-->
सर्मथ वारसदार

सर्मथ वारसदार

 सर्मथ वारसदार
 Published on 25 Nov-2011 EDIT
कॉर्पोरेट जगतातील 142 वर्षांची ओजस्वी परंपरा आणि तब्बल 82 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा उद्योगसमूहाची पुढील काळातील सूत्रे कोणाकडे असणार याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते. गेले वर्षभर चर्चेत असलेल्या या विषयाला अखेर विराम मिळाला तो शापूरजी पालनजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस मिस्त्री यांच्या नेमणुकीने. विद्यमान अध्यक्ष रतन टाटा यांचे वय पुढील वर्षी 75 होणार असल्याने त्यांचा वारस शोधण्यास सुरुवात झाली त्या वेळी नोएल टाटा, इंद्रा नुई, केकी मिस्त्री अशा काही कॉर्पोरेट जगतातील मोजक्या ‘दादा मंडळींची’ नावे चर्चेत होती. परंतु सायरस यांचे नाव साधे चर्चेतही नव्हते. कारण ते वारसदार निवडीच्या समितीतच होते. मात्र बुधवारी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सची बैठक झाली आणि त्यात सायरस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले त्या वेळी तमाम कॉर्पोरेट जगतापासून ते मीडियापर्यंत सर्वांना धक्का बसणे स्वाभाविकच होते. टाटा समूहाच्या अध्यक्षपदी अशा प्रकारे टाटा घराण्याबाहेरील व्यक्तीची नेमणूक होण्याची ही दुसरी वेळ. यापूर्वी 1932 मध्ये सर नौरोजी सकलतवाला यांची नियुक्ती झाली होती. जे.आर.डी.नी 1938 मध्ये सूत्रे घेतल्यावर पुन्हा टाटा घराण्यातील व्यक्ती अध्यक्षपदी विराजमान झाली. आता पुन्हा 74 वर्षांनंतर टाटा समूहाचे नेतृत्व ‘बिगर टाटां’कडे असेल. रतन टाटा यांची 1981 मध्ये ज्या वेळी नियुक्ती झाली त्या वेळी टाटा समूहात जे.आर.डी. टाटांचा जबरदस्त दबदबा होता. त्यामुळे आपला वारस ठरवण्याचा अधिकार जे.आर.डी.यांच्याकडेच होता. त्या काळी नाल्को ही तोट्यातील कंपनी फायद्यात आणून दाखवल्याने अध्यक्षपदासाठी आपण वारस असल्याचे रतन टाटांनी सिद्ध करून दाखवले होते. रतन टाटांची निवड योग्य असल्याचे पुढे सिद्धही झाले. परंतु आता टाटा समूहात तशी परिस्थिती नाही. एक तर टाटा हेच आडनाव असलेल्या व्यक्तीला या पदावर बसवणे हाच एकमेव निकष ठेवता येणार नव्हता. केवळ हाच निकष असता आणि हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार रतन टाटा यांच्याकडे असता तर त्यांनी कदाचित आपला सावत्रभाऊ नोएल टाटा याला या पदावर बसवलेही असते. परंतु तसे झाले नाही. गेल्या दोन दशकात रतन टाटा यांनी या समूहात आमूलाग्र बदल घडवून आणले आणि व्यावसायिक दृष्टिकोन आणला. याच व्यावसायिक दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून टाटा घराण्यातील नसलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्याचा विचार सुरू झाला. कारण आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आपल्याकडील कॉर्पोरेट जगतालाही स्वत:मध्ये झपाट्याने बदल करणे भाग पडले. कोणतेही औद्योगिक घराणे पारंपरिक ‘घराणेशाहीला’ चिकटून राहिले तर ते काळाच्या पडद्याआड जाण्याचा धोका असतो. यासाठी अनेक औद्योगिक घराण्यांनी आपल्या कंपन्यांच्या कारभारात ‘व्यावसायिकता’ आणली. यात रतन टाटा आघाडीवर होते. टाटा समूहाचा कारभार आता जगातील 80 देशांत पसरला असून जग ही त्यांच्यासाठी बाजारपेठ आहे. जागतिक स्पर्धेच्या युगात टिकाव धरायचा असेल तर समूहाकडे ग्लोबल दृष्टिकोन असावयास हवा. त्याचबरोबर व्यवस्थापकीय कौशल्य असलेली टीम असावी लागते. सध्याच्या युगात औद्योगिक घराणी ही संकल्पना कालबाह्य होत चालली आहे. हे सर्व साध्य करण्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापकांची टीम आता बाजारात उपलब्ध असते आणि या टीमचे नेतृत्व ग्लोबल दृष्टिकोनाचे हवे. सायरस यांची निवड करताना टाटा समूहाने हेच नेमके पाहिले. शिक्षणाने सिव्हिल इंजिनिअर आणि लंडन बिझनेस स्कूलसारख्या नामवंत संस्थेतून व्यवस्थापकीय पदवी घेतलेले सायरस मिस्त्री हे या नव्या कॉर्पोरेट शैलीत योग्यरीत्या बसणारे आहेत. आज वयाच्या 43व्या वर्षी त्यांच्या गाठीशी कॉर्पोरेटचा सुमारे 15 वर्षांचा अनुभव आहे. तसेच त्यांनी आपल्या वडिलांच्या मालकीच्या असलेल्या शापूरजी पालनजी समूहाचा गेल्या दहा वर्षांत झपाट्याने विस्तार करून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. आतापर्यंत 15 हजार कोटी रुपये उलाढालीच्या समूहाचे नेतृत्व केल्याने टाटा समूहाच्या 100 कंपन्यांचे ते सर्मथपणे आणि सहजरीत्या नेतृत्व करू शकतात. सायरस यांच्या नियुक्तीमागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शापूरजी पालनजी समूहाला आपले टाटा समूहातील वर्चस्व दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. टाटा सन्स लि. या टाटा समूहाच्या होल्डिंग कंपनीत शापूरजी पालनजी यांचे सुमारे 18.5 टक्के भांडवल आहे. जे.आर.डी.असताना त्यांनी टाटा समूहातील 12 टक्के भांडवल खरेदी केले होते. त्याच वेळी ही बाब जे.आर.डीं.ना फार काही रुचली नव्हती. अर्थात टप्प्याटप्प्याने मिस्त्री यांनी मोठय़ा धूर्तपणाने टाटा सन्समधील आपले भांडवल वाढवत नेले. आता तर ते टाटा समूहातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. टाटा घराण्याचे भांडवल हे सर्व ट्रस्टच्या माध्यमातून आहे. व्यक्तिश: रतन टाटा यांच्याकडे एक टक्काही समभाग नाहीत. अर्थात टाटा समूहाने ‘विश्वस्त’ म्हणून राहण्याची भूमिका पहिल्यापासून स्वीकारली आहे. पालनजी मिस्त्री यांचे एवढे भांडवल असूनही ते आजवर एक ‘सायलेंट’ गुंतवणूकदार म्हणूनच राहिले होते. एसीसी ही सिमेंट कंपनी टाटांनी ज्या वेळी विकावयास काढली त्या वेळी ती खरीदण्यात पालनजी समूहाला रस होता. परंतु रतन टाटांनी त्यांची डाळ शिजू दिली नव्हती. आता मात्र नेतृत्वाचा प्रश्न आल्यावर त्यांनी सायरस मिस्त्री यांच्या बाजूने कौल दिला. सायरस यांच्या निवडीमागे अशा प्रकारचा ‘सुप्त कॉर्पोरेट बॅटल’ असला तरी त्यांची निवड सार्थच आहे, हे काळ सिद्ध करील.

0 Response to "सर्मथ वारसदार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel