-->
संपादकीय पान बुधवार दि. ९ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
--------------------------------------
मुंबई महानगराला विविध आजारांचा विळखा
--------------------------------
मुंबई महानगर ही कष्टकर्‍यांची जशी आहे तशी पैसेवाल्यांचीही आहे. येथे कुणालाही रोजगार मिळतो, विसावा मिळतो. त्यामुळे या महानगराची लोकसंख्या आता एक कोटींच्यावर गेली आहे. परंतु येथील किमान स्वच्छताही पाळली जात नसल्याने अनेकदा येथे विविध साथींचे रोग झपाट्याने पसरतात. मुबंई महानगरपालिकेच्याही आता लोकसंख्येचा विचार करता अनेक बाबी आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. अगदी अलिकडचेच उदाहरण द्यावयाचे झाल्यास डासांवाटे पसरणार्‍या आजारांकडे विशेष लक्ष देण्याची मोहीम जागतिक आरोग्य परिषदेकडून मांडली जात असली तरी मुंबईसमोर क्षयरोगाचे आव्हान त्यापेक्षाही मोठे आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांनी होत असलेल्या एकूण मृत्यूंच्या दहापटीहून अधिक मृत्यू क्षयरोगामुळे होत असल्याचे गेल्या दोन वर्षांमधील आकडेवारीवरूप स्पष्ट होत आहे. स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालणारे व डासांच्या माध्यमातून संसर्गित होणारे मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनियासारख्या आजारांमुळे आशिया खंडात दरवर्षी लाखो लोक आजारी पडतात. या आजारांविरोधात जनजागृती करण्याची मोहीम या जागतिक आरोग्य दिनानिमित्त हाती घेण्यात आली.  पावसाळ्यात या आजारांची साथ व त्यामुळे होणारे मृत्यू हे मुंबई महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरत असली तरी त्यापेक्षाही मोठे आव्हान क्षयरोगाचे आहे. गेल्या काही वर्षांत क्षयरोगाचे निदान होण्याचे प्रमाणही वाढले आहे. २०१२ मध्ये ३०,८२८ तर २०१३ मध्ये ३१,७८९ तर एप्रिल २०१४ पर्यंत ५२१३ क्षयरोग रुग्णांची नोंद झाली. त्यातही दोन वर्षांत एमडीआर तसेच एक्सडीआर चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने क्षयरोगाचे बहुतांश औषधांना दाद न देणारे गंभीर रुप समोर येत आहे. २०१३ मध्ये २६१५ एमडीआर तर ९० एक्सडीआर रुग्ण होते. २०१४ मध्ये आतापर्यंत ५११ एमडीआर व २४ एक्सडीआर रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनियामुळे मुंबईतील पालिका रुग्णालयात दरवर्षी सरासरी दोनशे मृत्यू होतात. त्याचवेळी पालिकेच्या शिवडी येथील रुग्णालयात दररोज सरासरी सहा रुग्ण क्षयरोगाने दगावतात. संपूर्ण शहरातील मृत्यूंची आकडेवारी उघड झालेली नसली तरी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार संपूर्ण देशात दर तीन मिनिटांमध्ये क्षयरोगाचे दोन रुग्ण दगावतात. मखाजगी रुग्णालयातील रुग्णांच्या नोंदी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून वेळेत निदान, नियमित उपचार व सकस आहार यातून क्षयरोग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे महानगरपालिकेच्या क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. मिनी खेतरपाल म्हणाल्या.
शिवडी रुग्णालयातील कर्मचारी- महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील कर्मचार्‍यांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. डॉक्टर, नर्स, चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा एकूण १०१५ पैकी ४६ जणांना क्षयरोगाचा संसर्ग झाला आहे. त्यातील २३ कर्मचारी, डॉक्टर, नर्सना एमडीआर टीबी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. क्षयरोगाच्या या संसर्गामुळे या ठिकाणी काम करण्यास कर्मचारी तयार नाहीत. लहान मुले- लहान मुलांमध्येही क्षयरोग होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. सन २०१२ मध्ये १४ वर्षांखालील २३०६ मुलांना क्षयरोग असल्याची नोंद झाली. २०१३ मध्ये हीच संख्या २३९८ वर गेली. औषधांना दाद न देणार्‍या एमडीआर टीबीचा संसर्ग २२७ मुलांना झाल्याचे आढळले. मोठयांच्या तुलनेत लहान मुलांना क्षयरोग होण्याचे प्रमाण सात टक्के आहे. ही आकडेवारी पाहता मुंबई नगरी बडी बांका हे शब्द आता विसरुन जाऊन मुंबई नगरी आता विविध रोगांचे माहेरघर असे म्हणण्याची वेळ आली आहे.
--------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel