-->
पुन्हा इशरत जहॉँ !

पुन्हा इशरत जहॉँ !

संपादकीय पान शनिवार दि. १३ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पुन्हा इशरत जहॉँ !
गुजरातमध्ये खोट्या चकमकीत ठार झालेल्या मुंब्रा येथील मुस्लिम तरुणी, इशरत जहॉँबद्दल पुन्हा एकदा संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या डेव्हिड हेडली याच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे सुरु असलेल्या साक्षीत इशरत जहॉँ ही तरुणी लष्कर ए तोयबाची सदस्या होती व दहशतवादी होती असे सांगितल्याने पुन्हा एकदा तब्बल दोन तपानंतर हे प्रकरण उकरुन वर आले आहे. मात्र हे विधान हेडलिने थेट केलेले नाही तर त्याने एका संवादात एैकल्याचे सांगितले तसेच त्याला तिचे नावही आठवले नव्हते. त्यामुळे सरकारी वकिलांनी त्याला तीन नावे सांगितली त्यातून त्याने इशरतचे नाव निवडले. अर्थात त्याच्या या निवेदनामुळे इशरतला भाजपाने पुन्हा एकदा अतिरेकी म्हणून घोषीत करण्याची घाई केली आहे. सरकारी वकिलांनी अशा प्रकारे आरोपींचे नाव विचारताना तीन नावांचा पर्याय देणे हे पूर्णत: चुकीचेच ठरते. अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये ज्या प्रकारे तीन नावांचा पर्यात दिला जातो त्याधर्तीवर न्यायालयात पर्याय देऊन त्यातून एखाद्यास आरोपी ठरविले जाणे हे केव्हाही चुकीचेच आहे. त्याबाबत इशरतच्या वकिल वृंदा ग्रोव्हर यांनी मांडलेले मत काही चुकीचे नाही. अर्थात हेडलीच्या साक्षीला कायदेशीर आधार नाही, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. हेडलीने जे काही सांगितले त्याला कायद्याच्या दृष्टीने काहीही मोल नाही व त्याने जे काही दावे केले आहेत त्याला दुजोरा देणारे काहीही नाही, असे मुंबई पोलिसांचे मत आहे. मुख्य वादाचा मुद्दा असा आहे की, इशरतला अतिशय थंड डोक्याने चकमकीत मारण्यात आले. गुजरात पोलिसांनी हा गुन्हा केला आहे तो तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्या आदेशानंतर. अतिरेकी निशस्त्र असला तरी त्याला ठार मारण्याचा अधिकार कोणत्याही पोलिसांना दिलेला नाही. गुजरात पोलिसांना जर इशरतला अतिरेकी ठरवायचे होते तर त्यांच्याकडे त्यासंबंधी ठोस पुरावे असण्याची आवश्यकता होती. तिला न्यायालयात उभे करुन तिचा गुन्हा सिद्द कारावा लागणार होता. मात्र तसे न करता तिला थंडपणे चकमकीत ठार मारण्यात आले. बरे ती अतिरेकी होती असे गुजरात पोलिसांना जर वाटत होते तर तिच्या आरोपपत्रात तसा उल्लेख करावयास हवा होता. त्यातही तसा उल्लेख नाही. आजही या घटनेला एक तप उलटले असले तरीही इशरत अतिरेकी होती व तिचे लष्करशी संबंध होते याचा पुरावा गुजरात पोलिसांनी सादर केलेला नाही. त्यामुळे इशरतचा खूनच आहे. हेडली जे आज न्यायालयात म्हटले आहे त्यात काहीच नवीन नाही. यापूर्वी इशरतबाबत अनेकांनी आरोप केले आहेत. मात्र ते सिध्द करण्यात कुणालाही यश आलेले नाही किंवा तिच्या विरोधात एकही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तसेच डेव्हिड हेडलीसारख्या एक विविध देशांसाठी गुप्तहेराचे काम करणार्‍या एका माणसाचे निवेदन आपण कितपत ग्रह्य धरायचे हा प्रश्‍न आहे. त्याचबरोबर एक प्रश्‍न अनुत्तरीत राहातो तो म्हणजे, इशरत गुजरातला गेली होती कशासाठी? १९ वर्षाची इशरत त्यावेळी एका ठिकाणी नोकरी करीत होती व महाविद्यालयात शिकतही होती. तिचे अतिरेक्यांची खरोखरीच संबंध होते हे सिद्द झाले नसले तरीही ती गुजरातला कशासाठी गेली याचेही ठोस उत्तर काही मिळालेले नाही. त्यामुळेच एकूणच इशरत हे प्रकरण गूढ वाढविते. गुजरातमध्ये घातपात करण्यासाठी ती गेली होती असे म्हणणे गुजरात पोलिसांचे आहे. त्याला हेडलिनेही दुजोरा दिला असला तरी त्यासंबंधीचे कसलेही ठोस पुरावे नाहीत. गुजरात सरकार हे भाजपाचे होते व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. गुजरात दंगलींचा काळा इतिहास याच गुजरातमध्ये लिहिला गेला आहे. अशा वेळी येथील सरकार हे सर्वांना समान वागणूक देईल व इशरत प्रकरणातील वास्तव बाहेर येईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे होते. आता तर राज्यात व केंद्रात भाजपाचेचे सरकार आहे. तसेच ज्यांच्यावर गुजरत दंगलीतील सहभागाचा आरोप आहे ते सत्तेत व मंत्रीपदी आहेत. एकूणच पाहता इशरत प्रकरणावर काही नवीन प्रकाशझोत हेडली याने टाकलेला नाही. मात्र यामुळे पुन्हा एकदा साक्षीच्या निमित्ताने इशरतचे प्रकरण उकरले गेले आहे. या प्रकरणावर खरा प्रकाशझोत कधी पडेल हे आत्ता काहीच सांगता येत नाही. सध्याच्या सरकारकडून तशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे.
-----------------------------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा इशरत जहॉँ !"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel