
मारिओ माँटी : अर्थशास्त्रज्ञ ते इटलीचे पंतप्रधान
प्रतिनिधी, मुंबई
इ टलीची अर्थव्यवस्था सध्या अगदी रसातळाला गेली असून त्यामुळे संपूर्ण युरोपावर संकट आले आहे. माजी पंतप्रधान सिल्व्हियो बलरुस्कोनी यांचा अशा आर्थिक स्थितीतही काही रंगेलपणा कमी झाला नव्हता. त्यांना असे वाटत होते की, इटलीला वाचवणे हे संपूर्ण युरोपियन समुदायाचे कामच आहे आणि आपल्याला आर्थिक मदत ते देणार असल्याने आपण निश्चिंत राहू. मात्र, शेवटी इटलीची आर्थिक स्थिती बिघडत गेली आणि त्यांना राजीनामा द्यावाच लागला. शेवटी अर्थशास्त्रज्ञ आणि विश्लेषक असलेले 68 वर्षीय मारियो माँटी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. खरे तर मॉन्टी यांचा पिंड राजकारणाचा नाही. त्यांना संपूर्ण देश एक अभ्यासक, अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो. त्यांचा अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्राचा दांडगा अभ्यास आहे. या विषयांचा अभ्यास करताना त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल किताबाचे मानकरी प्रा. जेम्स टोबिन यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर ट्युरिन विद्यापीठात ते प्राध्यापकपदी रुजू झाले. त्यानंतर काही काळाने ते बोक्कोनी विद्यापीठात दाखल झाले. याच विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली होती. अध्यापनाची त्यांना मनापासून आवड असल्याने ते येथे चांगलेच रमले. काही काळाने ते या विद्यापीठाचे अध्यक्ष झाले. विविध प्रकारच्या करप्रणाली आणि बाजारपेठेचे मानसशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय. यातील त्यांचे ‘क्लेन-माँटी मॉडेल’ लोकप्रिय झाले होते. याच काळात ते अध्ययनाचा एक भाग म्हणून विविध युरोपियन गटांच्या संपर्कात होते. युरोपियन समुदायाच्या आर्थिक जडणघडणीचा त्यांनी फार बारकाईने अभ्यास केला. युरोपियन देशांच्या आर्थिक धोरणावर प्रभाव पाडणार्या ‘थिंक टँक’ गटांचे ते सदस्य होते. फ्रेंड्स ऑफ युरोप, ब्रुगेल, ट्रायलॅटरल कमिशन, बिल्डरबर्ग अशा विविध गटांच्या ते संपर्कात होते. या गटांच्या माध्यमातून त्यांनी युरोपियन देशांच्या आर्थिक धोरणांचे विश्लेषण केले. 1994 साली तत्कालीन पंतप्रधानांनी त्यांना खास आमंत्रित करून युरोपियन कमिशनची जबाबदारी सोपवली. या काळात आर्थिक बाजारपेठेतील काही पेच त्यांनी सहजरीत्या सोडवले. माँटी यांनी मायक्रोसॉफ्ट या अमेरिकन टेक्नॉलॉजी महाकाय कंपनीला 500 दशलक्ष युरोचा दंड ठोठावला होता. तसेच जनरल इलेक्ट्रिक व हनीवेल यांचे 42 अब्ज डॉलरचे विलीनीकरण रोखले होते. त्यांनी या कंपन्यांबाबत घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे त्यांची कॉर्पोरेट जगतात जरब बसली. काही काळाने तत्कालीन पंतप्रधानांनी त्यांना बाजूला सारले आणि माँटी पुन्हा एकदा अध्यापनाच्या कामास लागले; परंतु राष्ट्राध्यक्षांनी बलरुस्कोनी यांच्या झालेल्या चुकांमुळे पंतप्रधानपद सोडण्यास सांगितले. शेवटी राष्ट्राध्यक्षांना माँटी यांनाच पंतप्रधानपदासाठी पाचारण करण्याची पाळी आली. 19 मार्च 1943 मध्ये जन्मलेल्या माँटी यांच्यावर आता फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. इटली आता दिवाळखोरीच्या मार्गावर असताना देशाची अर्थव्यवस्था सावरून धरणे ही काही सोपी बाब नाही. प्रामुख्याने देशाची अर्थव्यस्थेची गाडी रुळावर आणताना लोकांना शिस्त लावण्याचे अवघड काम त्यांना करावे लागणार आहे. कदाचित यामुळे त्यांची लोकप्रियताही घसरेल. मात्र, त्यांना त्याची पर्वा नाही.
0 Response to "मारिओ माँटी : अर्थशास्त्रज्ञ ते इटलीचे पंतप्रधान"
टिप्पणी पोस्ट करा