-->
दुसरी लाट आणि सत्तेचे स्वप्न

दुसरी लाट आणि सत्तेचे स्वप्न

11 एप्रिलच्या मोहोरसाठी चिंतन
दुसरी लाट आणि सत्तेचे स्वप्न सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा वेग सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे कारण तेथेच सर्वाधिक शहरीकरण झाले आहे. शहरात कोरोना झपाट्याने फैलावतो कारण तेथे दोन व्यक्तींमधील सुरक्षीत अंतर राखणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते. महाराष्ट्रात जशी लाट जोरात आहे तसेच गुजरात, कर्नाटक, तामीळनाडू, छत्तीसगढ, पंजाब, दिल्ली या शहरात कोरोना तेवढ्याच वेगाने फैलावत आहे. देशात अशा प्रकारे चिंतादायक परिस्थिती असताना पाच राज्यात सत्ता मिळविण्यासाठी भाजपाची जोरदार धडपड सुरु आहे. तेथे करोना नाही का? असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. अमित शहा व नरेंद्र मोदी तेथे लाखोंच्या सभा घेत आहेत. कदाचित सध्या तिकडे चाचण्या फारशा होत नसून एकदा का निवडणुका पार पडल्या की तेथे करोना उसळी मारेल असे दिसते. या पाच राज्यापैकी सर्वच राज्यात भाजपाला सत्ता काबीज करावयाची आहे परंतु त्यांचे हे स्वप्न किती राज्यांपुरते मर्यादीत राहाते ते पहावे लागेल. यातील सर्वात मोठी व चुरशीची लढत ही पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या राज्यात होत आहे. भाजपाने तेथून दीदींकडून सत्ता हिसकावून घेण्याचा चंग बांधला आहे. एकेकाळी तेथे सत्तेत असणारी डावी आघाडी निष्प्रभ झालेली आहे. तेथे डावे व कॉँग्रेस यांची आघाडी आहे तर केरळात हे दोघे परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. परंतु पश्चिम बंगालमध्ये जर ममता दीदींचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष सर्वात मोठा म्हणून निवडून आला व त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर डावे व कॉँग्रेस महाराष्ट्राप्रमाणे सरकार स्थापून तेथे सत्तेत सहभागी होऊ शकतात. भाजपाविरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन नुकतेच ममतादीदींनी केले आहे, त्याचा मतितार्थ असाच आहे. भाजपासाठी तो एक मोठा पराभव असेल, मात्र महाराष्ट्राप्रमाणे जर पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे जुळली तर तीन पक्षांचे तीन विचारांचे सरकार पुन्हा एकदा भाजपाविरोधात येऊ शकते. देशातील भाजपेत्तर विरोधी पक्षांसाठी ती एक मोठी घटना असेल. अर्थात या सर्व जर तर च्या गप्पा झाल्या. कोरोना आपल्याकडे तेजीत असताना राज्यातील भाजपा नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेची स्वप्ने जोरदार पडू लागली आहेत. वाझे प्रकरणाने सरकार काही कोसळले नाही, आता कोरोनाने तरी सरकार पडते का ते पहात बसले आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणे हे एकमेव धोरण त्यांनी अवलंबिले आहे. सरकारने मिनी लॉकडाऊन केले. खरे तर त्याची गरजच आहे. कारण आज मुंबईत दररोज दहा हजारांनी रुगण वाढत आहेत तर राज्यात हाच आकडा ५० हजार एवढा आहे. अशा स्थितीत जर लॉकडाऊन करायचे नाही तर पर्यायी उपाय काय, असा सवाल मुख्यमंत्र्यंनी सर्वांना करुनही भाजपाकडे उत्तर नाही. गेल्या वर्षी नरेंद्र मोदींनीच अचानकपणाने लॉकडाऊन केले होते. त्यात जनतेचे मोठे हाल झाले. त्याला मात्र विरोध केला नाही, आता मात्र उध्दव ठाकरेंच्या सरकारला विरोध करावयाचा म्हणून लॉकडाऊन नको. उध्दव यांच्या रुपाने एक सामंजस्यांने वागणारा व कसलाही आक्रस्तळेपणा न करता परिस्थिती सहजतेने हाताळणारा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. गेल्या वर्षात त्यांचा सर्वाधिक मानसिक छळ भाजपानेच केला असावा. ज्यावेळी हे दोघे सोबत होते त्यावेळी उध्दव चांगले होते. आता मात्र त्यांनी वेगळा संसार थाटल्यावर त्यांनी केलेली प्रत्येक बाब चुकीची वाटते. हे सरकार काही दिवस टिकेल असे भलभले म्हणत होते, परंतु आता या सरकारनेच तब्बल दीड वर्ष काढले आहे. परंतु आता फार काळ भाजपा सत्तेशिवाय राज्यात राहू शकत नाही. यासाठी प्रत्येक बाबतीत सरकारची गोची करण्याचे काम केंद्रात असलेल्या भाजपाच्या सरकारच्या जोरावर सुरु केले आहे. लसीचा पुरवठा सर्व राज्यांना समान करणे यात कोणाचेही दुमत नसेल. परंतु भाजपाचे केंद्रातील सरकारही याबाबत दुजाभाव करीत आहे. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे साडे चार लाख कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र सर्वाधिक लस ही साडे सहा कोटी लोकसंख्येच्या गुजरातला. देशातील लोकसंख्या व कोरोनाचे प्रमाण याचा विचार करता महाराष्ट्राला सर्वाधिक लस मिळाली पाहिजे. परंतु तसे होत नाही. सर्वाधिक पुरवठा गुजरातला करणे हे महाराष्ट्र व्देषाचे उत्तम उदाहरण आहे. सर्वात शरमेची बाब म्हणजे भाजपाचे नेते राज्याच्या विरोधात उभे राहातात. विरोधी पक्ष नेते फडणवीस तर केंद्राचे प्रवक्ते असल्यासारखे भाषा बोलतात. राज्याला लस कमी मिळाली आहे ही बोलकी आकडेवारी सांगत असतानाही वस्तुस्थिती वेगळीच दाखवून लोकांची दिसाभूल करावयाची हे भाजपाने उत्तम साधले आहे. लसींचा पुरवठा कमी जाल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्यमंत्री मान्य करीत नाहीत किंवा राज्यातले भाजपाचे नेतेही मान्य करीत नाहीत. राज्याला लस कमी देऊन राज्यात रुग्ण वाढल्यावर राज्य सरकारची कशी फसगत होते हे पाहण्यास हे दोघेही उत्सुक आहेत. यातून जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर तातडीने सरकार बरखास्त करायला राज्यपाल तर उत्सुकच आहेत. अशा प्रकारचे जनतेच्या आरोग्याशी खेळत भाजपा सत्ता मिळविण्याचे स्वप्न राशी बाळगून आहेत. व्यापाऱ्यांच्या बाबतीतही असेच झाले आहे. सध्याच्या स्थितीत व्यापाऱ्यांना बंद नको आहे, कारण गेल्या वर्षाच्या लॉकडाऊनमुळे त्यांचे हात पोळले आहेत. त्यांच्या भावना आपल्याला समजू शकतात परंतु या व्यापाऱ्यांना भाजपाच्या नेत्यांनी फूस लावली आहे. अशा प्रकारे आपल्या मतदारांना हाताशी घेऊन भाजप गलिच्छ राजकारण करीत आहे. सध्याच्या दुसऱ्या लाटेचे निमित्त करीत सत्ता काबीज करण्याचे भाजपाचे स्वप्न काही पूर्ण होईल असे दिसत नाही.

0 Response to "दुसरी लाट आणि सत्तेचे स्वप्न"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel