
एक पाऊल पुढे...
3 एप्रिल 2021 साठी अग्रलेख
एक पाऊल पुढे...
कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागल्याने देशात चिंतेचे वातावरण असताना काही समाधानकारक आकडेवारी देशाच्या अर्थकारणासंदर्भात आल्याने सध्याच्या कठीण काळात आपण एक पाऊल पुढे टाकले आहे असे म्हणता येईल. मार्च महिन्यात यंदा जी.एस.टी. संकलन सव्वा लाख कोटींच्या घरात गेले आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरु झाल्यावर हेच जी.एस.टी. उत्पन्न विक्रमी पातळीवर खाली आले होते. परंतु आता सलग सहा महिने जी.एस.टी. उत्पन्न एक लाख कोटींच्या वर राहिले आहे. त्यामुळे कोरोनामुळे रुतलेले आपले अर्थकारण हळूहळू एक एक पाऊल पुढे चालत आहे. कोरोनाचा जरी जोर वाढला असला तरी आता लॉकडाऊन नको, अशी सर्वसाधारण धारणा आहे. त्यात काहीच चुकीचे नाही. त्यामुळे जनतेचा रोष ओढावून घेऊन केंद्र किंवा राज्य सरकार लॉकडाऊन करु शकत नाही. जरी लॉकडाऊन झाले तरी जिल्हा पातळीवर असेल. त्यामुळे आता आपले अर्थकारण हळूहळू सुरुच राहील. गेल्या काही दिवसात अनेक बाबींवर निर्बंध लादले गेले आहेत त्याचा परिणाम महसूल वाढीवर होऊ शकतो. परंतु शंभर टक्के लॉकडाऊन करुन पूर्ण अर्थव्यवस्थेची चाके थांबविणे चुकीचे आहे हे आता सर्वांनाच पटले आहे. त्यामुळे आता सरकारी तिजोरीत अशा प्रकारे करांव्दारे उत्पन्न जमा होत राहिल असे दिसते. जी.एस.टी. ही जगात लोकप्रिय असलेली करप्रणाली आपण उशीराच स्वीकारली. याला कारण डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी सर्वात प्रथम ही करप्रणाली स्वीकारण्याचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु त्यावेळी विद्यमान पंतप्रधान मोदीसह सर्वच भाजपाच्या नेत्यांनी याला कडाडून विरोध केला होता. मात्र सत्तेवर येताच हीच करप्रणीली स्वीकारली. याची आठवण करुन द्यायचे कारण एवढेच की, आता जी.एस.टी.ने उत्तम वाढल्यावर त्याचे कर पद्दतीचे महत्व पटले आहे. जर त्याकाळी भाजपाने विरोध केला नसता तर या कर प्रणालीला देशात सुरुवात होऊन पंधरा वर्षे झाली असती. असो. जी.एस.टी. विक्रमी जमा झाला म्हणजे सर्वत्र आलबेल आहे असे म्हणण्याची गरज नाही, कारण देशातील उद्योगधंदे अजून कोरोनाच्या सावटातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. महाराष्टासारख्या औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्यातील औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांनी घटले आहे. अजूनही अनेक कंपन्यांनी आपल्याकडील मन्युष्यबळ पूर्णपणे वाढविलेले नाही. अजूनही सर्व उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नसल्याने कोरोनापूर्व औद्योगिक उत्पादनाची स्थिती यायला अजून बराच काळ लागेल. सध्या फक्त एकच उद्योगधंदा दमदार कामगिरी करतो आहे व तो म्हणजे वाहन उद्योग. गेल्या वर्षात ज्यांनी वाहने कोरोनामुळे घेण्याचे पुढे ढकलले होते त्यांनी आता वाहन खरेदी सुरु केली आहे. त्यातच व्याजाचे दर गेल्या वर्षात कमी झाल्याने कर्जाचा बोजा कमी पडत असल्याने वाहन ग्राहक खुशीत आहेत. टाटा मोटर्सची वाहन विक्री पाच पटीने वाढली आहे. केवळ टाटाच नव्हे तर देशातील सर्वच वाहन विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होते आहे. देशातील संघटीत उद्योग हळूहळू आपले पुन्हा बस्तान बसवू लागले असले तरीही असंघटीत क्षेत्रातील उद्योगांना अजूनही मोठी धडपड करावी लागत आहे. त्यांना सर्वात मोठी अडचण येते आहे ती कामगारांची. अजूनही गावी गेलेले शंभर टक्के कामगार परतलेले नाहीत. संघटीत क्षेत्रातील मजूर जरुर परतले आहेत परंतु असंघटीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांची अजूनही मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. मजुरांच्या या तुटवड्यामुळे बांधकाम उद्योगाला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मजुरांच्या तुटवड्यामुळे त्यांच्या मजुरीत सरासरी 25 टक्क्यंनी वाढ झाली आहे. त्यातच कोरोना वाढू लागल्याने अनेक मजुरांनी भीतीपोटी गावचे रस्ते धरले आहेत. त्यामुळे प्रमुख ठिकाणी नाक्यावर मजुरांनी गजबजलेले नाके सध्या ओस पडले आहेत. ही स्थिती कायम राहिल्यास अर्थकारणाची चाके पुन्हा एकदा मंदावण्याचा धोका आहे. कोरोना एवढ्यात संपणारा नाही. निदान 2021 सालही याच कोरोनाच्या भीतीपोटी जाणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. दुसरी लाट आल्याने देशात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. परंतु त्याचा मुकाबला करण्यासाठी आता लसीकरण व त्याच्या जोडीला खबरदारी घेणे हाच उपाय परिणामकारक ठरणार आहे. एक एप्रिलपासून आता सरकारने 45 वयांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरीही जादा लस पुरविणे व कोठेही लसीची कमतरता पडू न देणे ही केंद्राची जबाबदारी ठरणार आहे. तरुणांना लस घेण्यासाठी उत्साह चांगला आहे ही सकारात्मक बाब म्हटली पाहिजे. कोरोना शंभर टक्के जाणार नाही कदाचित त्याचे प्रमाण कमी होईल. हळूहळू अन्य रोगांप्रमाणे कोरोना देखील काही काळाने आपल्याकडे स्थीरावेल. गेल्या वर्षी कोरोनाबाबात जी सर्वांच्या मनात भीती होती ती आता राहिलेली नाही. कोरोनाला सोबत घेऊनच आपल्याला वाटचाल करावयाची आहे ही खूणगाठ आता प्रत्येकाने बांधली आहे. त्यामुळेच लोकांना लॉकडाऊन नको आहे. परंतु प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. देशाचे अर्थकारण आता हळूहळू गती घेऊ लागले आहे. शेअर बाजारातही नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्देशांक 50 हजारांच्या वर राहिल्याने तेजीचे संकेत दिले आहेत. एकूणच आपले अर्थाकरण आता गती घेऊ लागले आहे. मात्र याला अधिक गती येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण व कोरोनापासून दूर राहाण्यासाठी घेतले जाणारे खबरदारीचे उपाय हे करावे लागणार आहेत.
0 Response to "एक पाऊल पुढे..."
टिप्पणी पोस्ट करा