-->
एका बोटीने दिला...जगाला धक्का!

एका बोटीने दिला...जगाला धक्का!

4 एप्रिल मोहोरसाठी चिंतन एका बोटीने दिला...जगाला धक्का! एखादे जहाज जगाला हादरा देऊ शकते का? हा प्रश्नच मुर्खपणाचा वाटतो. परंतु गेल्या आठवड्यात एशीच क घटना घडली आणि साऱ्या जगाने त्याचा धसका घेतला. तैवानी कंपनीचे जहाज एव्हग्रीन हे जोराच्या वाऱ्यामुळे सुवेझ कालव्यात अडकले आणि त्या जहाजाने पूर्ण कालवाच व्यापला. त्याचा परिणाम असा झाला की सुवेझ कालव्यातून दररोज होणारी किमान होणारी ५० जहाजांची वाहतूक ठप्प झाली. आठवड्याभरात या कालव्यात सुमारे ४५० जहाजे अडकली आणि त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम झाला. दररोज त्यामुळे नऊ अब्ज डॉलरचे तब्बल नुकसान भोगावे लागले. हे जहाज अवडे अवाढव्य आहे की त्यावर चार फुटबॉलची ग्राऊंड माऊ शकतात व त्याच्यावर दोन लाख टन एवढे अवाढव्य वजन होते. चीनच्या बंदरातून निघालेले हे जहाज सुवेझ कालव्यातून युरोपात जात होते. हे जहाज बाहेर काढण्यासाठी मदत लागली ती लहान टग बोटींची आणि पौर्णिमेच्या चंद्राची. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांनी एकत्रितपणे या मोहिमेत मदत केली आहे. बचाव कार्याने या आठवड्यात पौर्णिमेच्या दिवशी हे जहाज बाहेर निघेल अशी आशा व्यक्त केली होती. रविवारीपासून कालव्यातील पाण्याची पातळी सामान्यत: असलेल्या पातळीपेक्षा एक ते दीड फुट वाढली होती. त्यामुळे कालव्याच्या एका बाजूने जहाजाला बाहेर खेचणे सोपे झाले होते. पृथ्वीच्या भोवती फिरत असताना अशी स्थिती येते ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. हा चंद्र नेहमीच्या आकारापेक्षा मोठा दिसतो. चंद्राच्या या अवस्थेला सुपरमून असे म्हणतात. या दरम्यान गुरुत्वाकर्षण जास्त असते आणि त्यामुळे समुद्राला भरती येते. यावेळी पाण्याचा स्तर हा नेहमीच्या स्तरापेक्षा किमान एक ते दीड फूट वर वाढतो. यंदाच्या पौर्णिमेला सुएझ कालव्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. भरतीमुळे पाण्याची पातळी वाढली आणि जहाज थोडे वर तंरगू लागले आणि या परिस्थितीच फायदा घेत अभियंत्यांना जहाज खेचण्यासाठी मोठी मदत झाली. सुएझ कालव्यात हे जहाज अडकून पडल्याने या जलमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल साडेतीनशेपेक्षा जास्त मालवाहू जहाजे अडकून पडली होती. हे अवाढव्य जहाज जवळपास ४०० मीटर लांबीचे असून ६० मीटर रूंद आहे. आणि त्याचे एकूण वजन दोन लाख टनांइतके आहे. जहाजाला चालना द्यायला ७९,५०० अश्वशक्तिचे प्रमुख इंजीन आहे व त्याव्यतिरिक्त त्यावर वीज निर्माण करायची चार छोटी इंजीन्स आहेत. जहाजाचा ताशी वेग जास्तीत जास्त २२.८ नॉट्स म्हणजेच साधारण ४२.२ किलोमीटर प्रति तासाएवढा आहे. असे हे महाकाय जहाज चीनच्या 'तानजूंग पेलेपास' नावाच्या पोर्ट वरून 'रॉटरडॅम' ला जाण्याकरिता निघाले होते. कन्टेनर प्रकारातल्या जहाजांचा वेग इतर जहाजांच्या तुलनेत जास्त असतो कारण त्यांना वेळ गाठायची घाई असते. अन्यथा त्यावरील नाशवंत माल खराब होण्याची शक्यता असते. आशियातून जहाजांना युरोपात जायला सुएझ कालव्यातून जावे लागते. 'सुएझ कालवा' हा लाल समुद्र ते भुमध्य समुद्राला जोडणारा मानवनिर्मित दुवा आहे. दररोज या कालव्यातून साधारण ९.६ बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक होत असते. हा कालवा नसता तर भूमध्य समुद्रात माल पोहोचवायचा तर आफ्रिकेला वळसा घालावा लागेल, ज्यामुळे मालाला पोहोचायला ८-१० दिवसांची भर पडेल. असा हा इजिप्तची जगाला भेट असलेला १९३ किमी लांबीचा कालवा साधारण १५० वर्षांपूर्वी निर्माण केलेला आहे. या जहाजाने १९३ पैकी जवळपास १५१ किमी चा भाग ओलांडला होता. कधी कधी सहारा वाळवंटातून मोठ्या प्रमाणात वाळूचे वादळ येण्याचा धोका असतो. त्यामुळे जोरदार वारे सुएझ कालव्यात सुद्धा वाहात असतात. जहाजाने पुर्वेकडील मुखापाशी कालव्यातून जहाजाला मार्गदर्शन करणारा, सुरक्षित वाट काढून देणारा जो 'पायलट', त्याला बरोबर घेतले आणि कालव्यात मार्गस्थ झाले. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे जहाज किनाऱ्यावर ओढले गेले. त्याला वाचवण्यासाठी जहाजाची दिशा बदलली गेली, पण त्यामुळे जहाज अधिक अस्थिर झाले व त्यानंतर एका मोठ्या वाऱ्याच्या झोतामुळे जहाज कालव्याच्या उत्तरेकडील तटाच्या रेतीत रुतले. जहाज अडकले आणि व्यापारी जगताची हवा तंग झाली. जसे जहाज रुतले, तसे त्याला परत पाण्यात तरंगवण्याकरिता जहाजावरील कर्मचाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले. हजारो घनमिटर वाळूचा उपसा केला गेला. जहाजावरील अतिरिक्त पाणीसाठा बाहेर ओतण्याता आला. जहाज हलके केले गेले. शेवटी पौर्णिमेच्या दिवशी निसर्गाच्या साथीने हे ऑपरेशन पार पडले आणि जहाज पाण्यावर तरंगू लागले, जगाने निश्वास सोडला. जगातील साधारण ९० टक्के व्यापार हा समुद्र मार्गे होत असतो. भारत दररोज अर्धा मिलियन बॅरल्स कच्च्या तेलाची आयात करतो व त्याच्या शुद्धीकरणातून मिळालेल्या तयार मालाची (साधारण २,००,००० बॅरल्स ची) निर्यात करतो. भारतात येणारे हे कच्चे तेल सर्वच सुएझ कालव्यातून येते. याव्यतिरिक्त सिरीया देशात तेल न पोहोचल्याने तेलाचे भाव कडाडले. जागतिक तेलाच्या किमती तीन टक्क्यांनी वाढल्या आणि कालवा मोकळा झाल्याचे कळताच पुर्वस्थितीवर आल्या. युरोपात ताज्या फळांचा व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. समुद्री व्यापार वरकरणी दिसत नाही, पण तो थांबल्यावर काय होते ते जगाला कळले. या जहाचे भारतीय कनेक्शन म्हणजे त्यावरील सर्वच्या सर्व म्हणजे २५ कर्मचारी भारतीय आहेत. जागतिक वाणिज्य सामुद्रिकीमध्ये भारताचे निर्विवाद वर्चस्व आहे. युरोपाला व आसिया खंडाला तब्बल दीड महिने प्रवास जवळ आमणारा कालवा ही जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. पण हा कालवाच ठप्प झाला तर जगावर काय परिस्थिती ओढावते ते आता जगाने पाहिले. एका बोटीने जगाला फार मोठे वास्तव शिकविले. जग कितीही मोठे वाटत असले तरीही जग हे छोटेच आहे असे या घटना पाहिल्यावर म्हणावे लागते.

Related Posts

0 Response to "एका बोटीने दिला...जगाला धक्का!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel