-->
बुर्ज खलिफा स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य

बुर्ज खलिफा स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य

 बुर्ज खलिफा स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य
Published on 25 Nov-2011 KIMAYA
दुबईतल्या शेखना जगातील उंच इमारत आपल्या देशात असावी आणि त्यांना दुबई हे जगातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून विकसित करण्याची मनीषा असल्याने त्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे काम दक्षिण कोरियाच्या सॅमसंगकडे सोपवण्यात आले होते. याचे आर्किटेक्ट होते अँड्रिन स्मिथ आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर होते बिल बेकर. या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल 1.5 अब्ज डॉलर एवढा खर्च झाला आहे. या टॉवरच्या उभारणीसाठी जगातील या नामवंत आर्किटेक्टनी आपल्या जिवाची बाजी लावली. 
सुरुवातीला हा टॉवर 808 मीटर उंचीचा उभारण्याचा विचार होता. मात्र या इमारचीचे देखणेपण टिकवण्यासाठी व उंचीचा समतोल साधण्यासाठी नंतर उंची वाढवण्याचे ठरले. या टॉवरची आखणी स्कीडमोर या अमेरिकन कंपनीने केली आहे. याच कंपनीने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरची उभारणी केली होती. त्याचबरोबर दुबईत असलेल्या इस्लामिक स्थापत्यशास्त्राला साजेशी अशी ही इमारत ठेवण्याकडेही कल होता. हा टॉवर वाळू असलेल्या आखाती भागात उभारला जाणार असल्याने त्याच्या उभारणीसाठी विशेष दखल घ्यावी लागणार होती. याचा ‘वाय’ आकार असलेल्या गच्च्यांमुळे या इमारतीच्या कोणत्याही भागातून पर्शियन आखाताचा संपूर्ण नजारा दिसतो. सुरुवातीला आखलेल्या इमारतीत प्रत्यक्ष बांधकाम करताना अनेकदा बदल करावे लागले. त्यातील एक महत्त्वाचा केलेला बदल म्हणजे वार्‍याच्या झोताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून ही इमारत 120 डिग्रीमध्ये बदलण्यात आली. याच्या उभारणीसाठी 4000 टन पोलाद वापरण्यात आले. याच्या मधोमध 350 टन वजनाचा एक पाइप टाकण्यात आला आहे. यातून दळणवळणाच्या उपकरणांसह, पाणी व अन्य वस्तूंची वाहतूक केली जाते. या संपूर्ण इमारतीत अँल्युमिनियम व स्टेनलेस स्टीलची तावदाने वापरण्यात आली आहेत. 
दुबई शहरात तापमान कितीही असले तरी या इमारतीत मात्र 24 तास सहा डिग्री तापमान कायम राखले जाते. याच्या भोवती 26,000 काचेची तावदाने आहेत आणि याच्या उभारणीसाठी चीनहून तज्ज्ञ आणण्यात आले होते. या इमारतीत जाण्यासाठी जगातील सर्वात वेगवान असलेल्या 57 लिफ्ट व सामानाची वाहतूक करण्यासाठी आठ मोठय़ा लिफ्ट आहेत. इमारतीचा 160 वा मजला शेवटचा असून तेथे चालत जाण्यासाठी 2,909 पायर्‍या आहेत. या इमारतीत पायर्‍या असल्या तरी चढत जायला येथे परवानगी नाही. लिफ्टचा वापर सक्तीने करावा लागतो. या इमारतीत पाणी नेण्यासाठी 100 कि.मी. लांबीची पाइपलाइन आहे. आगीपासून संरक्षण करण्यासाठी ही पाइपलाइन संपूर्ण इमारतीत फिरवण्यात आली आहे. 
बुर्ज खलिफामध्ये एकूण 24,348 खिडक्या आहेत. या खिडक्या बाहेरून स्वच्छ करण्यासाठी 36 कामगारांना चार महिन्यांचा कालावधी लागतो. या इमारतीच्या बांधकामासाठी 110,000 टन खास प्रकारचे मजबुती वाढवणारे कॉँक्रीट वापरण्यात आले. या खास प्रकारच्या कॉँक्रीटमध्ये एवढय़ा मोठय़ा इमारतीचा डोलारा सांभाळण्याची ताकद आहे. त्याचबरोबर आखातातील 50 डिग्री तापमानाची क्षमता पेलण्याची ताकद यात आहे. 
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बाहेरील उष्णतेचा परिणाम होऊ नये म्हणून बांधकाम करताना कॉँक्रीटचा वापर हवेत गारवा असताना करण्यात आला. उन्हाळ्याच्या दिवसात कॉँक्रीटमध्ये पाणी न घालता बर्फाचा समावेश करण्यात आला. बांधकाम करताना कुठेही तडा जाणार नाही याची खात्री घेण्यात आली. कारण जर बांधकामाला तडा गेला असता तर हा संपूर्ण प्रकल्पच धोक्यात आला असता. 
याच्या संपूर्ण उभारणीसाठी 22 दशलक्ष मनुष्यदिवस लागले. प्रत्येक 35 व्या मजल्यावर वातानुकूलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. अशा प्रकारे हा अवाढव्य जगातील सर्वात उंच टॉवर उभारणे ही काही सोपी बाब नव्हती. मात्र हे आव्हान स्थापत्यशास्त्रज्ञांनी यशस्वीरीत्या पेलले. 
Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "बुर्ज खलिफा स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel