-->
मारेकरी एकच?

मारेकरी एकच?

संपादकीय पान गुरुवार दि. २५ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मारेकरी एकच?
पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी याबाबतचा अहवाल सादर केल्याची माहिती मिळाली आहे. नुसतेच एकच पिस्तुल नव्हे तर या तिनही हत्यांची मोडस ऑपरेंडी एकच असल्याचे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असणारा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याचा डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वीरेंद्र तावडेला चौकशीसाठी ताब्यात देण्याची मागणी सीआयडी पोलिसांनी सीबीआयकडे केली होती; मात्र अजूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे सीआयडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कळविले आहे. तिन्ही हत्यांमध्ये २.६५ एम.एम. देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर झालेली जखम व इतर तपासावरून तिघांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाद्वारे करण्यात आल्याचे बंगळुरातील फॉरेन्सिक लॅबोरेटरीने अहवालात नमूद केले होते. डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सध्या सीबीआय करत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बंगळुरातील फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा अहवाल सीबीआयने स्कॉटलंड यार्ड पोलिसांना पाठविला होता. फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा अहवाल आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून ७.६५ एम.एम. देशी पिस्तुलातून एकाच प्रकारे तिघांची हत्या झाल्याचा अंदाज स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी व्यक्त केला. तिन्ही हत्यांमध्ये एकाच प्रकारच्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. वीरेंद्र तावडेकडे काळ्या रंगाची मोटारसायकल आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि डॉ. तावडेच्या मोटारसायकलीत बरेच साम्य असल्याचे दिसून आले आहे. तिन्ही हत्यांमध्ये त्याचा हात असल्याचा संशय स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ३० ऑगस्ट २०१५ रोजी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी धारवाडमधील कलबुर्गी यांच्या घरी जाऊन पिस्तुलाने गोळ्या झाडून हत्या केली. २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात कोल्हापूरमध्ये सकाळी फिरावयास गेलेल्या गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याआधी २०१३ मध्ये पुणे येथे डॉ. दाभोलकरांची याच प्रकारे हत्या झाली होती. तिन्ही हत्यांमध्ये साम्य असून एकाच पिस्तुलातून हत्या झाल्याचे मत स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी व्यक्त केले आहे. स्कॉटलंड यार्डच्या या अहवालामुळे या तिन्ही हत्या करणारा एकच असला पाहिजे हा निष्कर्ष निघतो. तसे झाल्यास सध्या अटकेत असलेल्या विरेंद्र तावडेवर संशयाची सुई वळली आहे. डॉ. दाभोळकरांच्या हत्याबाबत तपासाबाबत सरकार ढिलाई करीत होते. मात्र न्यायालयाने तपासाला गती देण्याचे आदेश दिल्यावर तपास यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. आता स्कॉटलंड यार्डचा एक नवा पुरावा हाती आली आहे. आता तरी तपास यंत्रणेने आपल्या कामास वेग घेतला पाहिजे. सरकारला आता सनातनप्रभातच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अजून किती पुरावे पाहिजे आहेत?

0 Response to "मारेकरी एकच?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel