-->
संपादकीय पान बुधवार दि. २६ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
शरद पवारांची राजकीय गुगली
--------------------------
क्रिकेटमध्ये गुगली टाकणारा गोलंदाज कधी कुणाचा बेसावधपणे बळी घेईल हे सांगता येत नसते. गुगलीचे हेच वैशिष्ट असते. गुगलीने चेंडू कधी फिरकी घेतो हे कळत नसते. ज्यावेळी एकदम त्रिफळा उडतो त्यावेळी फलंदाजाला आपण आऊट झाल्याचे समजते. क्रिकेटमधील या गुगली प्रमाणे राजकीय गुगली टाकण्यात माहीर असलेले शरद पवार यांनी वाशी येथील एका सभेत बोलताना शाई फुसून मतदानाला पुन्हा या पण मतदान करा असे सांगून एक जोरदार गुगली टाकली. आपण काही तरी चुकीचे बोललो, असे त्यांच्या नेहमीप्रमाणे लगेच लक्षात आले आणि त्यांनी लगेच खुलासा केला की ही गंमत होती, ही टिंगल होती; पण माध्यमांनी त्याचा विपर्यास केला. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे पवारांची ही गुगली होती. परंतु त्यांनी गुगली टाकल्यावर लगेचच नो बॉल असल्याचे जाहीर करुन टाकले. तिकडे शरदरावांचे लुटुपुटतले विरोधस शिवसेनाप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी लगेचच जाहीर करुन टाकले पवार खरेच बोलले. पवारांचे वय झाले असावे त्यामुळे त्यांच्या तोंडातून हेशब्ध निसटले असावेत असे म्हणणेही योग्य नाही. कारण अजून पवारांचे तेवढे काही वय झालेले नाही. अडवाणी, मनमोहनसिंग यांच्या वयाचा विचार करता पवार अजूनही तरुण आहेत आणि त्यामुळेच ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे पवार हे काही चुकून बोललेले नाही. ते खरेच बोलले असावेत. मागे एकदा भाजपाचे गोपीनाथ मुंडे यांनी देखील असेच वक्तव्य केले होते आणि त्यांना शेवटी निवडणूक आयोगाकडे खुलासा करावा लागला होता. त्यांचे म्हणणे होते की २००९ च्या निवडणुकीत आपल्याला प्रचारासाठी आठ कोटी रुपये खर्च करावा लागला. प्रचार इतका महाग झाला आहे, असे त्यांना सांगायचे होते; पण चुकून त्यांनी आपल्याच मतदारसंघाचा दाखला दिला. अर्थातच त्यांना लगेच खुलासा करावा लागला. आता निवडणूक आयोग त्यावर काय निर्णय घेते, याची वाट पाहायची. खरे म्हणजे गोपीनाथरावांना चांगली संधी होती. यानिमित्ताने निवडणूक खर्चाचे आणि पर्यायाने तसा खर्च करून निवडून येणार्‍या नेत्यांचे जे ढोंग देशभर सुरू आहे, त्यावर देशात एक गंभीर चर्चा होऊन लोकशाहीच्या शुद्धीकरणाचे ऐतिहासिक काम सुरू झाले असते. पण त्यात त्याचे नेते आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मोठी अडचण झाली असती. कारण आपल्याला पंतप्रधापदाच्या शैर्यतीसाठी तयारी करण्यासाठी मोदींनी किती करोडो रुपये रुपये खर्च केले असतील त्याच अंदाजच न बांधलेला बरा. अहमदाबादमध्ये गेले वर्षभर त्यांच्या ताफ्यात असलेल्या सुमारे दीडशे लोकांच्या प्रचाराच्या टीमवर मोदींनी किती खर्च केला आहे त्याचे आकडे न बाहेर पडले तरच योग्य ठरेल. कारण या खर्चाचा आकडा जाहीर झाल्यास आपल्याकडील लोकशाहीची आणि निवडणूक आयोगाटी थट्टा ठरेल. निवडणूक खर्चाची ही चर्चा थांबत नाही तोच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी असाच एक गौप्यस्फोट घडवून आणला आहे. २००९ च्या निवडणुकीत आपल्या काकांच्या म्हणजे गोपीनाथरावांच्या प्रचाराची सूत्रे आपल्याकडे होती आणि त्यांना एक लाख बोगस मतदान घडवून आणण्याची महान कामगिरी आपण केली होती, हे त्यांनी २०१४ मध्ये बीडमध्ये म्हणजे आपल्या जन्म आणि कर्मभूमीत प्रांजळपणे सांगून टाकले! सभेला अर्थातच मोठे साहेब उपस्थित होते. पक्षातील तरुण पिढी आधीच आपल्या पुढे निघून गेल्याची जाणीव साहेबांना तेथे झाली असावी आणि म्हणूनच त्यांनी दोन दिवसांतच डबल शिक्का हाणण्याची गंमत केली असावी, असाही एक अंदाज आहे. कारण पक्ष कोणताही असो, तरुण पिढीला पुढे येऊ द्यायचे नाही, (आपल्या घरातील सोडून) यावर सर्व ज्येष्ठांचे एकमत आहे! साहेबांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तर अशा गमतींसाठी प्रसिद्धच आहेत. ते दुष्काळी भागात जाऊन लघुशंका करू का, असा क्रूर प्रश्न तर विचारू शकतातच; पण अर्थसंकल्प मांडतानाच राज्याची तिजोरी रिकामी असल्याची एक वेगळीच गमतीदार माहिती देऊन सगळ्यांना चकित करू शकतात! गमतींचा हा सिलसिला असाच चालू राहो. कारण राजकारणातून समाजकारण किती होते, जनतेचे आयुष्य किती सुसह्य होते, भ्रष्टाचार किती कमी होतो, शिक्षण, आरोग्य, शेती या मूलभूत प्रश्नांची चर्चा किती होते, देशाचे आणि जनतेचे बिघडलेले अर्थकारण किती सुधारते, हे माहीत नाही. मात्र, राजकीय सभांतून हल्ली चांगले लाइव्ह मनोरंजन होते आहे, हे मात्र खरे आहे. जनतेला जर तेच पाहिजे असेल तर आपण ते करू शकतो, असा विश्वास ज्येष्ठ नेते देत आहेत, एवढेच. लोकहो, दोष त्यांचा नाही. ते तर राजकारणाकडे गंमत म्हणून पाहणार्‍या, क्षुल्लक गरजांसाठी लाचारीचे प्रदर्शन करणार्‍या भारतीय जनतेची मागणी पूर्ण करत आहेत! प्रश्न आहे, जनता त्याकडे आणखी किती काळ गंमत म्हणून पाहणार आहे? त्यामुळे आता आपल्याकडील लोकशाहीकडे सहा दशकानंतर नव्याने पहाण्याची गरज आहे. आपल्यातील दोष बाजूला सारुन आपल्याला सुधारणा कराव्या लागतील. निवडणूक आयोग कितीही कडक झाला तरी पेड न्यूजपासून उमेदवाराचा वारेमाप खर्च हा होतच आहे. हे कधी थांबणार हाच खरा सवाल पवारांच्या गुगलीच्या निमित्ताने पडतो.
---------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel