-->
संघर्ष सुरु...

संघर्ष सुरु...

शनिवार दि. 21 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
संघर्ष सुरु...
भाजपाने आयोजित केलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यात त्यांनी युतीत बिघाडी होईल अशी भाषा केली आहे. त्यामुळे यावेळी भाजपाला शिवसेनेची गरज नाही हे स्पष्ट दिसते. मात्र शिवसेनेचे लाचार नेते मात्र अजूनही युतीची भाषा करीत आहेत. युतीशिवाय आपल्याला फारसे यश लाभणार नाही असा त्यांचा अंदाज करा असला तरी भाजपाची सत्तेसाठी लाचारी कशाला स्वीकारायची? असा स्वाभिमानी विचार काही शिवसेनेचे नेते सध्या तरी करताना दिसत नाहीत. भाजपाची ही महाजनादेश यात्रा अनेक ठिकाणी फ्लॉप शो ठरली आहे. राजसत्तेच्या व धनसत्तेच्या जोरावर ही यात्रा यशस्वी करण्याचे चित्र माद्यमांना हाताशी धरुन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या फसवणुकीप्रकरणी गाजत असणार्‍या कडकनाथ कोंबडी प्रकरणात सांगली आणि इस्लामपूरमध्ये यात्रेच्या रथावर अंडी आणि कोंबड्या फेकण्याची घटना घडली. याचा फारसा बोभाटा होणार नाही याची भाजपाने दखल घेतली. जर हे सरकार जनसामान्यांच्या बाजूने आहे व त्यांनी गेल्या पाच वर्षात अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत तर या घटना घडावयास नको होत्या. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मोदींनी प्रचाराचा नारळच फोडला आहे. यात त्यांनी शिवसेनेला टार्गेट केले. आपण व राज्य सरकारने बहुमत नसताना विकास किती केला हे भरभरुन सांगितले. हे सर्व करीत असताना गल्या काही महिन्यत वाढलेली बेकारी, सध्याची मंदी, थांबलेली गुंतवणूक, राज्यातील ओला व सुका दुष्काळ, शेतकरी आत्महत्या याबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे जनतेला भेडसावित असलेल्या प्रश्‍नाबाबत पंतप्रधानांनी चकार शब्द काढला नाही. पाकिस्तान, काश्मिर, राममंदिर या प्रश्‍नांवर आपले भाषण केंद्रीत करुन लोकांना मूळ प्रश्‍नापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला व भावनिक प्रश्‍नावर टाळ्या मिळवून घेतल्या. हे प्रश्‍न उपस्थित करुन टाळ्या मिळविणे सोपे आहे, परंतु जनतेच्या प्रश्‍नांला हात घालून त्याची सोडवणूक करणे ही बाब सोपी नाही. यापूर्वीचे मोदींचे निवडणूक दौरे लक्षात घेतले तर मोठया राज्यांमध्ये निवडणुकीच्या आधी ते मोठया रकमेच्या घोषणा करत असतात. महाराष्ट्रात तशी काही घोषणा त्यांनी केली नाही. केंद्राने पाकिस्तान, चीनसह जगभरातून कांदा आयात करण्याला ज्या नाशिकच्या शेतक़र्‍यांचा विरोध आहे तिथेच ही यात्रा होती. परंतु त्याबाबतही मोदींनी मौनच पाळले. नाशिकमध्ये याबाबतही पंतप्रधान आपली भूमिका स्पष्ट करतील अशी आशा होती. सत्ताधार्‍यांकडून जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची अपेक्षा असते. असा प्रकारे सत्ताधार्‍यांच्या यात्रेची अखेर झाली. यातून जनतेशी संवाद काय साधला व त्याचा जनतेला काय उपयोग झाला हे कुणीच सांगू शकणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची यात्रा राज्यात नेली होती. याला तर जनतेचा फारसा पाठिंबा लाभला नाही. अदित्य ठाकरे यांना युवा नेते म्हणून पुढे आणण्याचे व भावी मुख्यमंत्री प्रोजेक्ट करण्याचा शिवसेनेचा डाव यातून पूर्णपणे फसला आहे. राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे यांनीही शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. त्यांना असलेला सेलिब्रेटींचा स्टेटस पाहता लोक गर्दी करीत होते. मात्र सध्या त्यांचे अनेक सरदार भाजपात गेले असतानाही शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. शरद पवारांनी देखील राज्यातील आपल्या दौर्‍यास सुरुवात केली आहे. यावेळी पवारांची खर्‍या अर्थाने कसोटी लागणार आहे. आजवरची त्यांची राजकीय पुण्याई त्यांना यशाच्या शिखरावर नेऊ शकते का ते पहावे लागेल. हतबल झालेली कॉँग्रेस अजूनही पराभवाच्या धक्कयातून काही बाहेर आलेली नाही, हे एक मोठे दुर्दैव आहे. काँग्रेसची नाना पटोले काढणार होते ती भांडाफोड यात्रा काही पक्षांतर्गत वादामुळे निघू शकली नाही. वंचित आघाडीनेही नागपूर ते कोल्हापूर सत्तासंपादन यात्रा काढून आधी दोन्ही काँग्रेसने आणि आता कार्पोरेट कंपन्यांना मोठया सवलती देऊन युतीने हजारो कोटी लाटले असा आरोप केला आहे. वंचितांचे एकूणच राजकारण हे भाजपाला पोषक ठरणारे आहे. एकूणच आता बहुतेक राजकीय पक्षांच्या यात्रा संपल्या आहेत. त्यामुळे आता रस्त्यावरील संघर्षास सुरुवात होईल. मोदींच्या कालच्या भाषणावरुन तरी युती होणार नाही असेच दिसते. झालीच तर पाडापाडीचे राजकारणही या निवडणुकीत दिसेल यात शंकाच नाही. नेत्यांच्या यात्रा संपल्या तरी राजकारणाचा खेळ मतदानाच्या आधीपर्यंत पाहत बसणेच मतदाराच्या हाती आहे. कारण या यात्रांमधून मतदाराला काय मिळाले हा प्रश्‍नच आहे. पंतप्रधानांकडून राज्याला काही मिलण्याची आशा संपली आहे. केवळ गप्पाच झाल्या आहेत. अशाने जनतेचे प्रश्‍न सुटणारे नाहीत. सत्ताधार्‍यांच्या विरोधात जनतेत असंतोष ठासून भरला आहे. मात्र त्याला वाटा मोकळी करुन देण्याचे काम विरोधी पक्षांनी करण्याची गरज आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप यांच्यासह विविध पक्षांनी एकत्र येऊन सध्याचे सरकार पुन्हा येऊ न देण्याचे ठरविले आहे. त्यांना जनतेची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे.
--------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "संघर्ष सुरु..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel