-->
लढाऊ समर्पित कार्यकर्ता

लढाऊ समर्पित कार्यकर्ता

8 एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
लढाऊ समर्पित कार्यकर्ता मुंबईतील बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी चिवटपणाने अडीच दशकांहून जास्त काळ संघर्ष करणारे गिरणी कामगारांचे लढाऊ नेते, संघर्षशील व्यक्तीमत्व दत्ता इस्वलकर यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी रात्री मुंबईतील जे.जे. रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. गिरणी कामगारांच्या लढ्यातील एक प्रामाणिक, जिद्दी आणि अखेरपर्यंत लढणारा समर्पित कार्यकर्ता त्यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे. गिरणी कामगारांचा संप फसल्यानंतर त्या कामगारांना कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवून देणे हे फार अवघड काम होते. परंतु तब्बल अडीज दशके गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नावर त्यांनी रान उठविले. त्यांचा हा संघर्ष अतिशय चिवट होता, समोर काहीच मिळणार नाही हे माहित असतानाही त्यांनी आपला लढा सुरु ठेवला व त्यातून अखेरीस गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर असो किंवा मालकांनी थकविलेली देणी मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. दत्ता इस्वलकर आणि संपानंतर शिल्लक राहिलेल्या गिरणी कामगारांचा संघर्ष असे एक समीकरणच गेल्या काही वर्षात तयार झाले होते. समाजवादी चळवळीशी प्रदीर्घ काळ ते संबंधीत होते परंतु त्यांनी आपला विचार कामगार चळवळीत संघर्ष करताना कधीच आणला नाही.मुंबईतील मॉडर्न मिलमध्ये दत्ता इस्वलकर यांचे वडिल जॉबर होते. १९७० साली वयाच्या २३ व्या वर्षी दत्ता इस्वलकर हे मॉडर्न मिलमध्ये नोकरीस लागले. राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी निकटचा संबंध असलेले दत्ता इस्वलकर यांनी १९८७ नंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यास प्राधान्य दिले होते. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते. लढाऊ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली १९८२ साली गिरणी कामगारांचा मोठा संप झाला. खरे तर त्या लढ्यात डॉ. सामंतांना गुंतायचे नव्हते. परंतु गिरणी कामगारांनी त्यांनी त्यात ओढले आणि प्रदीर्घ काळ चालेला तो एतिहासिक लढा अयशस्वी झाला. सुमारे अडीच लाख कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य मातीमोल झाले. असे असले तरी गिरणी कामगारांनी डॉ. सामंताना त्यासंबंधी कधीच दोष दिला नाही. कारण त्यांच्याच आग्रहावरुन डॉ. सामंत या लढ्यात उतरले होते. गिरणी कामगारांना देशोधडीला लावण्यात सर्व राजकीय पक्षसंघटनांचा कसा सहभाग होता याची जाण इस्वलकर यांना होती. स्वान मिल, मॉडर्न, रघुवंशी, कमला, मुकेश, श्रीनिवास, ब्रडबरी अशा १० मिल बंद झाल्यानंतर गिरणी कामगारांना कोणी वालीच उरला नव्हता. अशा कठीण काळात २ ऑक्टोंबर १९८९ साली दत्ता इस्वलकर व त्यांच्या सहकार्यांनी बंद गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. त्या समितीचे दत्ता इस्वलकर हे निमंत्रक होते. समितीच्या स्थापनेनंतर एका वर्षांनी ०२ ऑक्टोबर १९९० रोजी गांधी जयंतीला दत्ता इस्वलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गिरणी कामगारांच्या रास्त प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मध्यस्थीने उपोषण सुटले. त्यानंतर १९९१ साली विकास नियंत्रण नियमावली आली. त्याचा फायदा गिरणी मालकांना गिरण्यांच्या जमिनी विकण्यात झाला. लालबाग, परळ या गिरण भागात त्याकाळी ५८ गिरण्या होत्या. गिरणी बंद पडल्यामुळे गिरणी कामगार देशोधडीला लागले. त्यांच्या कुटुंबाची वाताहात झाली. हे अनुभव पाठिशी असल्यामुळे दत्ता इस्वलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नंतर अडीच दशके गिरणी कामगारांच्या हक्कांचा लढा ते नेटाने लढले. मुंबईतील ऐतहासिक गिरणी संपात वाताहात झाल्यानंतर एकेकाळी तत्वांसाठी संघर्ष करणारा राजकीयदृष्ट्या परिपक्व असणारा गिरणी कामगारही हतबल झाला होता. आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या त्या गिरणी कामगारांच्या मनात पुन्हा लढण्याची इर्षा निर्माण करण्याचे काम दत्ता इस्वलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. भायखळा परिसरातील न्यू ग्रेट मिलसमोर सुरु केलेल्या उपोषणामुळे गिरणी कामगारांचा लढा पुन्हा दुसऱ्यांदा उभा राहिला. गिरण्यांच्या जागेवर केवळ मालकांचाच नव्हे तर राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि कामगारांचाही हक्क प्रस्थापित झाला. याची परिणती गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर मोफत नव्हे तर किफायतशीर दरात मालकी हक्काची घरे देण्यात झाली. गिरणी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांना मालकी हक्काची घरे मिळण्यासाठी दत्ता इस्वलकर आयुष्यभर शेवटपर्यंत संघर्ष करीत राहिले. मुंबईत ज्यावेळी गिरण्या सोने ओकीत होत्या तेव्हापासून गिरण्या आणि त्याभोवती राज्याचे अर्थकारण गुंतलेले होते. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि काही प्रमाणात मराठवाडा येथून कष्टकरी म्हणून आलेला गिरणी कामगार हा एकेकाळी मुंबईची शान म्हणून ओळखला जाई. त्याला पगार फारसा मिळत नव्हता परंतु त्याच्या श्रमाला समाजात प्रतिष्ठा होती. ६० नंतर मुंबईत हळूहळू रसायन, औषध व अभियांत्रिकी उद्योगाने आपले पाय उपनगरात पसरले आणि तेथील कामगार हा या गिरणी कामगारांपेक्षा जास्त पगार कमवू लागला. गिरणी कामगारांत सुरुवातीपासून कम्युनिस्टांनी आपले चांगले बस्तान बसविले होते. त्यामुळे हा कामगार डाव्या विचारांनी प्रभावित झाला होता. कॉ. श्रीपाद अमृत डांगेंनी या कामगारांना वैचारिकदृष्ट्या घडविले होते. त्यातून स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो त्यात गिरणी कामगार अग्रभागी होता. परंतु आपल्या मागून आलेल्या अन्य उद्योगातील कामगारांना जे आर्थिक लाभ मिळत होते ते आपल्यालाही मिळाले पाहिजेत ही त्याची रास्त मागणी होती. त्यासाठीच त्यांनी डॉ. सामंतांना आमंत्रित केले होते. परंतु त्यांचा हा लढा फसला. परंतु त्यातून निर्माण झालेल्या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम इस्वलकरांनी केले. संघर्षशील, तत्वनिष्ठा, प्रामाणिक आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या या प्रामाणिक कामगार नेत्यास नेत्यास आमचा अखेरचा सलाम.

0 Response to "लढाऊ समर्पित कार्यकर्ता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel