-->
जीवनवाहिनीला बुस्टर डोस

जीवनवाहिनीला बुस्टर डोस

संपादकीय पान गुरुवार दि. २५ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जीवनवाहिनीला बुस्टर डोस
मुंबईतील जीवनवाहीनी असा जिचा उल्लेख केला जातो त्या मुंबईतील लोकलचा प्रवास दिवसेंदिवस हालाखीचा होत आहे. मात्र त्यासाठी काही तरी केले पाहिजे, प्रवाशांना तातडीने काही तरी दिलासा दिला पाहिजे अशी भावना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची असावी. निदान त्यांनी त्यादृष्टीने काही प्रयत्न सुरु केले आहेत. वक्तशीर लोकल प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा दिवस अद्याप दृष्टिपथात नसला तरी, प्रवाशांचे डोळे दिपवणार्‍या सुविधांचे बुस्टर डोस देत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईकरांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न नुकताच केला. मुंबईत याआधीच तयार होऊन लोकांच्या वापरात असलेल्या काही प्रकल्पांचे लोकार्पण रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. सात स्थानकांवर वाय-फाय सेवा, हार्बर मार्गावरील १२ डब्यांच्या सेवा, अंधेरी येथे नव्याने बांधलेले दोन फलाट, गोरेगाव येथील उन्नत जागा, आठ पादचारी पूल आणि काही प्रसाधनगृहे यांचा या सुविधांमध्ये समावेश आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमात पहिल्यांदाच सुरेश प्रभू यांनी उपनगरीय रेल्वे समस्या सोडवणे जिकिरीचे असल्याचे कबूल केले. रेल्वेमंत्री हे मुंबईत प्रदीर्घ काळ राहिलेले असल्यामुळे त्यांना लोकलच्या प्रश्‍नांची जाण आहे. यातून ते काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील असे दिसते. निदान त्यांची पावले त्यादृष्टीने पडताना दिसत आहेत. चर्चगेट, वांद्रे, वांद्रे टर्मिनस, दादर (मध्य व पश्चिम), खार रोड, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा आठ स्थानकांवर वाय-फाय सेवा सुरू झाली आहे. ही सेवा विनामूल्य असून पहिल्या अर्ध्या तासानंतर वाय-फायचा वेग कमी होणार आहे. अंधेरी स्थानकातील नवीन फलाट प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले असून त्यामुळे अंधेरीपर्यंत १२ डब्यांच्या गाडया हार्बर मार्गावर चालवणे शक्य झाले आहे. हार्बर मार्गाचा विस्तार गोरेगाव स्थानकापर्यंत होणार असून त्यासाठी गोरेगाव स्थानकाच्या पश्चिम दिशेला हार्बर मार्गासाठीचे प्लॅटफॉर्म व स्थानक पूर्ण झाले आहे. त्याच्या वर अंधेरी स्थानकाप्रमाणे उन्नत जागा तयार करण्यात आली असून तेथे तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. महालक्ष्मी येथे चार पाश्चात्त्य शैलीतील प्रसाधनगृहे उभारली आहेत. कुर्ला व ठाणे येथे पाश्चात्त्य शैलीची शौचालये, महिलांसाठी शैचालये आणि दिव्यांगांसाठी शौचालय उभारण्यात आले आहे. वसई रोड, नालासोपारा, कर्जत, शहाड, किंग सर्कल, रे रोड, चेंबूर आणि कुर्ला-कसाईवाडा या ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय नालासोपारा आणि वसई रोड येथे सरकते जिनेही बसवण्यात आले आहेत. अर्थात मुंबईतील ही कामे काही पुरेशी नाहीत. मात्र काही तरी कामे सुरु झाली असे म्हणता येईल. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत जागतिक दर्ज्यांची रेल्वेसेवा आवश्यक आहे. मात्र त्यासाठी किती काळ जाईल हे सांगणे अवघड आहे.

0 Response to "जीवनवाहिनीला बुस्टर डोस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel