
राफेलचे भूत
7 एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
राफेलचे भूत
राफेलचे भूत हे बहुदा भाजपाच्या मानगुटीवर कायम स्वरुपी बसणार आहे असेच दिसते. कॉँग्रेसच्या मानगुटीवर बसलेले बोफोर्सचे भूत अजून तीन दशके ओलांडली तरी काही उतरत नाही. त्याच मार्गाने आता राफेलचे प्रकरण जाणार आहे. भाजपाने या प्रकरणासंबंधी आपण कितीही धुतल्या तांदाळासारखे असल्याचा दावा केला तरी जो जनतेला पटणारा नाही. कारण बोफोर्स असो किंवा राफेल अशा प्रकारच्या मोठ्या आंन्तरराष्ट्रीय शस्त्रांस्त्रांच्या खरेदीत अब्जावधी रुपयांची लाच किंवा बक्षीसी किंवा बोनस रुपाने काही रक्कम मध्यस्थाला दिली जाते. अशा मध्यसथांमार्फतच ही रक्कम सत्ताधाऱ्यांपर्यत पोहोचते हे काही लपविले जाऊ शकत नाही. असे व्यवहार करणारे जागतिक पातळीवर मोठे दलाल असतात व या व्यवहारांना जाणते अजाणतेपणाने जगतमान्यता मिळालेली आहे. जो सत्ताधारी असतो तो त्याचा लाभार्थी असतो हे उघड सत्य आहे. मात्र हे वास्तव भाजपा किंवा आपल्या देशातील कोणताच पक्ष स्वीकारणार नाही. त्यामुळे राफेलचे हे भूत त्यांच्या बोकांडी बसणारच आहे. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला व त्यातील वाटेकरी हा भाजपा आहे, असे कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी हे हा करार झाल्यापासून बोंबलत आहेत. परंतु भाजपाने त्यांच्या आरोपाला काही समाधानकारक उत्तर कधीच दिले नाही. उलट आपण या व्यवहारात कसे स्वच्छ आहोत हेच पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण संसदेतही गाजले मात्र तेथेही भाजपाच्या नेत्यांनी विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकला. न्यायालयातही हे प्रकरण काही टिकू शकले नाही. त्यामुळे शेवटी भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर भाजपाने पांघरुण घातले. परंतु अर्थातच अशा प्रकारच्या व्यवहारात फार काळ पांघरुण घालता येत नाही. शेवटी तसेच झाले फ्रान्सच्या एका वृत्तसंकेत स्थळाने राफेल व्यवहारात दलाली दिली गेल्याचे वृत्त प्रसिद्द केले आहे. त्यामुळे त्यावरुन एकदम देशात गदारोळ माजला आहे. अर्थातच तसे होणे स्वाभाविक आहे कारण स्वच्छ सरकार देण्याचा वादा देऊन आलेल्या मोदी सरकारविरुध्द अशा प्रकारे थेट आरोप होणे म्हणजे अनेकांना धक्का लागणारी बाब म्हटली पाहिजे. स्वच्छ सरकारचा दावा करणाऱ्या भाजपाच्या दाव्यालाही या बातमीने सुरुंग लावला आहे. फ्रान्सच्या या वृत्तसंकेत स्थळाने दिलेल्या बातमीनुसार, राफेल व्यवहारात कंपनीने एका भारतीय दलालास ११ लाख युरो (अंदाजे ९.५२ कोटी रुपये) लाच देण्यात आली आहे. राफेल करारावर २०१६ मध्ये स्वाक्षरी झाल्यावर दसॉ या लढाऊ विमान निर्मिती कंपनीने भारतीय मध्यस्थ कंपनीला ११ लाख युरो एवढी रक्कम दिल्याचे फ्रान्सच्या लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेने केलेल्या तपासात आढळले आहे असेही या बातमीत म्हटले आहे. देशांतर्गत मात्र भाजपाने या संबंधी झालेले सर्व आरोप फेटाळून त्याची चौकशी करण्याचे केवळ फार्सच केले. आजही भाजपा हे आरोप निराधार असल्याचे म्हणते. परंतु फ्रान्सच्या लाचलुचपत विभागाने केलेल्या चौकशीमुळे या बातमीचा एक मोठा आधार मिळतो. डेफसिस सोल्युशन्स या कंपनीचा प्रवर्तक सुशेन गुप्ता याला ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात लाच घेतल्या प्रकरणी २०१९ साली ईडीने अटक केली होती. डेफसिस सोल्युशन्स ही राफेल कंपनीसाठी भारतातील उपकंपनी म्हणून काम करते. या कंपनीला विमानांच्या प्रतिकृती बनविण्याचा कसलाही अनुभव नाही. याच कंपनीला राफेल विमानांच्या ५० प्रतिकृती बनविण्याचे कंत्राट कागदोपत्री दिले गेले. परंतु प्रत्यक्षआत एकही प्रतिकृती सादर करण्यात आली नाही. या व्यवहाराआडून सुशेन गुप्ताला ही रक्कम मिळाल्याचे उघड झाले आहे. फ्रान्सच्या सरकारी खात्याने याची चौकशी केल्याने हा आरोप केवळ विरोधी करीत असलेल्या आरोपाप्रमाणे साधासुधा नाही. तर त्याची उच्चस्तरिय चौकशी करुन यातील नेमके लाभार्थी कोण आहेत हे तपासले गेले पाहिजे. संरक्षण व्यवहारात दलाली घेतली जाणे हा गुन्हा आहे. पर्रिकर संरक्षणमंत्री असताना त्यांनी कोणताही दलाली न देण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता. असे असले तरीही दलाली अखेर दिली गेलीच आहे, असे सध्याच्या आरोपावरुन दिसते. हे जर खरे असेल तर हा गुन्हा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे दलाली न देण्याचा निर्णय हा भाजपाचाच आहे. असे असूनही दलाली दिली गेली असले तर त्याची सरकारने चौकशी करुन यातील गुन्हेगार शोधले पाहिजेत. एक विरोधी पक्ष म्हणून कॉँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे, यात काही चूक नाही. परंतु भाजपाने यासंबंधी स्वच्छपणे पुढे आले पाहिजे. केवळ कंपन्यांतील स्पर्धेपोटी असे आरोप होतात असे म्हणून भाजपा या आरोपातून सहिसलामत सुटू शकणार नाही. असा प्रकारच्या चौकशीतून काहीच निष्पन्न निघत नाही हे आपण बोफोर्सच्या प्रकरणातून पाहिले आहे. बोफोर्सव्दारे जेवढी लाच दिली गेली त्यापेक्षा जादा रक्कम त्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीसाठी खर्च झाली आहे. परंतु त्यातून ठोस आरोपी काही सापडलेला नाही. अशा स्थितीत राफेलचे हे भूत आता भाजपाच्या मानगुटीवर बसले आहे व ते लवकर काही निघणार नाही हेच खरे.
0 Response to "राफेलचे भूत"
टिप्पणी पोस्ट करा