-->
खेड्याकडे चला

खेड्याकडे चला

गुरुवार दि. 04 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
खेड्याकडे चला
महात्मा गांधींनी स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील नागरिकांना खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला होता. खरे तर हा संदेश आपण एैकून त्यानुसार आपले नियोजन व ग्रामीण अर्थव्यवस्था आखली असती तर सध्याची स्थीती आपल्यावर आली नसती. दोन ऑक्टोबरला आपण गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो परंतु गांधींचे विचार मात्र अंमलात आणत नाही असेच खेदाने सांगावसे वाटते. कारण गेल्या चार दशकात आपण शहरे विकसीत केली. खरे तर शहरे विकसीत केली असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण शहरे विकसीत करण्यातही आपल्याकडे नियोजन नव्हते. केवळ कंपन्या स्थापन होत गेल्या व रोजगार निर्मिती झाल्याने रोजगारासाठी लोक शहरात आले. शहरांचेही नियोजन नव्हते. त्यामुळे केवळ शहरे फुगत गेली. तेथेही समस्या वाढत गेल्या शहरे वाढताना खेडी मात्र ओस पडली. सरकारने कृषी क्षेत्राकडे फारसे लक्ष न दिल्याने हे सर्व घडले आहे. हरितक्रांतीमुळे कृषी उत्पादनात लक्षणीय प्रमाणात वाढ झाली, देश-अन्नधान्यात स्वयंपूर्ण व निर्यातक्षम बनला. मात्र या क्रांतीबरोबर आलेल्या तंत्रामुळे शेतकरी परावलंबी, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातातील प्यादे बनला आहे. सध्या बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे शेतकर्‍याला चढ्या दराने खरेदी करावी लागतात. शेती करायला मजूरच मिळत नसल्यामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागले. वीजपंप, ठिबकसिंचन, टॅ्रक्टर हे त्याच ओघात आले. ग्रामीण भागाचा कणा असलेल्या सहकारी बँका दिवाळखोरीत निघाल्या. परिणामी शेतीसाठी भांडवल उभारणे सामान्य शेतकर्‍याला कठीण झाले आहे. गावाकडील तरुण आता शेती करायला ग्रामीण भागात राहाण्यास तयार नाही. त्याला शहरात राहून सायबाची खुर्चीवर बसून केलेली नोकरी पसंत पडू लागली. शेतीच्या कामापेक्षा शहरात नोकरी करण्याची पसंती दिल्याने शेतीच्या कामात लक्ष घालावयास तरुण पुढे येईनात. ग्रामीण भागातील समस्यांना तर मोठ्या प्रमाणात विळखा पडला आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वाढत्या वापरामुळे जमिनीचा बिघडत चाललेला पोत, पाण्याची खालावलेली पातळी, पर्यावरणाची झालेली हानी, पावसाच्या लहरीपणात झालेली वाढ यामुळे शेतीपुढील संकटे वाढली आहेत. नव्वदीत आर्थिक सुधारणांचे युग सुरु झाले. खरे तर त्यावेळी कृषी क्षेत्रात मोठ्या सुधारणा व्हायला पाहिजे होत्या. परंतु सरकारने लक्ष केंद्रीत केले ते औद्योगिक क्षेत्रावर. उद्योग व सेवाक्षेत्र झपाट्याने वाढीस लागले. सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा आता 52 टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. या उलट कृषिक्षेत्राचा वाटा मात्र घटत जाऊन 15 टक्क्यांवर खाली येऊन ठेपला आहे. अजूनही 54 टक्के लोकसंख्या रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंंबून आहेे. शहरात रोजगार मिळाले परंतु शहरांचे नियोजन नसल्यामुळे त्यांचे बकाल वस्तीत रुपांतर झाले. त्यातून आरोग्याच्या समस्या वाढल्या. दळणवळणांच्या विकासाबरोबर गाव व शहरातील अंतर कमी होत गेले. आता इंटरनेटच्या जमान्यात तर हे अंतरच संपुष्टात आले. उंचावलेल्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी काहींनी शहरांची वाट धरली. ग्रामीण भाग हळूहळू ओस पडू लागला. युवकांचा शेतीकडील ओढा कमी होणे अनेक अर्थाने धोकादायक आहे. यामुळे शेती, ग्रामीण उद्योग व व्यवसायातील उद्दमशीलता, प्रयोगशीलता मारली जाण्याचा धोका आहे. तसेच, गुंतवणूक घटून शेती व ग्रामीण विकासाचा दर मंदावू शकतो. डॉ. स्वामिनाथन आयोगाला युवकांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक उपाय सुचवण्याचे सांगण्यात आले होते. त्याला अनुसरूनच आयोगाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची शिफारस केली होती. शेती ही लाभधारक झाली पाहिजे. ती जर तोट्यात जाऊ लागली तर शेतकरी त्यात रस घेणार नाहीत. ज्याप्रमाणे कंपन्या या फायद्यात चालण्यासाठी सरकार त्यांना विविध सवलती देते, त्याच धर्तीवर शेती फायद्यात चालावी यासाठी सरकारने विविध उपाय योजले पाहिजेत. शेती जर फायद्यातील होऊ लागली तरच तरुण त्याकडे वळतील. उच्चशिक्षित तरुण स्वयंस्फूर्तपणे शेतीकडे वळतील, अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. तोकड्या धारणक्षेत्रावर लाभकारक शेती करणे अशक्य आहे. पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबरोबर त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आवश्यक आहे. वीज दिवसा, पुरेशा दाबाने, अखंडित मिळणे, ही जशी शेतीची गरज आहे, तशी ती उद्योगांचीही आहे. प्रशासकीय व पोलिस यंत्रणेने पुरेशी संवेदनशीलता दाखवल्यास खेड्यातील अनेक प्रश्‍न मार्गी लागू शकतात. शिक्षण व आरोग्य सेवेच्या दर्जात सुधारणा झाल्यास ग्रामीण जनतेला शहरात स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. रोजगारासाठीच ग्रामीण भागातून स्थलांतर होत असते. हे जर थांबवायचे असेल तर ग्रामीण भागातच रोजगार निर्माण झाले पाहिजेत. खेड्यात शहराप्रमाणे जगणे शक्य झाल्यानंतर आपोआप युवक शेतीकडे आकर्षिले जातील. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी कृषी क्षेत्रावर जसे अवलंबून रहावे लागणार आहे तसेच कृषीशी निगडीत उद्योगही रोजगार निर्मितीत हातभार लावू शकतात. त्याचप्रमाणे, शेतीचा जोडधंदाही शेतकर्‍यांना एक उत्पनानाचे चांगले साधन ठरु शकतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्याग्रस्त भागात शेतीच्या जोडधंद्याचा अभाव असल्याचे अढळले आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण म्हणजे शेतीच्या जोडधंद्याचा असलेला अभाव. शेतीतून समृद्दी विविध मार्गांनी येऊ शकते. यातून आपम आपला मोठा विकास करु शकतो. मात्र त्यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे. केवळ याच इच्छाशक्तीच्या बळावर आपण पुन्हा तरुणांचे लोंढे शहराकडे जाण्यासाठी रोखू शकतो आणि महात्मा गांधींचे खेड्याकडे चला या नार्‍याची पूर्तता करु शकतो.
-----------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "खेड्याकडे चला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel