
संतुलित निर्णय
६ एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
संतुलित निर्णय
लोकांना तर लॉकडाऊन नको आहे, सरकारलाही नकोच आहे, परंतु नाईलाज आहे. सत्ता गेलेल्या भाजपाने मात्र लॉकडाऊन केल्यास रस्त्यावर उतरण्याची दिलेली हास्यास्पद धमकी, अशा स्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊन करीत तसेच सर्व कामकाज सुरळीत सुरु राहिल, याची हमी घेत सुवर्णमध्य काढला आहे. लॉकडाऊन कोणालाच नको आहे. खरे तर गेल्या वर्षी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे लॉकडाऊनची घोषणा केली आणि संपूर्ण देशाला स्टॅच्यू करुन टाकले. त्या लॉकडाऊनचे फायदे किती झाले तोटे किती याचा विचार करीत असताना पुन्हा नव्याने लॉक़डाऊन नकोच अशी सर्वसाधारण भूमिका आहे. मात्र जगातील अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन लादले गेले असतानाही आपण त्यापासून फारसे दूर राहू शकत नाही. कारण लॉकडाऊनला विरोध करणारे त्याला काही दुसरा पर्याय आहे का, त्याचे ठोस उत्तर देत नाहीत. खरे तर लॉकडाऊनला पर्याय नाहीच आहे. युरोपात लॉकडाऊन असूनही तेथे कोरोना रुग्ण वाढतच आहेत. मात्र गेल्या वर्षात अनेकांचे हात लॉकडाऊनमध्ये होरपरळले आहेत. त्यामुळे जनतेला लॉकडाऊन नको आहे. सरकारला नको आहे कारण त्यामुळे सरकारची तिजोरी कोरडी पडते. सर्वच कारभार थांबल्यामुळे सरकारचा महसूल थांबतो. अशा स्थितीत लॉकडाऊनला पर्याय म्हणजे मिनी लॉकडाऊन जाहीर करीत सर्वसाधारण कामे सुरु कशी ठेवता येतील ते पाहणे. ज्यांना आवश्यकच आहे त्यांनी घराबाहेर पडणे व ज्यांना घरातच बसून कार्यालयीन कामे करणे शक्य आहे त्यांनी ती कामे घराच बसून करणे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसात विविध उद्योगातील संघटनांशी चर्चा केली. त्यांची मते आजमावून घेतली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चाही केली व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. एकूणच पाहता सरकारने सर्वांना विश्वासात घेत हा निर्णय घेतला आहे. तसेच शनिवार-रविवार या दोन दिवशी कडकडीत लॉकडाऊन सुरु ठेऊन लोकांच्या अनावश्यक फिरण्यावर बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणारी सर्व ठिकाणे म्हणजे मॉल, रेस्टॉरंट, थिएटर्स, नाट्यगृहे, गार्डन यांच्यावर पूर्णपणे बंदी लागू केली आहे. तसेच सलून, स्पा, जिम या सारखे कोरोना पसरविणारे हॉटस्पॉट बंद ठेवले आहेत. भाजपाने लॉकडाऊन करण्याला कडवा विरोध केला होता. त्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला होता. परंतु त्यांचा हा विरोध बेडगी आहे. कारण गेल्या वर्षी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनेच लॉकडाऊन जारी केले होते आणि अचावक जाहीर केल्याने सर्वांचेच हाल झाले होते. यावेळी सरकारने लोकांना माघारी परतण्यासाठी वेळ दिली आहे, ही सर्वात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. गेल्या वेळच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या त्यांची पगार कपात झाली. ती पगार कपात अजूनही दूर झालेली नाही. रोजंदारीवर काम करणाऱ्या असंघटीत मजुरांचे तर सर्वाधिक हाल झाले. त्यांना धड गावीही जाता येत नव्हते आणि मुंबईत रोजगार नसताना राहणे काही शक्य नव्हते. अशा स्थितीत उत्तरप्रदेश, बिहार, आसाम, मध्यप्रदेश, तेलंगणा येथील मजुरांना चालत भर कडाक्याच्या ऊनातून आपले गाव गाठावे लागले. त्यात काही जण रस्त्यातच मरणही पावले. मजुरांचा एक जथ्था ट्रेनखाली आल्यावर केंद्र सरकारला जाग आली. त्यावेळी आजच्या लॉकडाऊनला विरोध करणारे गप्प का होते, असा सवाल आहे. आज हेच राजकीय नेते सत्ता गेल्यावर मजूर, बेकारी, रोजंदारी याची दखल घेत लॉकडाऊनला विरोध करीत आहेत. हे सर्व हास्यास्पद आहे. लॉकडाऊन नको तर दुसरा पर्याय काय हे देखील लोक काही सुचवत नाहीत. अशा स्थितीत उध्दव ठाकरे सरकारने मिनी लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय आवश्यकच होता. गेल्या काही महिन्यात प्रामुख्याने डिसेंबरपासून लोकांमध्ये कोरोनासंबंधी शिथीलता येण्यास सुरुवात झाली होती. लॉकडाऊनची शिथीलता झाल्याने लोक सैरावैरा सुटल्यासारखे वागू लागले होते. पर्यटन व्यवसायही जोरात सुरु झाला होता. लग्नसमारंभ, मुंजी, राजकीय नेत्यांच्या सभा, आंदोलने पुन्हा एकदा जोरात सुरु झाली होती. सरकार व प्रशासनातही ढिलाई आली होती. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कोरनाची दुसरी लाट पहावी लागत आहे. लोकांना शिस्त नकोच असते, जबाबदारीने वागणेही नकोसे वाटते. त्यात त्यांना आपल्या स्वातंत्र्यांचा संकोच होतो असे वाटते. परंतु ही खरी बेशिस्ती आहे. अमेरिकेतही अशाच धर्तीवर जनता व प्रशासन वागल्याने तेथे कोरोनाची पक्कड काही सैल होताना दिसत नाही. जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले असतानाही तेथे लोक काही जुमानत नाहीत. अजूनही अनेकांना मास्क वापरणे चुकीचे वाटते. परंतु त्यामुळेच तेथे पाच लाखाहून जास्त कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. आपल्याला ती स्थिती ओढावून घ्यावयाची नाही. त्यासाठी सध्याचे मिनी लॉकडाऊन स्वीकारत असताना खबरदारीचे सर्व उपाय पाळले पाहिजेत. तसेच जेवढी लवकर लस घेणे शक्य आहे तेवढ्या लवकर घेतली गेली पाहिजे.
0 Response to "संतुलित निर्णय"
टिप्पणी पोस्ट करा