
सोशल मीडियाला शेअर बाजारापासून कसे रोखणार?
प्रसाद केरकर, मुंबई
सो शल मीडियाचा सुळसुळाट सगळीकडेच झाल्याने त्याचा प्रसार व प्रचार शेअर बाजारातही होणे स्वाभाविक होते. सोशल मीडिया या शेअर बाजाराच्या फायद्याचा की मारक आहे, अशी चर्चा जगात सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांच्या हे हिताचेही जसे ठरू शकते तसेच त्यांची दिशाभूल करण्याचे एक साधनही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगातील अनेक भागांत शेअर बाजारांच्या टिप्स आता सोशल मीडियावरून देण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाचा सध्या जबरदस्त प्रभाव पडत असल्याने अनेकदा समभागांच्या किमतीची चढ-उतार या टिप्सवर अवलंबून असल्याचे जाणवते. ट्विटरवरच सध्या दररोज सुमारे दहा कोटी ट्विट येतात. अमेरिकेतील एका विद्यापीठाने यासंबंधी एक अभ्यास केला. त्यांनाही असे आढळले की, सोशल मीडिया समभागांच्या किमतीवर मोठा प्रभाव पाडतात. लंडनमध्ये तर एका हेज फंडाने ट्विटरवरून मिळणार्या टिप्समधून व्यवहार करण्यासाठी 25 दशलक्ष पौंडांचा एक स्वतंत्र फंडच केला आहे. केवळ शेअर बाजारच नाही, तर चलन बाजारातील टिप्स अशा प्रकारे सोशल मीडियामार्फत दिल्या जाऊ लागल्या आहेत. अमेरिकेतील काही दलालांनी फेसबुकच्या खात्यावरून थेट समभाग खेरदी-विक्री करण्याची व्यवस्था केली आहे; परंतु अशा प्रकारच्या टिप्समधून गुंतवणूकदार खरोखरीच नफा कमवतात की नाही हा एक संशोधनाचा विषय ठरेल. कारण यातील अनेक टिप्स दलाल मंडळी आपले हित सांभाळण्यासाठी बाजारात पाठवीत असतात.
Prasadkerkar73@gmail.com
0 Response to "सोशल मीडियाला शेअर बाजारापासून कसे रोखणार?"
टिप्पणी पोस्ट करा