-->
सायरस मिस्त्री : टाटा समूहाचे नवे तरुण नेतृत्व

सायरस मिस्त्री : टाटा समूहाचे नवे तरुण नेतृत्व

सायरस मिस्त्री : टाटा समूहाचे नवे तरुण नेतृत्व


प्रसाद केरकर

बु धवारी सायंकाळी ज्या वेळी रतन टाटा यांचे वारस म्हणून सायरस मिस्त्री यांचे नाव जाहीर झाले त्या वेळी अनेकांना आश्चर्य वाटले. कारण शापूरजी पालोनजी समूहाचे 43 वर्षीय व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सायरस मिस्त्री यांचे नाव रतन टाटांचे वारसदार म्हणून कधीच चर्चेतही नव्हते. सुमारे 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेला समूह सांभाळणारे मिस्त्री कधीही प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. ते कधी पेज थ्रीच्या ग्लॅमरस कॉकटेल पाटर्य़ांनाही हजर राहणे पसंत करीत नाहीत.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले सायरसचे वडील शापूरजी पालोनजी मिस्त्री हे मुंबईतल्या काही मोजक्या गर्भर्शीमंतांपैकी एक होते. मिस्त्री व टाटा समूहांचे सुरुवातीपासून जवळचे संबंध होते. नंतर पुढील काळात या दोन घराण्यांत लग्नेही जमल्याने ते आणखी जवळ आले. शापूरजींच्या एका मुलीचे लग्न रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाले आहे. शापूरजींना बॉम्बे हाऊसचे ‘फँटम’ असेही संबोधले जाते. दहा वर्षांपूर्वी शापूरजींनी आयर्लंडचे नागरिकत्व स्वीकारले आणि ते तेथील सर्वात र्शीमंत व्यक्ती ठरले आहेत.

सायरस हा त्यांचा धाकटा मुलगा. सायरस यांचा शांत स्वभाव, गोल्फ खेळण्याची आवड असलेले, भरपूर वाचण्याची आवड असलेले आणि टिपिकल कौटुंबिक पारशी गृहस्थ अशी त्यांची कॉर्पोरेट जगताला आजवरची ओळख आहे. एवढे र्शीमंत असूनही त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. विविध मोटारींची त्यांना विशेष आवड. त्यांचा मुंबईत मुक्काम असला तरी पुणे व लंडन येथे त्यांची घरे आहेत. युरोप हे त्यांचे सुटीला जाण्याचे आवडते ठिकाण. त्यांचा जन्म मुंबईतला. त्यांचे शालेय शिक्षणही येथेच झाले. त्यानंतर लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केले. लंडन स्कूल बिझनेसमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी संपादन केल्यावर ते पुन्हा मायदेशी परतले.

वयाच्या 23 व्या वर्षी ते शापूरजी पालोनजी अँड कंपनीच्या संचालक मंडळात दाखल झाले. तेथूनच त्यांच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील करिअरला प्रारंभ झाला. ते एवढे लो-प्रोफाइल आहेत की त्यांचा परिचय विकिलिक्सच्या साइटवरही नव्हता. त्यांची नियुक्ती झाल्यावर काही क्षणाने त्यांचा परिचय विकिलिक्सवर करून देण्यात आला. तसेच ते फेसबुक किंवा ट्विटरही नव्हते. आता मात्र ते या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्या हातात शापूरजी पालोनजी अँड कंपनीची सूत्रे आली त्या वेळी तिची उलाढाल जेमतेम 100 कोटी रुपयांची होती. ती उलाढाल त्यांनी आता 7500 कोटी रुपयांवर पोहोचवली आहे. शापूरजी पालोनजी हा समूह प्रामुख्याने बांधकाम व्यवसायात आहे आणि त्यांची जगभरात कामे सुरू आहेत. गेल्या दहा वर्षांत ही कंपनी भरभराटीस आणण्यात सायरस यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्व गुणाची चमक येथेच सर्वांना दिसली होती.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वभावाने अतिशय शांत म्हणून त्यांची ओळख आहे. शांतपणे आणि निश्चयाने काम करीत राहणे हा त्यांचा एक सर्वात महत्त्वाचा गुण. टाटा समूहाचा विस्तार आता जगातील 80 देशांत पोहोचला असल्याने त्यासाठी सार्थ ठरेल, असे ग्लोबल नेतृत्व त्यांना हवे होते. सायरस यांच्या रूपाने अशा प्रकारचे नेतृत्व त्यांना लाभले आहे. तसेच त्यांच्या नियुक्तीमुळे टाटा समूहाला एक नवा तरुण चेहरा मिळाला आहे.

Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "सायरस मिस्त्री : टाटा समूहाचे नवे तरुण नेतृत्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel