे. मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या रूपाने भाजपला एक चांगले नेतृत्व लाभले. त्यामुळे भाजपाची तेथील नेतृत्वाची चिंता दूर झाली आहे. मध्यप्रदेशचे चौहान व छत्तीसगढचे रमणसिंह यांनी दीर्घकालीन नेतृत्व दिले. आता मात्र या चेहर्‍यांना पुन्हा मते कितपत मिळतील ही शंका आहे. राजस्थानात यावेळी भाजपाची स्थिती काही समाधनकारक नाही. एक तर इकडे आलटूपालटून कॉग्रेस व भाजपा यांचे सरकार येते असा आजवरचा अनुभव आहे. हीच परंपरा कायम राहते की पुन्हा भाजपा निवडून येते हे पाहणे गंमतीचे ठरेल. मात्र राजस्थानात भाजप सरकारच्या, विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजस्थान गौरव यात्रा काढली, पण ठिकठिकाणी या यात्रेला व मुख्यमंत्र्यांना जनतेच्या तीव्र नाराजीचा सामना करावा लागल्याने त्यांनी यात्रेतून काढता पाय घेतला. आता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गावोगावी जाऊन भाषण करतात. दुसरीकडे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या काही सभा गर्दीअभावी रद्द कराव्या लागल्या. आता पंतप्रधानांच्या सभा लागत आहेत. राजस्थानात मुख्यमंत्री आणि पक्षसंघटना यांच्यात स्पष्ट दरी आहे. मुख्यमंत्र्यांच्या लहरी कारभाराच्या विरोधात सार्वत्रिक नाराजी आहेच, पण भाजप कार्यकर्त्यांतच त्यांना धडा शिकविण्याची तीव्र इच्छा आढळून येते. या राज्यात काँग्रेसने आतापर्यंत एकजुटीचे चित्र निर्माण केले असले, तरी पक्षाला यश मिळाल्यास मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा होण्याची आहे. परंतु राजस्थानमध्ये बदलाचे वारे आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मध्यप्रदेशात सध्या प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, ग्वाल्हेरचे महाराज ज्योतिरादित्य शिंदे हे प्रमुख, तर अन्य नेत्यांपैकी सुरेश पचौरी, कांतिलाल भुरिया, अरुण यादव ही मंडळी एकत्र दिसतात. राज्याचे एकेकाळचे अनभिषिक्त नेते दिवंगत अर्जुनसिंह यांचे पुत्र राहुलसिंह यांना अडगळीत टाकण्यात आले आहे, तर समन्वय समिती प्रमुख दिग्विजयसिंह यांनादेखील नेते फारसे विचारत नसल्याचे दिसते. राहुल गांधी यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे येथे मोदींच्या सभेला गर्दी नव्हती. छत्तीसगडमध्ये काँग्रेसशी काडीमोड घेतलेले माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी जनता काँग्रेस हा पक्ष स्थापन केला व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांच्याशी निवडणूक समझोता केला आहे. मायावतींची काँग्रेसला खेळविण्याची ही खेळी आहे. जोगी स्वतः कर्तबगार असले व शारीरिक अपंगत्वावर मात करून ते राज्य पिंजून काढत असले तरी बेभरवशाचे आहेत. लोकांचा त्यांच्या चिरंजीवांवर अधिक राग आहे. ही बाब त्यांच्या विरोधात जाणारी आहे. अशा स्थितीत भाजपविरोधी मतांच्या विभाजनाचा लाभ रमणसिंह यांना होऊ शकतो. गेल्या वेळी निसटत्या बहुमताने रमणसिंह मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेसमधील मारामार्‍यांमुळे ते सत्तेत टिकले, अन्यथा त्यांनाही त्यांच्या पक्षातून भरपूर विरोध आहे. सध्याच्या घडामोडींमध्ये राज्यातील एका मंत्र्याची अश्‍लील सीडी करून त्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह बाघेल यांच्यावर करण्यात येत आहे. बाघेल यांना पोलिसांनी थेट अटक करून तुरुंगात टाकले. दुर्दैवाने भाजपच्याच एका नेत्याने या प्रकाराची जबाबदारी स्वतःवर घेऊन बाघेल निर्दोष असल्याचे जाहीर केल्याने रमणसिंह सरकारची स्थिती मोठी अवघड झाली. या तिन्ही राज्यांमध्ये खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे. या निकालाचा परिणाम लोकसभांच्या निवडणुकाववर होणार हे नक्की. या तीन राज्यांत मिळून लोकसभेच्या 65 जागा आहेत. राजस्थानातील 25 पैकी सर्व जागा व छत्तीसगडमध्ये 11 पैकी दहा जागा जिंकून भाजपने विक्रम केला होता. मध्य प्रदेशात 29 पैकी काँग्रेसला केवळ तीन जागा मिळाल्या. यावेळी भाजपाला एवढे चांगले दिवस नक्कीच नाहीत. उलट कॉग्रेसचे पारडे जड असल्याचे सध्या तरी चित्र आहे. जर कॉग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान या दोन राज्यात आपला विजय नोंदविला तर काँग्रसेसाठी एक मोठे कमबॅक ठरेल. अन्यथा या दोन पैकी एका राज्यात जरी कॉग्रेसने बाजी मारली तरी कॉग्रेससाठी ती मोठी जमेची बाजू ठरेल. मात्र भाजपासाठी ती धोक्याची घंटा ठरणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचे किंवा मोदी यांचे सरकार नसेल असे आत्तापासूनच अनेक राजकीय विश्‍लेषक बोलू लागले आहेत. भावी पंतप्रधान म्हणून राहूल गांधी किंवा शरद पवार ही दोन नावे आत्ताच चर्चेत येऊ लागली आहेत. त्यातल्या त्यात भाजपा विरोधी सर्व पक्षांना एकत्र बांधण्याचे काम शरद पवार चांगले करु शकतील व सरकारही उत्तम देतील असा विचार सुरु होणे म्हणजे भाजपासाठी धोक्याची घंटा जवळ आली हे स्पष्ट होते.
---------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "रणधुमाळी सुरु"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel