-->
गॅस महागणारच / गुगल 21 वर्षाचे झाले!

गॅस महागणारच / गुगल 21 वर्षाचे झाले!

शनिवार दि. 28 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
गॅस महागणारच
सध्या सर्वच क्षेत्रातील महागाई आपला नवीन उंचांक गाठत आहे. एकीकडे बेरोजगारी व सध्याच्या नोकर्‍या असलेल्यांच्याही असलेली नोकरकपातीची तलवार असताना महागाई वाढत चालली आहे. स्वयंपाकाचा गॅस हा प्रत्येकाची अत्यंत गरजेची वस्तू आहे. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने जागतिक पातळीवर किंमती कमी असतानाही गॅसच्या किंमती वाढवत नेल्या होत्या. आता तर जागतिक पातळीवर खनिज पदार्थाच्या किंमती वाढत असताना स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती वाढणार हे ओघाने आलेच आहे. त्यामुळे मोदी सरकारचे अच्छे दिन हे हेच आहेत, असे म्हणावेसे वाटते. पावसाळ्यामध्ये गॅस सिलिंडरच्या मागणीत घट होते. मात्र त्यानंतर सणासुदीचे दिवस येत असल्याने त्या काळात विशेषत: नवरात्र, दिवाळीमध्ये एलपीजीच्या मागणीत कमालीची वाढ होते. ही वाढ अपेक्षित असल्याने सरकारी इंधन कंपन्यांकडून दरवर्षी त्याबाबत पुरेशी खबरदारी घेतली जाते. ऐन दिवाळीतही घरगुती सिलिंडरची मागणी वेळेवर पूर्ण केली जाते. यंदाचे वर्ष मात्र त्यास अपवाद ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सौदी अरेबियाकडून होणार्‍या इंधनपुरवठ्यात घट झाल्याने इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सरकारी कंपन्यांना धावपळ करावी लागत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होणारी इंधनाची दोन जहाजे सौदीकडून विलंबाने येणार आहेत. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरवठ्याअभावी स्वायंपाकाच्या गॅसच्या किंमती आता वाढण्याचा धोका आहे. येत्या महिन्यात दिवाळी असल्याने त्या काळात सिलिंडरच्या मागणीत वाढ होणार हे साहजिक आहे. मात्र सौदीतील बदलत्या परिस्थितीमुळे त्यांच्याकडून होणारा इंधन पुरवठा काहीसा घटला आहे. सौदीने निर्यात घटवली असली तरी जास्तीत जास्त म्हणजे नेहमीपेक्षा अधिक इंधन मिळवण्याच्या प्रयत्नात भारतीय सरकारी कंपन्या आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबर हे महिने आपल्यासाठी विशेष असतात. या कालावधीत इंधन तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जाते. सणासुदीतील मागणी पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त एलपीजी आयात करण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही. एलपीजी आयात करणार्‍या देशांच्या सूचीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एकूण देशांतर्गत गरजेपैकी निम्मी गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. यापैकी बहुतांश एलपीजी हा मध्यपूर्वेतील देशांतून म्हणजे सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि कुवेत या देशांतून विकत घेतला जातो. पेट्रोल व डिझेलच्या एकूण गरजेपैकी 83 टक्के गरज ही आयातीतून पूर्ण होते. अरामको या सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या इंधन उत्पादक प्रकल्पावर दोन आठवड्यांपूर्वी ड्रोन हल्ला झाल्यानंतर या कंपनीचे उत्पादन निम्म्यावर खाली आले आहे. या हल्ल्यानंतर अरामकोचे दैनंदिन इंधन उत्पादन 57 लाख बॅरलने घटले आहे. या प्रकल्पाच्या एकूण दैनंदिन क्षमतेच्या प्रमाणात ही घट तब्बल 60 टक्के आहे. जागतिक बाजारात सौदीकडून होणार्‍या इंधन पुरवठ्याचे प्रमाण पाच टक्के असल्याने अरामकोमध्ये निर्माण झालेली घट ही केवळ मध्यपूर्वेतील इंधन बाजारांसाठी नव्हे तर, एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी परिणामकारक ठरली आहे. अरामकोकडून होणारा इंधनपुरवठा घटल्यानंतर अबुधाबी येथील अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीने भारताला मदतीचा हात दिला. एलपीजीची दोन अतिरिक्त जहाजे भारताला निर्यात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. येत्या दोन आठवड्यांत ही जहाजे भारतात दाखल होतील, अशी आहे. अर्थात या सर्व जर-तरच्या गप्पा आहेत. सध्या तरी मागमी व पुरवठ्यातील वाढणारी तफावत पाहता घरगुती गॅसच्या कंमती वाढत जाणार आहेत व त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे.
गुगल 21 वर्षाचे झाले!
लहानांपासून वृद्धांपर्यंत... विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांचा हक्काचा मित्र म्हणजे गुगलचा 21 वा वाढदिवस साजरा झाला. खास डुडलमध्ये एका संगणकाच्या डेस्कस्टॉपवर 27 सप्टेंबर 1998 ही तारीख दिसतेय. तसंच गुगलचा जुना लोगोही या संगणकाच्या स्क्रिनवर पाहायला मिळतोय. 1998मध्ये गूगलनं पहिला वाढदिवस साजरा केला होता. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी 1998 मध्ये एक नवे सर्च इंजिन सुरू केले. या माध्यमातून जगभरातील माहिती सर्वांना उपलब्ध होईल आणि तीही अगदी मोफत...आणि आता वीस वर्षांनंतर गुगल 150 पेक्षा अधिक भाषांमध्ये आणि 190 देशांमध्ये उपलब्ध आहे. ज्ञानसंचय व ज्ञानप्रसाराचे एक सर्वात मोठे माध्यम गुगल ठरले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज यांची गुगलला जन्माला घातले. कंपनीचे नाव सुरुवातीला गुगल असे नव्हते. ब्रिन आणि पेज यांना सुरुवातीला कंपनीचे नाव बॅकरब असे ठेवायचे होते. मात्र, या जोडगोळीने तो विचार बदलून गुगल असे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. गुगलने ज्या झपाट्याने जग काबीज केले आहे ते पाहता एवढा झपाट्याने विस्तार कोणत्याच कंपनीचा आजवर झालेला नसावा, हे कुणीही मान्य करील. 1996 मध्ये दोघांनी गुगलवर जोमाने काम केले आणि जगभरातील माहिती एकत्र करून लोकांपर्यंत मोफत पोचवण्याची पूर्ण यंत्रणा तयार केली. 1997मध्ये त्यांनी गुगल या डोमेनची नोंदणी केली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. गुगल हे सर्च इंजिन नऊपेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये आणि जगभरातल्या 124 भाषांमध्ये उपलब्ध आहे. अजून गुगल बरेच काही करणार आहे. आत्ता कुठे त्यांचे वय 21 झाले आहे, असे तंत्रज्ञानाचा ज्यागतीने विकास होतो आहे, ते पाहिल्यास म्हणता येईल.
-----------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "गॅस महागणारच / गुगल 21 वर्षाचे झाले!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel