-->
बिकट होणारी स्थिती

बिकट होणारी स्थिती

8 एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
बिकट होणारी स्थिती पाच राज्यात निवडणूक प्रचाराने वातावरण तापले असताना कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा जास्त वेगाने आली आहे. अत्यंत झपाट्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे मात्र त्यात समाधानाची एक बाब म्हणजे, बरे होण्याऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी हळूहळू कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत चालले आहे ही धोकादायक स्थिती म्हटली पाहिजे. देशात सलग तिसऱ्या दिवशी ९० हजारांवर रुग्ण आढळले आहेत. मुंबईसारख्या महानगरात तर दररोज दहा हजारांच्यावर रुग्ण व राज्यात ५० हजारांवर रुग्ण दररोज सापडत आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच ज्या गतने कोरोना वाढत गेला त्यापेक्षा यावेळी कोरोनाच्या रुग्णांची गती वाढलेली आहे. गेल्या वर्षी असेच रुग्णवाढ उच्चांकाला जाऊन त्यानंतर घसरण सुरु झाली होती. असा मागचा अनुभव आपल्या पाठीशी असताना आपण ज्या सावधानगिऱ्या बाळगणे गरजेचे आहे, परंतु आपण गेल्या लॉकडाऊननंतर बेफिकिरीने वागत आहोत. दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी पुढील चार आठवडे फार महत्वाचे ठरणार आहेत. महाराष्ट्र सध्या रुग्णवाढीमध्ये आघाडीवर आहे. तर पंजाब, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तरप्रदेश, तमीळनाडू, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. एकूणच फार चिंता व्यक्त करावी अशीच स्थिती आहे. केंद्र सरकार या राज्यांमध्ये पथक पाठविण्याशिवाय फारसे काही काम करताना दिसत नाही. जनतेला आता लॉकडाऊन नको आहे हे वास्तव आहे मात्र सध्याच्या बिघडत जाणाऱ्या स्थितीत लोकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडणे फार धाडसाचे ठरणार आहे. सरकारने दुकानांसंबंधी जी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत व एकूणच दुकाने बंद ठेवण्याच्या धोरणावर व्यापारी, दुकानदार नाराज आहेत. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी सरकारचा निषेध म्हणून काळे फलक घेऊन मानवी साखळी केली. व्यापाऱ्यांच्या भावना आपण समजू शकतो. त्यांचा व्यवसाय गेल्या वर्षात बुडाला आहे. त्यामुळे अनेकांपुढे आर्थिक संकटे आ वासून उभी आहेत. हे जरी खरे असले तरीही आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे ते पाहता जीव वाचविण्यासाठी गर्दी टाळणे सध्या गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने दिलेली मार्गदर्शक तत्वे अत्यंत जरुरी आहेत. बहुतांशी व्यापारी, सटोडिया हे भाजपाचे मतदार आहेत. फडणवीस यांनी सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेलेच आहे. आता त्यांनी आपल्या या मतदारांना समजाविण्याची गरज आहे. सध्या तुटवडा जाणवत नसला तरी येत्या काही दिवसात रुग्णांसाठी खाटा कमी पडतील अशी भीती आहे. ऑक्सीजन पुरविणाऱ्या कंपन्यांना प्राधान्यतेने आरोग्य सेवांना पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरीही ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडण्याचा धोका आहे. सरकारने यापूर्वी सुरु केलेली आयसोलेशन सेंटर्स पुन्हा कार्यान्वित केली असली तरीही ऑक्सीजन व व्हेटिलेटर्सचा पुरवठा कमी पडल्यास हाहाकार माजू शकतो. अशी स्थिती गेल्या लाटेत काही काळ होती हे आपण विसरु शकत नाही. गेल्या लाटेचा मुकाबला आपण यशस्वीरित्या जरुर केला, परंतु भविष्यात दुसरी लाट येणार हे माहिती असूनही केंद्र व राज्य सरकारने त्याचे अगोदर काही नियोजन केलेले नाही. आपल्याकडील प्रशासकीय यंत्रणा किती सुस्त असते याची पूर्ण कल्पना आहे. त्यात अनेकांनी गेल्या लाटेत दिवस रात्र काम केल्याने त्यांना आता थकवा आला आहे. त्यातच ही दुसरी लाट आल्याने त्यांना पुन्हा नव्याने उभे राहावे लागत आहे. यावेळी फक्त सर्वांसाठी चांगली बाब म्हणजे कोरोनाशी लढण्यासाठी आता लस उपलब्ध आहे. सध्या सरकारने ४५ वयाच्या वरच्यांसाठी लस उपलब्ध केली आहे. राज्यात सरासरी चार लाख लोकांना लस दिली जात आहे. परंतु हे प्रयत्न देखील पुरेसे नाहीत. कारण आपल्याला लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. तसेच सध्या आपल्याकडे दोन लसी आहेत व त्याचे संपूर्ण नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात व जेथे प्रसार जास्त आहे त्या राज्यांना जास्त डोस दिले गेले पाहिजेत. आता सध्याच्या लाटेत तरुणांनाही लागण मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २५ वयाच्या जास्त वय असलेल्यांना लस देण्याचे धोरण आखावे असे म्हटले आहे. परंतु केंद्र सरकार ते काही ऐकायला तयार नाही. एवढेच कशाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागणीनुसार १८ वर्षांवरील प्रत्येकासाठी लस खुली केली पाहिजे. परंतु केंद्र सरकार कोणतेही ठोस कारण न देता ही मागणी धुडकावून लावते. लसीकरण वाढविणे हाच एकमेव दुसरी लाट थोपविण्यासाठी उपाय आहे. त्याचबरोबर ज्या आयात केल्या जाणाऱ्या महागड्या लसी आहेत त्यांना खुल्या बाजारात विकण्यास परवानगी दिली पाहिजे. ज्यांना फायझरसारखी महागडी लस खरेदी करुन घ्यावयाची असेल त्यांना हा पर्याय खुला ठेवला पाहिजे. कारण सध्या कोणत्याही परिस्थितीत लसीकरण होणे महत्वाचे आहे. केंद्राने यात पुढाकार घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. राज्यातील १२ कोटी जनतेला लसीकरण झपाट्याने झाल्यास सध्याच्या लाटेला थोपविता येऊ शकते. परंतु त्यासाठी केंद्र राज्य संबंध व राज्यातील विरोधी पक्ष यांच्यात समाजस्यपणा दाखविण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "बिकट होणारी स्थिती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel