व्रत्रस्थ दादा सामंत
24 May 2020 मोहोरमधील चिंतन
व्रत्रस्थ दादा सामंत
झुंझार कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचे थोरले बंधू दादा सामंत यांनी शुक्रवारी आपली जीवनयात्रा आत्महत्या करुन 91 व्या वर्षी संपवली. अनपेक्षीत व सर्वांना धक्का वाटावा अशीच ही घटना होती. त्यांच्या जाण्याने गिरणी धंद्याची जाण असलेले व कामगार लढ्यात डॉ. सामंतांसोबत सावली म्हणून वावरणारे एक ज्येष्ठ कामगार नेते काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत, असे म्हणावे लागेल. तसे पाहता दादा सामंत हे काही कामगार चळवळीतून पुढे आले नव्हते. परंतु डॉ. सामंतांनी त्यांना या चळवळीत ओढले व त्यांनी हे काम व्रत म्हणून मोठ्या निष्ठेने आयुष्याच्या शेवटपर्यंत बजावले. 81 ला गिरणी संप सुरु होण्याअगोदर डॉ. सामंतांचा कामगार चळवळीत एक दबदबा निर्माण झाला होता. कामगार चळवळीला त्यांनी नवी परिणामे दिली होती. त्यांच्याकडे चांगले साथीदार, कार्यकर्त्यांची फौज होती, परंतु आपल्या घरातील जवळचा म्हणावा असा एखादा विश्वासू साथीदार नव्हता. त्यामुळे डॉक्टर सामंतांनी आपल्या या थोरल्या बंधूला नोकरी सोडून युनियनमध्ये सामिल करुन घेतले. मालवणच्या भूमीत जन्मलेल्या दादांनी मुंबईला येऊन बी.एस.सी. केले व एका टिपीकल मध्यमवर्गीयाप्रमाणे रेल्वेत नोकरी सुरु केली. कालांतराने ही नोकरी सोडून ते मिलमध्ये नोकरीला लागले. तेथे व्यवस्थापकाच्या हुद्यापर्यंत पोहोचले होते. जवळपास दोन तपाहून जास्त काळ नोकरीत घालविल्यावर त्यांना डॉक्टर सामंतांनी आपल्याकडे सहभागी करुन घेतले होते. डॉक्टर सामंतांचे व्यक्तीमत्व हे वेगळे होते. ते पारंपारिक पध्दतीने चालविल्या जाणाऱ्या डाव्या किंवा उजव्या विचारांच्या युनियन्सप्रमाणे कामगार चळवळ चालवित नव्हते. त्यामुळे या दोन्ही विचारसारणीच्या लोकांचा डॉक्टरांच्या युनियन्सला विरोध असायचा. कामगारांना निव्वळ आर्थिक लाभ मिळवून देणे हे त्यांचे उदिष्ट होते. यासाठी जो संघर्ष कारावा लागेल लागे त्यासाठी ते अगोदरच कामगारांची मानसिकता तयार करीत. आमची युनियन करायची असेल तर एक वर्षाचे घरातील राशनपाणी भरुन या, मगच संघर्षाला उतरा, असे सांगत. डॉक्टरांचे हे विचार चलनी नाणे ठरले होते. अनेक कामगार संघटना त्यांच्या या विचाराने प्रभावित होऊन त्यांच्या सोबत जोडल्या गेल्या होत्या. डॉक्टरांनी मात्र कामगारांच्या हिताचेच नेहमी निर्णय घेतले. त्यांचे लढे यशस्वी झाले तर कधी फेलही ठरले. त्यांच्यावर अनेकदा मालकांशी साटेलोटे केल्याचे आरोपही झाले. परंतु त्यात काही तथ्य नव्हते. त्यांच्या सोबत असलेल्या कामगारांना व पदाधिकाऱ्यांना डॉक्टर असे काही करतील यावर विश्वास नव्हता. खरे तर तसे करण्याची डॉक्टरांना गरजही नव्हती. घाटकोपरमध्ये अतिशय उत्तम सुरु असलेली डॉक्टरकी सोडून ते या चळवळीत पडले होते. या सर्व पार्शभूमीवर 81 साली गिरणी संप सुरु होण्याच्या आसपास दादा सामंत त्यांच्यात सामिल झाले. दादा गिरणीत कामाला असल्याने त्यांना या धंद्याची इत्थंबूत माहितीही होती. परंतु सख्ये भाऊ असूनही दादा व डॉक्टरांचे स्वभाव अतिशय भिन्न होते. संघर्ष हा डॉक्टर सामंतांचा आत्मा होता, तर दादा सामंत हे डॉक्टरांच्या मागे राहून सर्व युनियनची कार्यालयीन कामे करीत. गरज पडल्यास कोर्टातली कामे करणे, कामगारांना सोडविण्यासाठी लागणारी कुमुक पोहोचविणे, प्रसिध्दी पत्रके काढणे अशी कामांची जबाबदारी दादांची असे. डॉक्टरांच्या सभेत ते उपस्थित असत, परंतु क्वचितच ते व्यासपीठावर दिसत. डॉक्टरांना पुरेशी अशी महत्वाची माहिती पुरविणे व युनियनचा इतर डोलारा सांभाळणे हे काम ते मोठ्या पोटतिडकीने करीत. मिलमध्ये ते व्यवस्थापक असल्याने त्यांच्या कामात शिस्त असे, यातून अनेक कार्यकर्ते दुखावतही. परंतु डॉक्टर त्यांच्यात समेट घडवून आणत व सर्वाना बरोबर घेऊन जात. दादा युनियनमध्ये सामील झाल्यापासून डॉक्टरांवरील कामाचा बोजा खूप कमी झाला होता. दादांची निष्ठेने व मेहनतीने शिस्तबध्द पध्दतीने काम करण्याची सवय युनियनन्सला फायदेशीर ठरत होती. युनियन्सचा पसारा जसा वाढत गेला तशा दादांच्या जबाबदाऱ्याही वाढल्या. त्यात ते कधी कामगार आघाडीचे उपाध्यक्ष झाले ते समजलेही नाही. एवढे महत्वाचे पद असूनही कामगार व कार्यकर्त्यांना खरा आधार हा डॉक्टर सामंतांचाच वाटत असे. शेवटी त्यांनी केलेल्या कामामुळे व लढाऊ वृत्तीमुळे वलय होतेच. हे वलय दादांना कधीच लाभले नाही. दादांमध्ये एक छुपा पत्रकारही होता. डॉ. सामंतांच्या युनियनच्या वतीने श्रमिक योध्दा हे साप्ताहिक प्रसिध्द केले जाई. त्यांनी त्या साप्ताहिकाचा चार्ज आपल्याकडे घेतला व त्याचे स्वरुपच पालटून टाकले. केवळ त्यांच्या युनियन्सचेच नाही तर जागतिक पातळीवरील कामगारांच्या लढ्याचे यात प्रतिबिंब उमटलेले असे. त्यामुळे ते एक कामगारांचे परिपूर्ण साप्ताहिक वाटे. हे साप्ताहिक त्यांनी जवळपास 11 वर्षे चालविले. डॉक्टर सामंतांच्या खूनानंतर कामगार आघाडी पोरकी झाली. ही संघटना केवळ एका व्यक्तीवर आधारित असल्याने डॉक्टरांच्या पश्यात ती चालविणे कठीणच होते. दादांनी काही काळ नेतृत्व करण्याचा प्रयन केलाही परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. डॉक्टर सामंत असताना जे ग्लॅमर या संघटनेला होते ते काही पुढे टिकले नाही, टिकवणेही कठीणच होते. त्यात दादांचाही काही दोष नव्हता. शेवटपर्यंत दादा काही मोजक्या युनियन्सची कामे करीत. मात्र गेली दोन दशके फारसे ते प्रकाशझोतातही नव्हते. युनिन्सची कामे करीत, परंतु डॉक्टरांच्या नंतर सर्व लयास गेले होते. दादा सामंत हे गेल्या 70 वर्षाच्या इतिहासाचे साक्षीदार होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतरचा व उदारीकरणानंतरचा काळ अनुभवला होता. या दोन्ही काळातील मालकांचे व्यवस्थापन व कामगार चळवळीत झालेल्या बदलांचे ते साक्षीदार होते. दत्ता सामंतासारखे ते काही प्रभावी वक्ते नव्हते, परंतु युनियन्सचा डोलारा सांभाळण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. मुळातच ते व्यवस्थापनातील असल्यामुळे त्यांची मानसिकता ही थोडीफार वेगळीच होती. त्याचा काही प्रमाणात युनियन्सला फायदा होई, मात्र दत्ता सामंतांच्या पश्चात नेतृत्व देण्यात ते अपयशी ठरले. कामगार संघटनेत त्यांनी कामाला सुरुवात मोठ्या निष्ठेने केली व ती निष्ठा त्यांनी शेवटपर्यंत जपली हे त्यांचे मोठेपण होते. दादांची इतिहासात एक व्रत्रस्त कामगार नेते म्हणून नोंद होईल.


0 Response to "व्रत्रस्थ दादा सामंत"
टिप्पणी पोस्ट करा