-->
संपादकीय पान गुरुवार दि. २७ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
शेअर बाजारातील निवडणूकपूर्व सट्टेबाजी
------------------------------
देशात निवडणुकीची हवा हळूहळू तापू लागली असताना शेअर बाजारात तेजीचे पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. गेली दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने २२ हजारांचा पल्ला ओलांडला आहे. शेअर बाजारात आलेल्या या तेजीबद्दल अनेकांना आश्‍चर्य वाटेल. परंतु सध्याच्या राजकीय धामधुमीत सट्टेबाज दलाल व विदेशी वित्तसंस्था समभागांची तुफान खरेदी करुन सट्टेबाजी करीत आहेत. तसे पाहता सध्याच्या काळात समभागांमध्ये तेजी येण्यासाठी काही पोषक वातावरण नाही. देशात विकास दर कमी झालेला असताना तसेच विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षात माघारी घेतलेली असताना गेले काही महिने सेन्सेक्स घसरतच होता. परंतु आता अचानक शेअर नेर्देशांक एका नव्या विक्रमी उंचीवर गेल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शेअर बाजारातील दलाल मंडळी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार येणार असे ठाममणे सांगतात. परंतु हे त्यांचे गणित केवळ आशावादावर आधारितच आहे. देशातील सध्याची स्थिती कोणालाच पोषक नाही. सत्ताधारी कॉँग्रेस पक्षाला तर सध्या अतिशय वाईट दिवस आहेत. कॉँग्रेस पक्ष यावेळी जागांचे शतकही गाठणे कठीण आहे. मोदी यांच्या नावाची केवळ हवाच माध्यमांनी तयार केली आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मोदींना सत्तेपासून रोखण्यात एक महत्वाचा घटक ठरेल. अशा वेळी तिसरी आघाडी महत्वाची भूमिका बजावू शकणार आहे. अशी राजकीय स्थिती असतानाही शेअर बाजारात तेजी का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. शेअर बाजाराला तेजी खेचून आणण्यासाठी कोणतीही अफवा किंवा एखादे कारण पुरेसे ठरते. गेल्या काही दिवसात अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याची चिन्हे दिसत आहेत. चालू खात्यातील तूट कमी झाली आहे, निर्यात वाढली आहे व रुपयाची वधारुन ६०वर डॉलरच्या तुलनेत पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेचे हे काही आशावादी धागे पकडून सध्या शेअर बाजारात तेजी आली आहे. ही तेजी येण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे विदेशी वित्तसंस्थांनी गेल्या महिन्याभरात सुमारे १५,५०० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. त्यामुळे भारतात कोणाचेही सरकार आले तरी ते स्थिर असेल आणि चांगले सरकार असेल असा विश्‍वास विदेशी गुंतवणूकदारांना वाटत आहे. केवळ या आशावादावर तेजीचे सध्या इमले बांधले जात आहेत. अर्थातच ही तेजी काही मर्यादीत समभागांपुरतीच आहे. सेन्सेक्स हा ३० समभागांच्या आधारावर काढला जातो आणि याच समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करुन सेन्सेक्स वधारण्यात हातभार लागला आहे.  मात्र काही मर्यादीत मध्यम आकारातील कंपन्यांचे समभागही वधारले आहेत. त्यामुळे ही तेजी काही परिपूर्ण नाही. निवडणुकानंतर कोणाचेही सरकार आले तरी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे तिला काही धक्का लागणार नाही. अमेरिकेत गेल्या पाच वर्षात मंदीने घेरले आहे मात्र आपल्याकडे आपली अर्थव्यवस्था स्वबळावर उभी आहे. फक्त या अर्थव्यवस्थेला स्वबळाचे पाठबळ दिल्यास ती अधिक वेगाने भरारी घेऊ शकेल. थेट विदेशी गुंतवणुकीचे पायाभूत क्षेत्रात मोठे प्रकल्प आल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. विदेशी गुंतवणूकदार आपल्याकडे येत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की, आपल्या अर्थव्यवस्थेविषयी विदेशी गुंतवणूकदार आशावादी आहेत आणि भविष्यात त्यांना नवीन सरकार स्थापन झाल्यावर गुंतवणूक करावयाची आहे हे त्यांनी सध्या गुंतवणूक करुन दाखवून दिले आहे. त्यामुळे सध्या बाजारात असलेल्या तेजीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्याकडे पुढील दोन महिन्यात नव्याने सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार कोणाचे असेल कितपत स्थिर असेल याचा एवढ्या लवकर अंदाज देणे कठीण असले तरीही शेअर बाजार त्याबाबतीत आशावादी दिसतो असेच सद्याची बाजारातील तेजी सांगते.
------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel