-->
आता कार्यक्षमता वाढावी / मोबाइल उद्योगावर संकट

आता कार्यक्षमता वाढावी / मोबाइल उद्योगावर संकट

शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
आता कार्यक्षमता वाढावी
राज्य सरकारच्या सुमारे 22 लाख कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करुन उध्दव ठाकरे सरकारने नोकरशाहीला व्हॅलेन्टाईन गिफ्टच दिले आहे. यापूर्वी दुसरा व चौथा शनिवार सुट्टी असे. आता नवीन निर्णयानुसार, चारही आठवडे पाच दिवस काम चालेल. कर्मचार्‍यांना त्यासाठी दररोज 45 मिनिटे जादा काम करावे लागणार आहे. अन्य काही राज्यात तसेच केंद्रातही पाच दिवसांचा आठवडा असल्याने राज्य सरकारनेही पाच दिवसांचा आठवडा करावा अशी प्रदीर्घ काळ नोकरशाहीची मागणी होती. परंतु सरकारी कर्मचार्‍यांकडून अगोदरच कामाची बोंब त्यात पाच दिवसांचा आठवडा केल्यास अनेक कामे खोळबंतील असे यापूर्वीच्या सरकारला वाटत होते. त्यामुळे हा निर्णय सातत्याने पुढे ढकलला जात होता. परंतु उध्दव ठाकरे सरकारने कर्मचार्‍यांना दिलासा देण्याचा निर्णय घेऊन पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय् घेतला. राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी या निर्णयाचे जोरात स्वागत केले आहे, मात्र त्यांनी जनतेची कामे तत्परतेने करण्यासाठी यापुढे कंबर कसली पाहिजे व आपली कार्यक्षमता वाढविली पाहिजे. उध्दव ठाकरे यांनी हीच अपेक्षा ठेेऊन पाच दिवसांचा आठवडा केला आहे. त्या विश्‍वासाला कर्मचार्‍यांनी तडा जाऊ देता कामा नये. पाच दिवसांचा आठवडा झाल्यावर कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढू शकते. मुंबई तसेच अन्य महानगरातील कर्मचार्‍यांना मुंबईत आपल्या सरकारी कार्यालयात पोहोचायला दीड दोन तास जातात अशी स्थीती आहे. त्यामुळे अर्धे आयुष्य त्या कर्मचार्‍याचे प्रवासात जाते. त्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आता दोन दिवस हा कर्मचारी पूर्ण आराम करुन किंवा कुटुंबास पुरेसा वेळ देऊन सोमवारी ताजातवाना होऊन कामावर येऊ शकेल. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र मुळातच सरकारी कर्मचार्‍यांना आंगचोर वृत्तीने काम करण्याची सवय असते. ती सवय त्यांना मोडावी लागणार आहे. खरे तर नोकरशाहीचा लाल फितीची कारभार बंद करण्यासाठी कर्मचार्‍यांची मानसिकता बदलली गेली पाहिजे. कोणतेही जनतेच्या हिताचे काम हे लाल फितीत अडकून न राहाता वेळ पडल्यास जनतेच्या हितासाठी काही बाबींना फाटा देऊन निर्णय खालच्या पातळीवरुन घेतले गेले पाहिजेत. नोकरशाही ही जनतेच्या भल्यासाठी आहे, जनतेचे निर्णय या लाल फितीत अडकून त्यांना जर त्याचा फायदा होणार नसेल तर ही नोकरशाही काय कामाची, असा सवाल उपस्थित होतो. केंद्र सरकारप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामीळनाडू, पश्‍चिम बंगाल, गावा या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा आहे. जर या पाच दिवसात एखाद दिवस सुट्टी आली तर चारच दिवस काम होणार आहे. तसेच दर शनिवार, रविवार या सुट्ट्यांना जोडून जर एखादी सुट्टी आली तर मग तर बघायलाच नको. अशा परिस्थितीत कर्मचारी सुखासीन होणार आहेत हे वास्तव असले तरी त्यांनी आपण जनतेचे नोकर आहोत हे समजून कामाच्या तासाच प्रामाणिकपणे काम करुन दाखविले पाहिजे. पाच दिवसांचा आठवडा हे क्रमाचार्‍यांसाठी निश्‍चितच फायदेशीर आहे. संपूर्ण जगात अमेरिका, युरोपात पाच दिवासंचा आठवडा असतो. मात्र तेथे सोमवार ते शुक्रवार प्रामाणिकपणे काम केले जाते. तसे कार्यक्षमतेने काम आता राज्य कर्मचार्‍यांकडून अपेक्षीत आहे.
मोबाइल उद्योगावर संकट
चीनमधून येणार्‍या सामग्रीवर बव्हंशी अवलंबून असलेल्या स्मार्टफोन उद्योगाला आता करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची झळ बसू लागली आहे. स्मार्टफोनसाठी चीनमधून मोठ्या प्रमाणावर सुटे भाग तसेच अर्धउभारणी झालेले फोन आयात केले जातात. त्यांची आयात थांबल्यामुळे या उद्योगक्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याचा थेट परिणाम म्हणून येत्या काळात स्मार्टफोन महागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या 24 तारखेला स्पेनमधील बार्सिलोना येथे जागतिक माबोइल काँग्रेस भरत आहे. करोना विषाणूच्या भीतीने एरिक्सन, अ‍ॅमेझॉन, सोनी यांच्यासारख्या बड्या कंपन्यांनी या काँग्रेसला न जाणेच पसंत केले आहे. त्यामुळे या कॉँग्रेसवर करोनाचे सावट पडले आहे. चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. चिनी नववर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच हे संकट आल्यामुळे अनेक कारखान्यांनी नववर्षानिमित्त दिलेली सुट्टी 10 फेब्रुवारी वाढवली होती. त्यानंतर आता हळूहळू काही कारखाने सुरू होण्याच्या बेतात आहेत. परंतु अजूनही चिनमधील कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने सुरु झालेले नाहीत. त्यामुळे याचा फटका जागतिक पातळीवर स्मार्टफोन उद्योगाला बसणार आहे, हे नक्की. चीन हा स्मार्टफोनचा मोठा उत्पादक असून त्यांची निर्यात जगात होते. हा पुरवठा तातडीने होण्याची शक्यता मावळली असून नजिकच्याकाळात करोनाचे संकट दूर झाले तरच काही चित्र पालटू शकते. चीनमध्ये करोनाची लागण झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या 1,016 झाली आहे. हुबेई प्रांतात या विषाणूने बाधित लोकांनी संख्या 42,638 झाली आहे. चीनबाहेर 30 ठिकाणी करोनाग्रस्त 350 जण आढळले आहेत. त्यातच फिलिपाइन्स आणि हाँगकाँगमध्ये प्रत्येकी एक करोनामुळे मरण पावला आहे. करोनाची स्थिती न सुधारल्यास जगात केवळ मोबाईलच नव्हे तर विविध उत्पादनांचा तुटवडा जाणवेल अशी भीती आहे.
----------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "आता कार्यक्षमता वाढावी / मोबाइल उद्योगावर संकट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel