-->
संपादकीय पान मंगळवार दि. ८ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------
भाजपाच्या जाहिरनाम्याला राम मंदिराचा तडका
-------------------------
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाल्यावर त्याच दिवशी सकाळी अखेर भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द झाला. आज होणार, उद्या होणार असे करता करता अखेरच्या टप्प्यात निवडणुका सुरु होताना तो प्रसिध्द व्हावा यावरुन भाजपामध्ये किती सुसंवाद आहे त्याचे दर्शन होते. मंगळवारी रामनवमीच्या आदल्या दिवशी हा जाहीरनामा प्रसिध्द व्हावा या देखील एक विलक्षण योगायोग ठरावा. राम मंदिराच्या प्रश्‍नावरुन मुरली मनोहर जोशी व भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात एकमत होत नव्हते आणि त्यामुळेच हा जाहिरनामा प्रसिध्द होण्यात विलंब होत होता. खरे तर भाजपाने राम मंदीराचा प्रश्‍न हा आपल्यासाठी जेवणात जसे लोणचे लावून खातात त्याप्रमाणे आपल्याकडे ठेवला आहे. मोदी हे कट्टर हिंदुत्ववादी असले तरी त्यांना आता राम मंदीराचा प्रश्‍न उकरुन काढावा व त्यातून मुस्लिमांची मते गमवावीत असे वाटत नाही. मात्र मुरली मनोहर जोशी यांना मात्र हा प्रश्‍न जिवंत ठेवल्यास त्याचा राम मंदीराचा तडका आपल्याला हिंदू मते मिळण्यास उपयोग पडेल असे वाटते. मुस्लिम मते गेली तरी बेहत्तर असे त्याना वाटते. अर्थात भाजपामध्येे हे दोन प्रवाह सुरुवातीपासून आहेत. हिंदुत्वाद्यांमध्ये मवाळ व जहाल असे दोन मुकवटे असलेल्या व्यक्ती, नेते आहेत. मोदी खरे तर यातील जहाल गटाचा मुकवटा घेतलेले आहेत. मात्र सध्या आपण मवाळ चेहरा धारण करुन सत्ता मिळविण्यास प्राधान्य द्यावे असे त्यांना वाटते. कारण भाजपाला हिंदू-मुस्लिम तिढा उत्पन्न करुन दंगली माजविल्यास हिंदू मते एकवटतील व आपणाला ती मिळतील असे गेल्या दोन वर्षापासून वाटते. मात्र देशाच्या सुदैवाने असे काही झाले नाही. अलिकडेच मोदी यांचा उजवा हात म्हणून ओळखलेले गेलेले व गुजरात दंगलीत सहभाग असलेले अमित शहा यांनी मुझ्झफरनगर येथे भाषण करताना तुम्हाला बदला घ्यावयाचा असेल तर भाजपाला मते द्या असे आवाहन केले होते. अशा प्रकारचे आवाहन म्हणजे दंगली घडविण्यासाठी केलेले आवाहन ठरावे. अशा प्रकारे एखाद्या समाजाची माथी भडकाविणारी भाषा वापरुन किंवा व्हॉटस् ऍपवरुन कट्टरपंथीय मुस्लिमांची भाषणे पाठवून एक गठ्ठा मते कशी मिळतील याचा सुरु असलेला प्रयत्न अजून तरी काही यशस्वी झालेला नाही. परंतु सध्या निवडणुकीच्या काळात याचा धोका जास्त आहे. खरे तर राम मंदिराचा प्रश्‍न आता कालबाह्य झाला आहे. कालबाह्य या अर्थाने की, लोकांना आता राम मंदिर नको आहे. लोकांना विकास पाहिजे आहे. यापूर्वी त्यांनी राम मंदीराच्या प्रश्‍नावरुन भाजपाला निवडून दिले होते. साडे चार वर्षांची सत्ता उपभोगूनही राम मंदिराची विट ही उचलली गेली नाही. त्यामुळेे राम मंदिराचा प्रश्‍न हा आता काही सुटणार नाही आणि अयोध्येत राम मंदीर झाले किंवा न झाले तरी आपल्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही हे लोकांना आता पटले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या प्रश्‍नावर भाजपामध्ये मोठा खल होऊन त्याचा परिणाम म्हणून जाहिरनाम्याला विलंब होणे स्वाभाविक असले तरी त्यातून लोकांनी मात्र धडा घेतला आहे. अशा प्रकारे सत्तेत येण्यापूर्वीच जर यांच्यात एकमत नाही तर सत्तेत आल्यावर काय होणार असा सूर उमटला आहे. लोकांच्या दृष्टीने जो प्रश्‍न महत्वाचा नाही त्या प्रश्‍नावर भाजपाने बराच वेळ खल घातला आहे. विदेशी गुंतवणुकीसारख्या महत्वाच्या प्रश्‍नावर गरज भासेल, रोजगार वृध्दी होईल त्या क्षेत्रात परवानगी देण्याची डामडौल भूमिका घेतली आहे. दोन वर्षापूर्वी रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध करण्याची भूमिका यापुढेही कायम राहिल का, याबाबत कोणतेही स्पष्ट निवेदन नाही. भाजपाचे व कॉँग्रेसच्या  आर्थिक धोरणात काडीमात्र फरक नाही हे यावरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विदेशातील काळा पैसा देशात आणणार असा मोघम उल्लेख     या जाहिरनाम्यात आहे. परंतु हा पैसा नुसते आश्‍वासन देऊन येणार नाही. तर त्यासाठी नेमके कोणते उपाय भाजपा करणार आहे, त्याचा उल्लेख यात नाही. म्हणजे अशा प्रकारे पोकळ आश्‍वासने देण्यात आली होती. ज्याप्रकारे गेल्या वेळीही अडवाणी यांनी आम्ही सत्तेत आल्यास दाऊदला मुसक्या बांधून पंधरा दिवसात भारतात आणू अशी घोषणा केली होती. परंतु चार वर्षे गृहमंत्रीपदी राहूनही अडवाणी यांना काही दाऊलला अटक करता आली नाही. विदेशी पैशाच्या बाबतीतही असेच होऊ शकते. शहरी व ग्रामीण भागातील दरी दूर करणार तसेच प्रत्येकाला पक्के घर देणार अशी दोन फसवी आश्‍वासने भाजपाच्या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. ग्रामीण व शहरी भागातील दरी कमी करणार हा बोलण्यास सोपा विषय आहे परंतु ही दरी कमी करणे सोपी बाब नाही. त्यासाठी जी धोरणे आखली गेली पाहिजेत ती आखण्याची मानसिकता भाजपाची नाही. एकीकडे खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करायचे आणि दुसरीकडे ही दरी कमी करण्याची भाषा करायची म्हणजे दुहेरी वागणे झाले. भाजपाच्या या विलंब झालेल्या जाहीरनाम्यावर लक्ष टाकल्यास एक बाब स्पष्ट जाणवते ती म्हणजे कॉँग्रेसपेक्षा नेमके वेगळेपण यात आहे तरी काय? कॉँग्रेसच्याच विविध योजनांना वेगळा मुलामा देऊन साज चढविण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जाहीरनामा वाचून लोक भाजपाला मतदान करतील असे काही दिसत नाही.
------------------------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel