-->
मंदीची काजळी... सोन्याला झळाळी! (अग्रलेख)

मंदीची काजळी... सोन्याला झळाळी! (अग्रलेख)

Aug 29, 2012, EDIT
जागतिक अर्थव्यवस्था व पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्था उतरणीला लागली असताना सोन्याच्या किमतीची चढती कमान सध्या कायम आहे. ज्या वेळी एकूणच विकासाचा वेग मंदावतो त्या वेळी शेअर बाजारांची घसरण सुरू होते. काळे सोने अर्थात खनिज तेलाचा दरही या मंदीच्या तडाख्याने भरडतो. अशा वेळी गुंतवणूकदारांचे पाय  सोन्यातील गुंतवणुकीकडे वळतात असा एक अलिखित नियमच आहे. मात्र गेली तीन वर्षे अमेरिका, युरोपियन देशातील अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात सापडल्या असताना खनिज तेलाच्या किमती म्हणाव्या इतक्या वेगाने घसरलेल्या नाहीत. अशा वेळी मात्र सोन्याच्या किमतीने नवीन लकाकी धारण केली आहे. सोमवारी देशातील सोन्याच्या किमतीने दहा ग्रॅममागे 31 हजार रुपयांची पातळी पार केली. सोन्याच्या किमतीचा आजवरच्या इतिहासातील हा नवा उच्चांक  आहे. सध्याच्या किमतीची वाटचाल पाहता यंदा सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सोन्याने गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा दिला होता. त्यामुळे मंदीच्या काळात शेअर बाजारात पैसे गुंतवण्याऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याचा फायदेशीर पर्याय उपलब्ध झाला होता. सोन्याच्या किमतीचा 1980 पासूनचा आढावा घेतल्यास काही अपवादात्मक वर्षे वगळता सोन्याच्या किमती सतत वाढतच गेल्या आहेत. 1980 मध्ये 1300 रुपये असलेली किंमत आता 31 हजारांवर पोहोचली आहे. यंदाही सलग 12 व्या वर्षी सोन्याच्या किमती वाढल्या. युरोपातील काही देशांत दिवाळखोरीची असलेली स्थिती, अमेरिकेतील मंदी यामुळे  सध्या गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत. या आर्थिक स्थितीत किमान दोन वर्षे तरी सुधारणा होण्याची शक्यता कमीच असल्याने सोन्याच्या किमती अशा प्रकारे किमतीचे नवनवीन उच्चांक करीतच राहतील, यात शंका घेण्याचे कारण नाही. सोन्याच्या जागतिक बाजारपेठेत भारत व चीन हे दोन मोठे ग्राहक आहेत. गेल्या वर्षी आपण 960 टन सोन्याची आयात केली होती. मात्र यंदा ही आयात सुमारे 250 टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे. यामागे सोन्याच्या  वाढलेल्या किमती हे कारण नसून सोन्याची तस्करी हे मुख्य कारण आहे. 80 वा 90 च्या दशकात आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेस सुरुवात होण्यापूर्वी आपल्याकडे सोन्यावर मोठ्या प्रमाणावर आयात कर होता. त्यामुळे देशांतर्गत किमती व जागतिक बाजारपेठेतील किमती यात मोठी तफावत असे. त्यामुळे तस्करीला मोठा वाव होता. अगदी 70-80च्या दशकात हिंदी चित्रपटातील व्हिलनही प्रामुख्याने सोन्याच्या तस्करीतच गुंतलेला दाखवला जाई. परंतु सोन्यातील निर्बंध दूर केल्यावर नेमकी उलट परिस्थिती झाली. जागतिक व आपल्या देशातील किमती समान पातळीवर आल्याने तस्करी करण्यात काहीच फायदा राहिला नव्हता. परिणामी  सोन्याच्या तस्करीस पूर्णपणे आळा बसला. मात्र आता  80 च्या दशकातील सोने तस्करीला पोषक वातावरण पुन्हा तयार होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तशात  गेल्या वर्षभरात सुमारे एक हजार कोटी रुपयांचे तस्करी झालेले सोने जप्त करण्यात आले आहे. ही तस्करी वाढण्यामागे सरकारी धोरण कारणीभूत आहे हे नक्की. जानेवारी 2012 मध्ये सरकारने सोन्यावरील आयात कर 2 टक्के लावला. त्यानंतर अर्थसंकल्पात हा कर पुन्हा वाढून 10 टक्क्यांवर नेला. सरकारच्या या वाढीव करामुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीपेक्षा देशातील सोने प्रति दहा ग्रॅम दीड हजार रुपयांनी महाग झाले. हाच वाढता कर सोन्याच्या तस्करीला प्रोत्साहन देणारा ठरला आहे. गेल्या वर्षी भारताने 60 अब्ज डॉलरच्या किमतीचे सोने आयात केले. परंतु त्यापेक्षा जास्त आयात खनिज तेलाची झाली होती. देशाच्या आयात-निर्यात व्यापा-यातील तुटीच्या 50 टक्के रक्कम आपल्याला सोने आयातीसाठी खर्च करावी लागली होती. ही तूट कमी करण्यासाठी म्हणूनच सोन्याच्या आयातीवरील करात वाढ करण्यात आली आहे. अशा वेळी सोन्याची तस्करी कमी करायची असल्यास सोन्यावरील आयात करात कपात करण्याशिवाय सरकारपुढे अन्य पर्याय नाही. एकीकडे सर्वसामान्यांना  सोन्यातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित वाटत असली तरीही या गुंतवणुकीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला काडीमात्र फायदा होत नाही. ही एक ‘मृत गुंतवणूक’ म्हणूनच ओळखली जाते. म्हणूनच अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर पी. चिदंबरम यांनी सोन्यातील गुंतवणूक म्युच्युअल फंडाकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते. मात्र सोन्यातील गुंतवणुकीला जे स्थैर्य आहे तसे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला नाही हे वास्तवही नाकारता येत नाही. सी-सॉप्रमाणे  शेअर बाजारातील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत वध-घट होत असते. शिवाय सोन्यातील गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गरज भासल्यास कोणत्याही क्षणाला याचे पैशात रूपांतर करता येते. त्यामुळे सोन्याची व म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीची तुलना करता येणार नाही वा सोन्याचा गुंतवणूकदार अन्य कुठेही वळवणे कठीणच होऊनच बसते. आपल्या देशात सर्वच आर्थिक थरांतील लोक मुख्यत: सोन्यात गुंतवणूक करतात. चीनमध्येही अशीच स्थिती आहे. मात्र अमेरिका वा युरोपातील लोक सोन्यातील गुंतवणूक करण्याऐवजी हाती असलेला पैसा खर्च करण्यात समाधान मानतात. आपल्याकडे रुजलेली सोने खरेदीची पारंपरिक मानसिकता ध्यानात घेता, सोने कितीही महाग झाले तरी गुंतवणूकदारांची संख्या चढतीच राहणार आहे.   वाढत्या किमतीमुळेही सोने खरेदीचे आकर्षण कायमच राहणार आहे.

0 Response to "मंदीची काजळी... सोन्याला झळाळी! (अग्रलेख)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel