-->
सायचीनचे वास्तव

सायचीनचे वास्तव

संपादकीय पान शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सायचीनचे वास्तव
तब्बल सहा दिवसांपूर्वी सायचीनच्या रक्त गोठविणार्‍या थंडीत हिमवादळ आले आणि दहा जवानांची तुकडी गाढली गेली. मात्र त्यातील एका जवानाला जीवंत काढण्यात यश आले आहे. हणमंतप्पा या सैनिकाची आता जीवन मरणाची लढाई सुरु आहे. लष्कराच्या दिल्लीतील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. खरे तर उणे ५० तापमान असलेल्या या थंडीत आलेल्या हिमवादळातून बचावणे म्हणजे एक नशिबाची मोठी साथ होती. गेल्या ३० वर्षात सायचीनमध्ये हजारो जवानांचे प्राण आपण गमावले आहेत. एकीकडे पाकिस्तान व त्याला जोडून चीनची सीमा असलेला हा भाग साटचीन म्हणून ओळखला जातो. या भागाने कधीच भूमी पाहिलेली नाही, कारण इथे बाराही महिने बर्फच असते. सायचीनचा तेथील भाषेतील अर्थ आहे, गुलाबांचा प्रदेश. मात्र हा गुलाबांचा नाही तर पांढर्‍या गुलाबांचा प्रदेश आहे. येथून शत्रूचा प्रवेश कधीही होऊ शकतो, त्यामुळे या बर्फातही आपले जवान पहारा देत असतात. अर्थात येथील वातावरणामुळे किंवा गोळ्या लागल्यामुळे जवानांचे प्राण जात नाहीत तर हिमवादळांमुळे जातात हे एक वास्तव आहे. गेल्या कित्येक वर्षात आपण हजारो मोहोरे गमावले, मात्र एकच हणमंतप्पाची मत्यूशी झुंज सुरु आहे. अन्य जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जिवंत माणसाला गोठवून त्याचा पुतळा करणारी भयानक थंडी, हिमवादळ आणि प्राणवायूची कमतरता, याच्याशी झुंज देणे काही सोपे नाही. एकवेळ युध्दभूमीवर थेट लढाई करणे सोपे म्हणावे असे तेथील वातावरण आहे. त्यासाठी येथे जगण्यासाठी जवानांना सर्वात पहिल्यांदा त्यांचे मनोबल मजबूत करावे लागते. तेथे प्रथम जगण्याची लढाई जिंकावी लागते. त्यानंतरच्या टप्प्यात शत्रूशी दोन हात करावे लागतात. अर्थात गेली कित्येक वर्षे भारतीय जवान आपली ही सेवा कणखरपणे बजावत आहेत. त्याबद्दल त्यांना सलाम. बर्फाळ प्रदेशात आपण पर्यटनाला जाऊन तेथील आनंद लुटतो. मात्र एवढ्या कडाक्याच्या थंडीत रक्त गोठवून तेथे देश सेवा करणे ही बाब काही सोपी नाही. या जवानांची केवळ ही नोकरी नाही तर त्यांच्या असलेल्या देशप्रेमामुळे तेथील परिस्थीतीवर ते मात करीत आले आहेत. मग आपल्यापुढे प्रश्‍न उपस्थीत होतो की, खरोखरीच आपण सायचीनच्या या थंडीत आपले सैन्य ठेवावे का? शेकडो जवानांचे प्राण एकीकडे आपण गमावत असताना दुसरीकडे दररोज करोडो रुपये या भूभागाच्या संरक्षणासाठी आपण खर्च करीत आहोत. त्याची खरोखरीच गरज आह का, असाही सवाल उपस्थीत होणे स्वाभाविक आहे. एका बाजूला पाकव्याप्त काश्मीरमधले पाकिस्तानचे सैन्य आणि दुसर्‍या बाजूला महत्त्वाकांक्षी चीन, या बेचक्यात असलेल्या या सायचीनमध्ये सैन्य ठेवून करोडो रुपये वाचवू व त्याएवजी विकास कामांवर खर्च करु असा दुसरा एक विचारही आपल्या मनाला शिवू शकतो. परंतु ८०च्या दशकात पाकने येथूनच घुसखोरी केली होती, हे विसरता येणार नाही. परंतु  दक्ष असलेल्या भारतीय सैन्य आणि हवाई दलाने काही दिवसांत पाकचा हा डाव हाणून पाडला होता. त्यामुळेच सियाचीनमध्ये पहारा देण्याची गरज आहे. त्यामुळेच शेकडो जवानांच्या प्राणांची किंमत चुकवत सियाचीनवर नियंत्रण ठेवण्याची कामगिरी भारताला करावी लागते आहे. पाकिस्तानने हा प्रश्‍न चर्चेतून कधी सोडविण्याचा प्रयत्न केलेला नाही. सध्याच्या काळातही त्यात तसुभर सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. सिमला करारात या भागातील सीमेची आखणी करण्यात आली नव्हती. खरे तर हा प्रश्‍न भारत-पाक-चीन यांत्री एकत्र बसून सोडविला पाहिजे. नजिकच्या काळात हा प्रश्‍न सोडविला जाणे कठीण आहे. कारण पाक व चीन हे नेहमीच येथून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे हा भाग संवेदनाक्षम आहे. आपण जसे कडाक्याच्या थेडीत या भागात सीमेचे रक्षण करतो तीच स्थिती या दोन देशांची देखील आहे. त्यामुळे आपण हा भाग वार्‍यावर सोडू शकत नाही. अर्थात जर काही अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले व मानवाच्या जागी जर आपण येथे संरक्षणासाठी रोबोट ठेवले किंवा उपग्रहांच्या मार्फत या भागांवर लक्ष ठेवले तर आपण इथले जवान मागे घेऊ शकतो. अर्थात या सर्व जर तरच्या गप्पा झाल्या. सध्या तरी आपल्याला सैनिकांनाच तेथे रक्षणासाठी ठेवावे लागणार आहे, हे सायचीनचे वास्तव आहे आणि ते आपण स्वीकारले पाहिजे.
--------------------------------------------------------

0 Response to "सायचीनचे वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel