-->
संपादकीय पान बुधवार दि. २६ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
दीदींची सर्व पक्षांच्या विरोधी एकाकी लढत
----------------------------------
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉँग्रेसच्या सर्वेसर्वा यांची यावेळी राज्यात सर्व पक्षांच्या विरोधात एककी लढत असेल. कॉँग्रेस, भाजपा व डावे पक्ष या पक्षांच्या विरोधी दीदींनी यावेळी एकट्याने दंड थोपटले आहेत. गेल्यावेळी त्यांच्या साथीला कॉँग्रेस पक्ष होता. मात्र यावेळच्या निवडणुकीत कॉँग्रेसशी ही त्यांचे फिसकटले आहे. गेल्या तृणमूलला १९ जागा मिळून मते ३१.२ टक्के पडली होती. तर डाव्या पक्षांना ४३.३ टक्के मते पडूनही जागा मात्र १५ पटकाविता आल्या होत्या. कॉँग्रेसच्या बरोबर दीदी असल्यामुळे अनपेक्षीतरित्या त्यांचे खासदार सहावर गेले होते. तर भाजपाने कधी नव्हे ते शून्य भेदून एक खासदार निवडून आणला होता. यावेळी मात्र जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात किमान चौरंगी लढती पहावयास मिळतील. २०११ साली झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूलने अनपेक्षित असे यश मिळविले आणि डाव्या पक्षांची या राज्यातली ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. मात्र सत्ता आल्यापासून दीदींची लोकप्रियता हळूहळू कमी होत चालली असून यावेळी त्यांची खरोखरीच कसोटी लागणार आहे. दीदींचा मुख्य भार हा शहरी मतदारांवर आहे. हा मतदार यावेळी त्यांच्या बाजूने कौल देईल का, त्यावर त्यांचे यशापयश अवलंबून राहिल. भाजपाने यावेळी गोरखा जनमुक्ती मोर्चाशी राज्यात जागावाटप केल्याने त्यांची सर्व भिस्त या नव्या मित्रावर आहे. खरे तर भाजपाला या राज्यात प्रवेश ममतादीदींनी करुन दिला. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना दीदींनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी दीदींचे भाजपाशी चांगले सूत जमले होते. त्यावेळी भाजपाने या राज्यात ममता दीदींचे बोट धरुन चंचूप्रवेश केला. यावेळी येथील मुस्लीम समाज कोणत्या पक्षाच्या बाजूने उभा राहतो त्यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत. राज्यातील काही मुस्लिमांच्या सांगण्यानुसार, नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी कॉँग्रेस व तृणमूल कॉँग्रेसने एकत्र येणे गरजेचे होते. परंतु तसे होणे अश्यक्य होते. गेल्या वेळचे हे मित्र आता परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. परंतु यावेळी ममता दीदींनी मोठ्या संख्येने मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. नरेंद्र मोदींची अलीकडेच झालेल्या सभेला मोठी गर्दी असली तरी येथे मोदींची काही हवा नाही असे बोलले जाते. यावेळी राज्यातील मुस्लिमांची मते डाव्यांना मिळणार का, हा खरा सवाल आहे. कारण गेले ४० वर्षे सत्तेवर असताना मुस्लिमांची मते नेहमीच डाव्या आघाडीच्या पारड्यात पडत होती. राज्यात डावी आघाडी सत्तेतून बाहेर गेल्यानंतरची ही लोकसभेची ही पहिली निवडणूक. त्यामुळे त्यांची यावेळी मोठी कसोटी लागणार आहे. त्यामुळे यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तरुणांना उमेदवारी मोठ्या प्रमाणात देऊन एक नवा पायंडा पाडला आहे. यातील २५ वर्षीय शेख इब्राहीम अली व २८ वर्षीय रिंकू नस्कर यांना कोलकात्यातून तिकिट दिले आहे. यातील शेख अली हा बंगाली भाषेत एम.ए. केलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता आहे. पूर्व मदिनापूर मतदारसंघातून ते तृणमूलच्या विद्यमान खासदाराशी लढत देतील. मार्क्सवाद्यांचा तरुण चेहरा म्हणून ओळखला गेलेला रिकू नस्कर ही काही कोणत्याही चळवळीत नव्हती. मात्र एक डावी पत्रकार म्हणून परिचित आहे. तसेच सध्या सी.पी.एम.ची कोलकतत्यातील नगरसेवक आहे. ७६ वर्षीय विद्यमान खासदार चौधरी मोहन जातुआ यांच्याशी तिची लढत होईल. अशा प्रकारे या निवडणुकीत सी.पी.एम.ने तगरुम चेहर्‍यांना वाव देण्यास सुरुवात केली आहे. हे स्वागतार्ह ठरावे. पश्‍चिम बंगालमध्ये यावेळी चौैरंगी लढती असल्याने कोणाचा विजय होईल ते आता काहीच सांगता येणार नाही. ममता दीदी आपले वर्चस्व पुन्हा स्थापन करतील की डावी आघाडी पुन्हा दीदींवर मात करील हे पहायचे.
------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel