-->
पावसाने दाणादाण

पावसाने दाणादाण

शुक्रवार दि. 06 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
पावसाने दाणादाण
भर गणेशोत्सवात बुधवारी सुरु झालेल्या पावसाने मुंबईसह कोकणाला जोरदार झोडपून काढल्याने येथे सर्वत्र दाणादाण उडून गेली आहे. अजूनही दोन दिवस या भागात जोरदार वृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने बुधवारी पाऊस होण्याचा काही अंदाज व्यक्त केला नव्हता. मात्र आता पुढील दोन दिवस पाऊस पडण्याच अंदाज व्यक्त केला आहे. खरे तर बुधवारच्या पावसाचा अंदाज अगोदर देण्यात आला असता तर लोकांचे हाल कमी झाले असते. परंतु हवामानखात्याने त्यांना शोभेसेच काम केले आहे. सप्टेंबरच्या महिन्यात पाऊस कमी होत जातो असा सर्वांचाच अंदाज असतो. परंतु यावेळी मात्र पाऊस जुलैसारखा कोसळत असल्याने व त्यातच गणेशोत्सवात पावसाने मुहूर्त काढल्याने लोकांच्या हालात आणखीनच भर पडली आहे. मुंबईत तर पावसाने विक्रमी घाव घातल्याने सर्वच मुंबापुरी जलमय झाली होती. मुंबईच्या प्रवाशांची वाहिनी असलेल्या तीनही मार्गावरील लोकल्स सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. घरातून निघालेल्या जनतेला आपल्या घरी काही पुन्हा परतता आले नाही. शेवटी त्यांना आपला मुक्काम ऑफिसमध्येच किंवा मित्रमंडळींच्या घरी करावा लागला. अशा प्रकारची दैना होण्याची ही मुंबईकरांची या पावसाळ्यातील तिसरी वेळ आहे. मुंबई, पुण्याहून निघालेला कोकणवासीय आपल्या गावी खड्यातून कसाबसा पोहोचला असताना या मुसळधार पावसाने त्याच्या हालाखीत आणखीनच आता भर पडली आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे पूर्णपणे उखडला गेला आहे. हा रस्ता कधी पूर्ण होणार हे प्रश्‍नचिन्ह सर्वच कोकणवासीयांपुढे असताना भर गणपतीत पावसाने धुमाकूळ घातल्याने जनतेच्या हालात भर पडली आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सावित्री अंबा, कुंडलिका पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड आणि नागोठणे परिसरात पुरस्थिती निर्माण झाली. रोहा खिंड आणि ताम्हिणी घाटात दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पाली-खोपोली मार्गही ठप्प झाला. पावसाचा जोर कायम असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने नेमके या आपत्कालीन स्थितीत काय काम केले हे कोणालाच सांगता येणार नाही. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनार्‍यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे, महाड परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली. नागोठणे व महाड या दोन्ही शहरांमध्ये जरा पाऊस पडला की पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. पाताळगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्याने सावरोली येथील पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे खालापूरकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाकण पाली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. चालू मोसमात हा मार्ग बंद करण्याची यावेळी सातव्यांदा वेळ आली आहे. जांभूळपाडा पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबविण्यात आली. मोर्बा पूलावरून पुराचे पाणी गेल्याने माणगाव श्रीवर्धनकडे जाणारा मार्ग ठप्प झाला. रोहा खिंडीत दरड कोसळल्याने नागोठणे रोहा दरम्यानची वाहतूक बंद झाली तर ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने माणगाव-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भोर घाटही बंद असल्याने दक्षिण रायगडमधून पुण्याला जोडणारे दोन्ही मार्ग बंद झाले होते. मुरुड-रोहा मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या पूरस्थितीवर मात करण्यासाठी एन.डी.आर.एफ.ला पाचारण करण्यात आले आहे. यावेळी पाऊस विक्रमी झाला आहे, यात काहीच शंका नाही. बुधवारी जिल्ह्याच्या राजधानीच्या ठिकाणी अलिबागमध्ये 117 मि.मी. एवढा पाऊस पडला. तर पेण (135 मि.मी.), मुरुड ( 185 मि.मी.), पनवेल (140 मि.मी.), उरण (230 मि.मी.), कर्जत (155 मि.मी.), खालापूर (268 मि.मी.), माणगाव (260 मि.मी.), रोहा (257 मि.मी.), सुधागड (142 मि.मी.), तळा (175 मि.मी.), महाड (91 मि.मी.), पोलादपूर (114 मि.मी.), म्हसळा (180 मि.मी.), श्रीवर्धन (140 मि.मी.), माथेरान (254 मि.मी.) एवढा पाऊस झाला. त्यामुळे यावेळी पाऊस कमी वेळात जास्त पडला हे वास्तव काही नाकारता येणार नाही. मात्र असे असले तरीही या परिस्थीतीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तातडीची व्यवस्था उपलब्ध असणे गरजेचे ठरते. निदान असली तरी त्याचा पुरेपूर वापर झालेला नाही असेच दिसते. कारण अनेक भागातील पूराच्या पाण्यातून जनतेला दिलासा मिळालेला नाही. मुंबईतही याहून काही वेगळी स्थिती नव्हती. मुबंईत पावसाच्या पाण्याला बाहेर जाण्याचा मार्गच नसल्यामुळे मुंबई लगेचच जलमय होते. कोकणातही रायगड, रत्नागिरी व सिधुंदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस झालेला असताना लोकांना आता पुढे काय करावयाचे हे प्रश्‍नचिन्ह होते. पाऊस गेल्यावर पाणी आटल्यावरच त्यांना दिलासा मिळणार असे हे नेहमीचेच आहे. यावेळी देखील विक्रमी पाऊस पडल्यामुळे हे पाणी तुंबल्याचे कारण पुढे ठेवण्यात येईल. एकूणच काय जनतेचे हाल हे सुरुच आहेत.
---------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "पावसाने दाणादाण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel