-->
वेध उत्तरप्रदेश निवडणुकांचे

वेध उत्तरप्रदेश निवडणुकांचे

संपादकीय पान बुधवार दि. ०४ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वेध उत्तरप्रदेश निवडणुकांचे
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशातील राज्य विधानसभेची निवडणुक आता पुढील वर्षी येऊ घातली आहे. सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेससाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे. ं२०१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून एका मागून एक निवडणुकीत पराभवाचा झटका बसत असलेल्या कॉंग्रेससाठी पुढीलवर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातून मोफत गॅस जोडणी योजना सुरु करुन एक प्रकारे प्रचाराचा नारळच फोडला आहे. तर यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वात्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची प्रचारयंत्रणा हातात असलेले प्रशांत किशोर हे यावेळी उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीत कॉँग्रेससाठी काम करतील. त्यामुळे कॉँग्रेसची यावेळी वेगळी स्ट्रॅटीजी असेल. आजवर कॉँग्रेस आपल्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अगोदर कधीच जाहीर करीत नाही. मात्र यावेळी धोरणाचा एक भाग म्हणून यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाणार आहे.  या निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून येत्या महिन्याच्या अखेरीस कॉंग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून, मिळालेल्या माहितीनुसार तो ब्राह्मण समाजातील नेता असण्याची शक्यता आहे. निवडणूक व्यवस्थापनासाठी प्रख्यात असलेले प्रशांत किशोर यांनी गांधी घराण्यातीलच प्रियांका किंवा राहुल यांनीच या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्त्व करावे, असा सल्ला दिला असल्याचे समजते. प्रियांका किंवा राहुल यांनी या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्त्व केले तर नक्कीच निकाल वेगळे असतील, असे कॉंग्रेसमधील एका गटालाही वाटते आहे. जर प्रियांका किंवा राहुल गांधी यांनी या निवडणुकीचे नेतृत्त्व करण्यास नकार दिला, तर ब्राह्मण समाजातील एखाद्या नेत्याला नेतृत्त्व करण्याची संधी द्यावी, असे मत प्रशांत किशोर यांनी मांडले आहे. अर्थात याबाबत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या १९ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पॉँडीचेरी येथील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतरच पक्ष उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असून, त्यावेळीच कोण या निवडणुकीचे नेतृत्त्व करेल, हे स्पष्ट होईल. उत्तरप्रदेश हे राज्य मोठे असल्याने त्यावर ताबा कोणाचा राहिल यावर बरेचसे भविष्यातील गणित अवलंबून असते. यावेळी मायावतींचेही पारडे जड असल्याचे बोलले जाते. परंतु कॉँग्रेस आपले आजवर गमावलेले यश पुन्हा मिळविल का? तसेच भाजपा आपले वर्चस्व कायम राखणार का? या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यास अजून बराच वेळ असला तरीही उत्तरप्रदेशाला निवडणुकीचे वेध लागले आहेत हे मात्र खरे.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "वेध उत्तरप्रदेश निवडणुकांचे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel