-->
संपादकीय पान गुरुवार दि. २७ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
वाराणसीतील लढाई
-----------------------
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी वाराणसीतून निवडणुकीला उभे राहाण्यासाठी अर्ज भरला आहे. त्यापूर्वी त्यांनी गंगा नदीत जाऊन स्नान केले व देवदर्शन घेऊन अर्ज भरण्याचा निर्णय एका जाहीर सभेत घेतला. त्यापूर्वी त्यांच्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी अंडी फेकली व काळी शाई फेकण्याचे धंदे केले. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्याला घाबरणार नाही असे ठणकावून सांगून केजरीवाल यांनी आपण वाराणसीतूनच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहाणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले. उत्तरप्रदेशातील वाराणसी हा लोकसभा मतदारसंघ नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. येथे २० टक्के मुस्लिम व तेवढेच हिंदू ब्राम्हण व क्षत्रिय मते आहेत. त्याशिवाय तेथे १५ टक्के पटेल, सात टक्के भाषिक अल्पसंख्यांक, १३ टक्के मागासवर्गीय, १० टक्के यादव व १५ टक्के वैश्य असे समाजाची वाटणी आहे. येथील ३५ ते ४४ या वयोगटातील २५ टक्के मतदार आहेत. गेल्या वेळी या मतदारसंघातून भाजपाचे मुरली मनोहर जोशी विजयी ठरले होते. मात्र त्यांना सहजरित्या विजय प्राप्त झाला नव्हता तर त्यांना बहुजन समाज पक्षाच्या मुक्तार अन्सारी यांनी जोरदार लढत दिली होती. आजवरचा इतिहास पाहता येथून १९५७, १९८० व १९८४ साली कॉँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. तोपर्यंत हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र १९८९ साली कॉँग्रेसच्या या बालेकिल्याला जनता दलाने जोरदार धडक दिली व हा मतदारसंघ हिसकावून घेतला. मात्र त्यानंतर १९९१, १९९६,१९९८ १९९९  या सलग चार वेळा भाजपाचे उमेदवार येथून विजयी झाले होते. त्यांना दुसर्‍या क्रमांकाची लढत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराने दिली होती. २००४ साली येथून प्रदीर्घ काळाने पुन्हा एकदा कॉँग्रेसला विजय मिळविता आला पंरतु त्यांना तो टिकविता आला नाही. २००९ साली भाजपा येथून विजयी झाला आणि आता यावेळी नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्यापासून या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. खरे तर यावेळी भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांनी हा मतदारसंघ सोडावयाचा नव्हता. त्यासाठी त्यांनी पक्षात बरीच खळखळ केली होती. परंतु मोदींनी शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दबाव आणून या मतदारसंघातून आपणच अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मुरली मनोहर जोशी यांना हा मतदारसंघ सोडणे भाग पडले. या मतदारसंघावर कॉँग्रेस, कम्युनिस्ट, भाजपा व बहुजन समाज पक्ष यांचे वेळोवेळी वर्चस्व होते. परंतु एकाच पक्षाची अशी मक्तेदारी या मतदारसंघावर कधीच नव्हती. आता देखील मोदी व केजरीवाल यांच्या लढतीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघावर केंद्रीत झाले आहे. अद्याप कॉँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. आता एकूणच उत्तरप्रदेशात कॉँग्रेसची ताकद क्षीण झालेली असल्याने व येथे फारसा प्रभाव राहिलेला नसल्याने कॉँग्रेस कोण उमेदवार देणार याला फारशी किंमत नाही. मात्र कॉँग्रेसची अजूनही येथे काही मुस्लिम व ब्राह्मण मत आहेत आणि ती त्यांना दरवेळी मिळत असतात. यावेळी जर कॉँग्रेसने एखादा सेलिब्रेटी उमेदवार दिला तरच येथीव निवडणुकीत आणखी रंगत भरली जाणार आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी दावा केलेला असल्यामुळे त्यांना उत्तरप्रदेशातून निवडणूक लढवून आपण केवळ गुजरातचे नाही तर संपूर्ण देशाचे व उत्तरभारतातील केंद्रभागी असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणे भाग होते. त्यासाठी त्यांनी वाराणसी या तशा हिंदू व मुस्लिम समसमान वस्ती असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्कल लढविली. आम आदमी पक्षाचा जन्मच अलीकड़चा असल्याने त्यांचे वाराणसीत फारसे अस्तित्व नाही. परंतु नरेंद्र मोदींशी लढत देण्याचे जाहीर केलेले असल्याने अरविंद केजरीवाल उर्फ ए. के. हे येथून निवडणूक लढवित आहेत. आपल्या पहिल्याच दाहीर सभेत त्यांनी कॉँग्रेस व भाजपा या दोघांना एकाच तराजूत मापले आहे. मोदींचा गुजरात विकास कसा बोगस आहे व माध्यमांना हाताशी धरुन ते कसे गुलाबी चित्र निर्माण करतात हे त्यांनी काही उदाहरणे देऊन सांगितले. मोदींनी शेतकर्‍यांना कसे देशोधडीला लावले व भांडवलदारांचे हित कसे साधले आहे हे केजरीवाल वाराणसीतील सभेत जोरदारपणे मांडत आहेत. त्यामुळे मोदींची जी काही तथाकथीत हवा आहे त्यातील हवा काढण्याचे काम केजरीवा जोरदारपणे करीत ाहेत. त्यामुळे मोदींना ही निवडणूक सोपी नाही. आम आदमी पक्षाचे अस्तित्व इकडे नगण्य असले तरी त्यांना अन्य काही पक्ष प्रामुख्याने बसपा व काही प्रमाणात कॉँग्रेसही पाठबळ देण्याचे काम करीत आहेत अशी चर्चा आहे. मोदींवर नाराज असलेले भाजपातील काही घटकही केजरीवाल यांचा वाराणसीत विजय व्हावा यासाठी सक्रिय आहे. त्यामुळे अगरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे अस्तित्व नगण्य असले तरी त्यांना बाहेरुन अनेकांचे समर्थन लाभणार आहे. केवळ मोदी नको यासाठी केजरीवाल यांचे समर्थन वाढत चालले आहे. केजरीवाल हे स्वत वाराणसीमध्ये काही काळ प्रचारासाठी तळ ठोकून आसणार आहेत. तसेच आम आदमीची दिल्लीतील कार्यकर्त्यांची एक फळी वाराणसीत मुक्काम करणार असून घरोघरी ते फिरणार आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना कमी लेखूनही चालणार नाही. वाराणसीची ही लढाई ऐतिहासिक होणार हे नक्की.
---------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel