-->
संपादकीय पान मंगळवार दि. २५ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
लोकशाहीचे मारेकरी
----------------------------------
निवडणुकात सर्व सरकारी यंत्रणा अडकलेली असताना त्याची संधी साधून देशातील काही मोक्याच्या ठिकाणी हल्ला करुन आपल्या देशाची लोकशाही कमकूवत करण्याची तयारी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केली होती. त्याच कट पोलिसांनी उघड केल्याबद्दल ते अभिनंदनास प्राप्त आहेत. दरवेळी आपल्याकडे निवडणुका आल्या की संधी साधून अतिरेकी आपल्याकडे घुसुन बॉम्बफोटाचे कट रचून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे कट रचतात. अर्थात बहुतांशी वेळा आपल्याकडे हे कट उधळले जातात. असाच एक कट दिल्ली पोलिसांनी उधळला आहे. अनेक बॉंबस्फोट प्रकरणांत हवा असलेला इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य झिया उर रहमान ऊर्फ वकास याच्यासह तीन जणांना दिल्ली पोलिसांनी रविवारी राजस्थानमध्ये अटक केली. लोकसभा निवडणुकांदरम्यान घातपात घडवून आणण्याचा या चौघा दहशतवाद्यांचा उद्देश होता. रहमान हा पाकिस्तानचा नागरिक आहे. रहमानला अजमेर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. तो मुंबईतील वांद्रे येथून अजमेरला आला होता. त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महंमद महरुफ, महंमद वकार अजहर आणि शकीब अन्सारी ऊर्फ खालिद यांना त्यांच्या घरातून राजस्थान पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. यांच्याबरोबरच या तिघांशी संपर्कात असणार्‍या जामियानगर भागातील एका तरुणालाही पोलिसांनी संशयावरून अटक केली आहे. याबाबत बोलताना विशेष पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव म्हणाले, पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने रहमनाला भारतात पाठविले आहे. भारतात झालेल्या निरनिराळ्या बॉंबस्फोटप्रकरणी रहमान आणि त्याच्या सहकार्‍यांचा पोलिस शोध घेत होते. त्यांना पकडल्याने हे पोलिसांचे मोठे यश आहे. जयपूर आणि जोधपूर येथून दहशतवाद्यांच्या घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटके, इलेक्ट्रॉनिक सर्किट, टायमर आणि डिटोनेटर यांचा साठा जप्त केला. या स्फोटकांच्या साह्याने मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा या दहशतवाद्यांचा इरादा होता का, असा प्रश्‍न विचारल्यावर श्रीवास्तव यांनी, सध्याच्या तपासात तसे दिसून येत नसल्याचे सांगितले. तसेच, निवडणुकीसह कोणत्याही महत्त्वाच्या घटनांना लक्ष्य करण्याची दहशतवाद्यांची योजना असू शकते. मात्र, सध्याचा तपास प्राथमिक स्तरावर असल्याने खात्रीशीर काहीही सांगता येत नाही, असेही श्रीवास्तव या वेळी म्हणाले. दहशतवादी हल्ला करण्याची राजस्थानमधील दहशतवाद्यांची तयारी कुठपर्यंत आली, हे पाहण्यासाठी आणि याबाबत समन्वय करण्यासाठी आपण अजमेरला आलो होतो, असे रहमानने पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली. स्फोटके बनविण्यात कुशल असलेल्या रहमानला आज दिल्ली येथे आणून विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्याला दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. राजस्थानमधून या दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याने येथील पोलिसांनी जोधपूर आणि जयपूरसह राज्यभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. विमानतळ, रेल्वे स्थानके आणि रुग्णालयांसह सर्व महत्त्वाच्या जागांवर पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे. रहमान ऊर्फ वकास हा असादुल्ला अख्तर ऊर्फ हड्डी याच्याबरोबर पाकिस्तानमधून प्रथम नेपाळमधील काठमांडू येथे आला. त्याला नेण्यासाठी यासीननंतर इंडियन मुजाहिदीनचा आता प्रमुख बनलेला तहसीन अख्तर ऊर्फ मोनू हा आला होता. वकास आणि हड्डी एकाच विमानातून काठमांडूला आले असले तरी त्यांची ओळख नव्हती. अख्तरने ती करून दिली. नेपाळमधून रहमान बिहारमधील दरभंगा येथे आला. येथे तो यासीन भटकळला भेटला. दिल्लीतील जामा मशिदीवर हल्ला केल्यानंतर तो पुन्हा बिहारला आला. यानंतर त्याने वाराणसी येथील शीतला घाटावर बॉंबस्फोट घडविला. या वेळी तयारी करतावेळी डिटोनेटरची जोडणी करताना त्याच्या डाव्या हाताच्या दोन बोटांना जबर जखम झाली होती. नंतर यासीनच्या आदेशानंतर रहमान मुंबईमधील भायखळा येथे हबीब अपार्टमेंट येथे राहात होता. येथेच रहमान, यासीन भटकळ, असादुल्ला अख्तर आणि तहसीन अख्तर यांनी मुंबई बॉंबस्फोटांची तयारी केली. त्यानंतर त्यांनी पुण्यात बॉंबस्फोट घडविले. नंतर तो असादुल्लासह मंगळूर येथे येऊन राहिला. नंतर दहशतवादी रियाझ भटकळच्या सांगण्यावरून त्याने हैदराबादमध्ये बॉंबस्फोट घडवून तो पुन्हा मंगळूरला आला. यासीन आणि असादुल्ला यांना अटक झाल्यानंतर रियाझने त्याला लपून राहण्यास सांगितले. त्यानंतर रहमान हा केरळ, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्रात फिरत होता. रियाझच्याच सांगण्यावरून तो काल अजमेरला आला आणि त्याला अटक झाली. महरूफ आणि वकार हे दोघेही जयपूरमधील अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत, तर अन्सारीचा डीटीपीफचा व्यवसाय आहे. रहमान ऊर्फ वकास याने पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले आहे. जामा मशिदीवर १९ सप्टेंबर, २०१० मध्ये झालेला हल्ला, ७ डिसेंबर २०१० ला वाराणसी येथे झालेला बॉंबहल्ला आणि १२ जुलै २०११ ला मुंबई येथे झवेरी बाजार आणि ऑपेरा हाउस येथे झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणात रहमानचा हात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. अशा प्रकारे अनेक महत्वाच्या बॉम्बस्फोटात हवे असलेले हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळाले आहेत. हे अतिरेकी आपल्या देशात अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी कार्यरत तर होतेच शिवाय ते आपल्या देशातील लोकशाहीचे मारेकरी आहेत. पाकिस्तानला भारतात अस्थिरता पाहिजे आहे आणि अमेरिकेचीही अशीच इच्छा असल्याने ते भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकला रसद पुरवित आहेत. त्यांचा हा कट उधळला गेला आहे.
------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel