-->
शनिवार दि. १३ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी विशेष लेख --
-------------------------------------------
रणरागिनी
--------------------------
शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग-मुरुड मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, जनसामान्यांच्या लढ्यात नेहमी अग्रस्थानी असणार्‍या व विधानसभेतील आक्रमक तसेच अभ्यासू म्हणून ओळखल्या गेलेल्या आमदार मिनाक्षीताई पाटील यांचा आज ६८ वा वाढदिवस. रायगड जिल्ह्यातील एक पुरोगामी व मार्क्सवादी विचारसरणीशी बांधीलकी मानणार्‍या पाटील घराण्यात त्यांचा जन्म झाल्याने बालपणीच त्यांना कार्ल मार्क्सच्या विचारांचे बाळकडू मिळाले. तरुणपणीच त्यांनी डाव्या विचारसरणीचे जे कंकण बांधले ते आजपर्यंत. शेतकरी-कामगार कष्टकर्‍यांच्या चळवळीशी नेहमीच बांधीलकी मानणार्‍या ताई आमदार झाल्या, मंत्री झाल्या पण त्यांची नाळ ही नेहमीच कष्कर्‍यांशी व त्यांच्या विचारांशी बांधली गेली. अगदी मंत्री असतानाही त्यांनी लाल दिव्याच्या गाडीचा कधी आग्रह धरला नाही. खणखणीत आवाज, अभ्यासू वृत्तीमुळे त्यांचे विधानसभेतील भाषण म्हणजे सर्वच सदस्यांसाठी एक प्रकारचे वैचारिक खाद्य ठरत आले आहे. ताईंनी विकासाचा नेहमीच ध्यास घेतला. बंदर व खारभूमी विकास राज्यमंत्री असताना त्यांनी एकदा असेच विकासाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फाईल भिरकावून संताप व्यक्त केला होता. एका राज्यमंत्र्याने अशा प्रकारे थेट मुख्यमंत्र्यावरच राग व्यक्त करावा याची चर्चा सर्वत्र झाली. मात्र याचा परिणाम असा झाला की, मिनाक्षीताईंचा मंत्रालयातील दबदवा वाढला. यामुळे त्यांना जनतेच्या हिताची अनेक कामे करता आली. सर्वससामान्यांसाठी झटणारी रणरागिणी अशी त्यांची ओळख राज्याला झाली. अधिकार्‍यांना कधी दमात घेऊन तर कधी त्यांच्या विनम्रपणे वागून कामे काढून घेण्याची त्यांची हातोटी अखेरीस अलिबागकरांच्या हिताची ठरली आहे. शेकाप सातत्याने विरोधात राहूनही आपले आमदार असलेल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्यात यशस्वी ठरला आहे. यामागे त्यांनी सातत्याने केलेला सरकार दरबारी पाठपुरवठा व अधिकारी, मंत्र्यांवर ठेवलेला दबाब यामुळे शक्य झाले. यात मिनाक्षीताईंनी आमदार झाल्यापासून आघाडी घेतली आहे. ताई पहिल्यांदा आमदार झाल्या त्यावेळी अलिबागला विकासाची आस लागली होती. ताईंनी रस्ते, दिवे, छत्रपतींचा पुतळा, आंग्रे समाधीचे सुशोभीकरण, हिराकोट तलावाची साफसफाई ही कामे हाती घेऊन अलिबागचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली. त्यामुळे अलिबागच्या अनेक भागात रस्ते नव्हते. त्यामुळे रस्ते उभारणीला ताईंनी प्राधान्य दिले. अनेक ठिकाणी रस्ते उभारणे सरकारच्या काही नियमांमध्ये बसत नव्हते तिकडे मंदिरे दाखवून रस्ते उभारणीचा मार्ग मोकळा केला. कारण मंदिरांकडे जाण्यासाठी रस्ते मंजूर करुन मिळत असत. अशा प्रकारे कधी नियमाच्या चौकटीत तर कधी नियमांना मुरड घालून विकास कामे करण्याचा त्यांनी सपाटा लावला. कायद्याला मुरड न घालता मात्र त्याला व्यवहाराची सांगड घालीत त्यांनी विकास कसा होईल ते पाहिले. अलिबाग, श्रीबाग येथे एम.आय.डी.सी.चा पाणीपुरवठा सुरु केला. अलिबागला जोडून असलेल्या चेंढरे गावातही पाणी योजना आणण्यात ताई यशस्वी ठरल्या. त्यावेळी नगरपालिकांच्या शेजारी असलेल्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी सरकारी योजना जाहीर झाली होती. त्यातील पहिली योजना चेंढरे गावात आणण्यात त्यांनी यश मिळविले. अलिबाग-मुरुड हा त्यांचा मतदारसंघ टॅकरमुक्त करण्याचे त्यांनी ठरविले आणि ते शक्य करुन दाखविले. मिनाक्षीताई बंदर व खारभूमी विकास राज्यमंत्री झाल्या. हे खाते कोकणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे होते. मच्छिमारांचे या भागातील प्रश्‍न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात पावले उचलली. करंजा, सातपाटी, मिळकतखार या ठिकाणी लॅँडिंग सेंटर सुरु केल्याने त्यांचा कोळी बांधवांना मोठी मदत झाली. वेंगुर्ला हे बंदर स्वातंत्र्यानंतर र्दुलक्षीत झाले होते. आपल्या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी या बंदरातील गाळ काढला. गेल्या ५० वर्षात कुणीही हा गाळ काढला नव्हता. जलवाहतुकीला प्राधान्य दिले. मांडवा बंदर म्हणून विकसीत केले. निवटी येथे मच्छिमारांसाठी जेटी उभारली. दोन वर्षांपूर्वी कायान्वित झालेल्या वरळी ते वांद्रा या सी लिंकचा प्राथमिक अभ्यास र्ता मंत्रीपदी असताना सुरु झाला होता. सान्ताक्रूज येथील मच्छिमारांसाठी १६ कोटी रुपये खर्चुन बंधारा बांधला. गुजरातणधून कोकणात आलेल्या मच्छिमारांमुळे इकडच्या स्थानिक मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा वेळी मनिक्षीताई स्थानिक कोळ्यांच्या बाजून ठामपणे उभ्या राहून त्यांच्या बाजूने आवाज उठविला. त्यांच्या या धोरणाला अनेकांचा विरोध झाला होता. मात्र त्या विरोधाला त्यांनी काही जुमानले नाही. अलिबाग हे पर्यटनाचे मुख्य केंद्र म्हणून विकसीत व्हावे व त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी ताईंनी अनेक योजना आखल्या आणि पूर्णत्वास नेल्या. खारलॅँडसाठी विशेष निधी मंजूर करुन घेण्यात त्या यशस्वी झाल्या. यातील पहिल्या टप्प्यातील निधी आला देखील आहे. गणेशपट्टी हे गाव नेहमी पाण्याखाली येत असे. या संपूर्ण गावाचे पुर्नवसन करणे हे एक मोठे आव्हानात्मक काम होते. परंतु ताईंच्या प्रयत्नातून तिनविरे गावाजवळ येथील सर्व १०० टक्के लोकांचे पुर्नवसन करण्यात आले. सर्व पायाभूत सोयी सवलतींनी युक्त असे संपूर्ण गाव नव्याने वसले आहे. संपूर्ण राज्यातील हा एक अभिनव प्रयोग होता. कुंडलिका नदीतील प्रदुषण ही एक आणखी मोठी समस्या होती. आता ते पाणी दूर समुद्रात सोडण्यात येते व त्या गावासही शुध्द पाण्याचा पुरवठा सुरु झाला आहे. आता भविष्यातही अनेक योजना ताईंच्या प्रयत्नांतून मंजूर झाल्या आहेत. यात प्रामुख्याने वडखळ-अलिबाग चार पदरी मार्ग, साळाव ते मरुड मार्गाचा विस्तार या प्रामुख कामांचा समावेश आहे. गेल्या सुमारे २५ वर्षांच्या आपल्या राजकीय जीवनात मिनाक्षीताईंनी एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे.  
--------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel