-->
राणीला जीवदान

राणीला जीवदान

संपादकीय पान शुक्रवार दि. २६ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
राणीला जीवदान
गेले शतकभर प्रवाशांच्या सेवेत असलेली ऐतिहासिक माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन बंद करण्याचा रेल्वेचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे माथेरानच्या या राणीला सध्यातरी जीवदान लाभले आहे. या ट्रेनची दोन इंजिन नेरळ येथून क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये टाकून दार्जिलिंग येथे नेण्यात आली. त्यानंतर, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र इंजिन अद्ययावत करण्यासाठी दार्जिलिंगला पाठविण्यात येत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान जोडून ती पुन्हा माथेरानला आणली जातील, असे सांगण्यात आले.  त्याचप्रमाणे, या ट्रेनच्या डब्यांमध्येही हवेच्या दाबावर चालणारे ब्रेक बसविण्यात येतील आणि त्याचे काम सुरू आहे. रुळांमधील अडचणी, संरक्षक भिंत अशी काही कामे पूर्ण करून मिनी ट्रेन पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मिनीट्रेनचे डबे नॅरोगेज रुळावरून मे २०१६ मध्ये लागोपाठ दोन वेळा घसरले. त्यानंतर नेरळ -माथेरान मिनीट्रेन आणि माथेरान-अमन लॉज शटल सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती. त्यानंतर आजतागत मिनीट्रेन आणि शटल सेवा बंद आहे. रेल्वे प्रशासनाला १०० वर्षे जुन्या आणि जगातील वारसासाठी युनोस्ककडे नामांकन सादर करण्यात आलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनला रेल्वे प्रशासनाला नॅरोगेजवर कायम ठेवायचे नाही असे दिसत आहे. कारण, २० किलोमीटर लांबीच्या या छोट्या लाईनवरील २०० हून अधिक वेडीवाकडी आणि जागच्या जागी असलेली वळणे यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या मिनीट्रेनच्या भविष्याबाबत रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचे बोलले जात आहे. आता मात्र रेल्वेने ही ट्रेन सुरुच राहाणार असल्याचे स्पष्ट केल्याने माथेरानच्या या राणीला सध्यातरी जीवदान लाभले आहे, असेच दिसते.

Related Posts

0 Response to "राणीला जीवदान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel