
कोरोना राहाणारच
23 May 2020 अग्रलेख
कोरोना
राहाणारच
कोरोनाची लागण आता देशात झपाट्याने वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखावर पार झाली असून त्यात दररोज सरासरी चार ते पाच हजारांनी वाढ होत चालली आहे. आपल्या देशाची एकूण लोकसंख्या पाहता कोरोनाग्रस्तांची संख्या अगदीच अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी 80 टक्के कोरोनाग्रस्त हे महानगरात आहेत. संपूर्ण देशातील हे चित्र असेच आहे. आता आणखी एक धोक आहे तो, शहरातून ज्यांचे आता ग्रामीण भागात स्थलांतर होत आहे त्यांच्याकडून कोरोनाचा फैलाव होण्याचा असलेला धोका. सध्या वाढत असलेली संख्या ही निश्चितच चिंतादायक म्हटली पाहिजे. गेले दोन महिने आपण लॉकडाऊनमध्ये आहेत, तरी देखील आपण कोरोनाची वाढत जाणारी शृंखला तोडण्यात शंभर टक्के यशस्वी झालेलो नाही. याबाबतीत सरकारला सर्व दोष देता येणार नाहीत. जनतेत यासंबंधी शंभर टक्के जागृती नसल्याने झाले आहे. सरकार प्रत्येक नागरिकावर 24 तास घरी बसण्याची जबरदस्ती करु शकत नाही. त्याचबरोबर सरकारने लॉकडाऊन हा त्यावर शंभर टक्के उपाय असल्याचे बिंबवल्याने लोकांचा मोठा संभ्रम झाला. लॉकडाऊनच्या सोबत दोन व्यक्तितील अंतर पाळणे आवश्यक आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यासंबंधी सरकारला दोष देऊन चालणार नाही. यात दोष जनतेचा आहे. लोकांना अजूनही या साथीविषयी व याच्या नियंत्रणासाठी जे उपाय करावयाचे आहेत त्यासंबंधी गांभीर्य वाटत नाही. त्यामुळेच शहरात दाट लोकसंख्येच्या ठिकाणी कोरोना झपाट्याने पसरत आहे. लोकांचा असा भ्रम झाला किंवा सरकारने करुन दिला की लॉकडाऊनंतर सर्व काही आलबेल असेल व जनता आपल्या कामाला लागेल. मात्र आता चौथा लॉकडाऊन सुरु आहे तरीही कोरोना फैलावण्याचा वेग काही कमी झालेला नाही. तिसरा लॉकडाऊन झाल्यावर लोकांचा संयम आता सुटू लागला आहे. अजून किती काळ लॉकडाऊन सुरु राहाणार अशी मनात भीतीही आहे. एकीकडे अनिश्चित झालेला रोजगार, काही ठिकाणी झालेली पगार कपात त्यामुळे जनता हैराण आहे. स्थलांतरीत मजुरांना आपले जीवन अंधकारमय दिसू लागले व रोजगाराची आशा माळवली त्यावेळी त्यांनी पायी का होईना आपले गाव गाठण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यानंतर केंद्र सरकारला जाग आली व विशेष गाड्या सोडण्याचे फर्मान निघाले. उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड या राज्यातील ग्रामीण भागातून आलेल्या स्थलांतरीत मजुरांना जसे घर गाठणे आवश्यक वाटू लागले तसेच शहरातील नागरिकांना देखील आता लॉकडाऊन बस झाले असे वाटू लागले आहे. बरे, या लॉकडाऊनमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. मग आपण घरी बसून करायचे तरी काय? व असे किती काळ राहाणार? अशी चिंता सर्वांना भेडसाविते आहे. त्यामुळे जर असेच असेल तर कोरोना अजून काही काळ राहाणार हे गृहीत धरुनच कामाला लागायला काय हरकत आहे, अशी जनतेच्या मनात आता धारणा निर्माण झाली आहे. परंतु लोकांची ही भावना ओळखून सरकारने जर सर्व काही सुरु केले तर कोरोनाचा फैलाव आणखी जोराने वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी सरकारने यासंबंधी एक ठोस धोरण आखून व त्यासंबंधी जनतेला विश्वासात घेऊन पुढे जायला पाहिजे. कोरोनावर जोपर्यंत लस किंवा औषध सापडत नाही तोपर्यंत यावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही, हे आता लॉकडाऊनमुळे सिध्द झाले आहे. लस ही सध्या संशोधनाच्या मार्गावर आहे व त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स होऊन ती बाजारात येईपर्यंत किमान आठ-दहा महिने जातील असा अंदाज आहे. वर्षाअखेरपर्यंत ही लस सर्व देशात उपलब्ध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा स्थितीत सतत लॉकडाऊन वाढवित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे जेथे साथ मोठ्या प्रमाणात आहे तेथे व त्याभोवतीचा विभाग वगळता अन्य भाग आता हळूहळू खुला करीत जाणे आवश्यक ठरणार आहे. राज्य सरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. मुंबई हा सर्वात हॉटस्पॉट असल्याने तेथे फार काही सवलती देणे शक्य होणार नाही. तसेच मोठी लोकसंख्या ही देखील अनेक ठिकाणी अडचण ठरते. सर्वात महत्वाचे म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सुरु करावयाची? कारण बस, रेल्वे सुरु केल्यास महानगरात कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. अशा स्थितीत अनेक मर्यादा ओळखत शिथीलता आणावी लागणार आहे. दिल्ली या राजधानीच्या ठिकाणी थोडी शिथीलता दिल्यावर लगेचच रस्ते गर्दीने फुलले. मुंबईतही तसेच होणार, त्यामुळे सध्याच्या स्थितीत कोरोना कसा फैलावणार नाही हे लक्षात घेऊनच शिथीलता करावी लागणार आहे. रेल्वेने दीर्घपल्याच्या काही मर्यादीत गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. काही शहरे विमानसेवेने जोडण्यास सुरुवात होत आहे. आन्तरराष्ट्रीय विमानसेवा सध्या तातडीने नाही तरी येत्या दोन महिन्यात सुरु होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हळूहळू पावले उचलली जात आहेत. हे करीत असताना पावलोपावली धोके आहेत. ते धोकेही विसरुन चालणार नाहीत. ज्याप्रमाणे अन्य रोग आहेत तसेच कोरोना दखील आहे व तो काही काळ राहाणार आहे हे गृहीत धरुनच आपल्याला आता वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाला घाबरुन चालणार नाही तर शिस्त पालन करुनच त्याचा मुकाबला करावा लागेल. तरच आपण कोरोनाची ही लढाई जिंकू.
0 Response to "कोरोना राहाणारच"
टिप्पणी पोस्ट करा