
देवभूमीतील यशस्वी लढाई...
24 May 2020 मोहोरसाठी चिंतन
देवभूमीतील यशस्वी लढाई...
गॉडस् ओन कंट्री असा ज्या राज्याचा उल्लेख केला जातो ते देवभूमी केरळ हे राज्य जगात पर्यटनासाठी गोव्याच्या खालोखाल लोकप्रिय आहे. परंतु आज हे राज्य कोरोनाची लढाई यशस्वी लढण्यात अग्रेसर ठरल्यामुळे सर्वांच्या चर्चेत आले आहे. येथील आरोग्यमंत्री के.के. शैलजा ज्यांना शैलजा टिचर म्हणून सर्व राज्य ओळखते त्यांनी कोरोनाची ही लढाई वेळीच ओळखून त्यादृष्टीने आपली आखणी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे ही लढाई केव
ळ प्रशासनाच्या खांद्यावरुन लढविली जाऊ शकत नाही तर त्यात लोकसहभाग आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले व हे युध्द कसे लढायचे याचा रोडमॅप तयार केला. आज केरळात चार महिन्यानंतर जेमतेम 500 रुग्ण आहेत व मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ चार. केरळच्या या लढाईचा अभ्यास करुन अन्य राज्यांनीही त्याचे अनुकरण करणे आवश्यक आहे. देशातील पहिला रुग्ण केरळात 20 जानेवारीला आढळला होता. चीनमधील हुवान प्रांतात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यास याची लागण झाली होती. केरळातील मोठ्या संख्येने विद्यार्थी चीनमध्ये उच्चशिक्षण घेतात. बहुतांशी विद्यार्थ्यांना आता केरळाने आपल्या घरी बोलाविले देखील आहे. पहिला रुग्ण केरळात आढळताच शैलजा टिचर यांनी कोरोनाचा अभ्यास केला, त्यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली मार्गदर्शक तत्वे अभ्यासली व त्यादृष्टीने त्यांनी आपल्या लढाईची व्यूहरचना आखली. दोन व्यक्तीतील अंतर राखणे, स्वच्छता ठेवणे हेच त्यावर उपाय आहेत. त्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम गाव पातळीवरील आरोग्य यंत्रणा सज्ज केली. केरळात गाव पातळीवर अतिशय उत्तम आरोग्य केंद्र आहेत तसेच प्रत्येक तालुका पातळीवर रुग्णालय व सुसज्ज रुग्णालय जिल्हा पातळीवर उभारण्यात आले आहे. केरळची ही आरोग्य यंत्रणा गेल्या तीन दशकात उभारण्यात आली आहे. केरळची लोकसंख्या तीन कोटी तीस लाख एवढी आहे व या लोकंसख्येसाठी पुरेशी आरोग्य यंत्रणा येथील सरकारने उभारली आहे. केरळात सध्या मार्क्सवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे सरकार आहे, तर पर्याय म्हणून कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीचे सरकार असते. बहुदा आलटून पालटून या दोघांचे सरकार येत असते. मात्र सरकार कोणाचेही असो आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात येथील सत्तेवर असलेले सरकार व तेथील लोकप्रतिनिधी दक्ष असतात. याचा मोठा फायदा आता कोरोनाच्या लढाईत झाला. केरळाने 20 जानेवारीला पहिला रुग्ण सापडल्यावर राज्यातील चारही आन्तरराष्ट्रीय विमानतळ सील केले व येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी सुरु केली. जरा जरी एखाद्या प्रवाशाच्या बाबतीत शंका आली तरी त्याला क्वॉरंटाईन केले गेले. त्याचबरोबर त्यांनी तामीळनाडू व कर्नाटक या दोन्ही राज्याच्या सीमा सील केल्या. तेथून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात येऊ लागली. त्यामुळे कोरोनाचा राज्यातील प्रसार पहिल्या टप्प्यातच रोखला गेला. शैलजा टीचर यांनी गावोगावी भेटी देऊन या रोगाचे नियंत्रण कसे करावयाचे याचे गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. लाखो पत्रके मातृभाषेत छापून जनतेत वाटण्यात आली. त्यामुळे जनतेला या रोगाविषयी कसे लढायचे याचा अंदाज आला. शासकीय पातळीवर बैठका घेत असताना शैलजा यांनी पक्ष पातळीवरही बैठका घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना जागृत केले. त्यामुळे त्यांचीही फौज या युद्दात लढण्यासाठी तयार झाली. कोरोना रुग्णांना गावपातळीवरील आरोग्य केंद्रात किंवा गरज वाटल्यास घरीही क्वारंटाईन केले गेले. त्यात गावपातळीवर जागृती करुन लोकांकडेच हे क्वॉरंटाईन योग्यरित्या चालू आहे किंवा नाही याची जबाबदारी दिली. यातून लोकसहभाग वाढत गेला व लोकांमध्ये एक सामंजस्य निर्माण झाले. क्वारंटाईनमध्ये असलेले लोक बंधन पाळतात हे पाहाण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा म्हणजे जी.पी.आर.एस. यंत्रणेचा वापर केला. केरळातील या प्रयोगात आरोग्यमंत्र्यांनी शिक्षकांना मोठा संख्येने सहभागी करुन घेतले. शिक्षकांनीही शिक्षणाच्या कामाच्या व्यतिरिक्त हे काम आहे असे म्हणत तक्रार न करता देशसेवा म्हणून हे काम करण्यास सुरुवात केली. केरळ हे राज्य शंभर टक्के साक्षर आहे त्याचाही यासाठी उपयोग झाला. अशा प्रकारे ही लढाई लढत असताना अन्य मार्गही वापरले. दोघांजणांमधील अंतर राहावे यासाठी नामी शक्कल लढविली व छत्र्या वाटल्या. उघडलेल्या दोन छत्र्यांमधील अंतर हे दोन व्यक्तींमधील पुरेसे अंतर राखण्यास योग्य ठरते. सरकारने अशा प्रकारे छत्र्या निर्मीतीचे काम बचत गटांना देऊन त्या छत्र्यांचे वाटप केले. सध्या उन्हाळा असल्यामुळे छत्र्यांचा वापरही होऊ लागला. पुढे येणाऱ्या पावसाळ्यामुळेही या छत्र्यांचा वापर होणार आहे. अशा प्रकारे विविध युक्त्या लढवून कोरोनाचा मुकाबला करण्याचे धोरण आखले व त्यात केरळ राज्य यशस्वी झाले. आज देशातील सर्वात अत्यल्प कोरोनाग्रस्तांची संख्या असलेले ते राज्य ठरले आहे. केरळचे हे उदाहरण सर्व राज्यांनी आपल्या डोळ्यापुढे ठेऊन काम करण्याची वेळ आली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. केरळकडून आपल्यालाही शिकण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना हा आघाडीचा पक्ष सत्तेत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता पक्ष यंत्रणेलाही संबोधित करुन कोरोनाची लढाई कशी लढायची याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांकडे पक्ष यंत्रणा चांगली आहे, कॉँग्रेस सध्या अजूनही मरगळलेल्या अवस्थेत आहे. जर लोकांचा सहभाग या लढाईत अपेक्षीत असेल तर केवळ प्रशासनावर अवलंबून न राहाता त्यात पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांनाही सहभागी करुन घेणे गरजेचे झाले आहे. केरळचे हे काम खरोखरीच उल्लेखनीय आहे, परंतु दुर्दैव एकच आहे की, आपले पंतप्रधान कोरोनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पाचवेळा जनतेपुढे आले मात्र त्यांनी केरळची स्तुती सोडा त्यांचा उल्लेखही करणे टाळले. परंतु शैलजा टिचर यांच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. जगभरातून त्यांच्या मुलाखती घेण्यास पत्रकार उत्सुक आहेत. 63 वर्षीय शैलजा टिचर या विज्ञानाच्या शिक्षिका होत्या व त्यांनी आपला शिक्षकी पेशा सोडून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीपासून त्या माकपच्या पक्ष सदस्य आहेत व विद्यार्थी संघटनेपासून कार्यरत आहेत. लोकसहभागातून काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कार्याला आमचा सलाम!
0 Response to "देवभूमीतील यशस्वी लढाई..."
टिप्पणी पोस्ट करा