-->
पुण्यातील काळरात्र / पाकिस्तानची खुमखुमी

पुण्यातील काळरात्र / पाकिस्तानची खुमखुमी

शुक्रवार दि. 27 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
पुण्यातील काळरात्र
पुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. नुकत्याच आलेल्या सांगली, कोल्हापूरच्या पूराची आठवण यावी अशी स्थिती पुण्यात एकाच रात्री पडलेल्या तुफानी पावसामुळे होती. या पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण 11 जणांचे बळी घेतले आहेत. कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाने कहर केल्याने ही आपत्ती आली आहे. अलिकडच्या काळात पुण्यात अशा प्रकारचा पाऊस कधीच झाला नव्हता. रेसकोर्स जवळील चिमटा वस्ती भागात अनेक घरे पाण्याखाली गेली. याबाबत रात्री बाराच्या सुमारास लष्कराच्या दक्षिण कमांडला माहिती देण्यात आली. त्यानंतर जवानांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या भागातून 500 नागरिकांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच्याच सेंट पॅट्रिक चर्च येथे आणण्यात आलेे. दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरांत पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले आहे. पुणे-सातारा मार्गावर वेळू गावच्या हद्दीत पूरसदृष्य स्थिती आहे. तिथे एक ओम्नी कार वाहून गेली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुरंदर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नाझरे धरणातून सुमारे दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दक्षिण पुण्यात जोरदार पावसामुळे कात्रज तलाव भरून आंबिल ओढ्यातून पाण्याचा लोंढा आला. तलावाशेजारील लेक टाउन सोसायटीची भिंत कोसळल्याने इमारतींमध्ये पाणी शिरले. येथून दोन महिला पाण्यात वाहू लागल्या, तेव्हा त्यांना वाचविण्यात आले, तर पद्मावती येथील विवेकानंद पुतळ्याजवळ आंबिल ओढ्याची संरक्षक भिंत कोसळल्याने शेजारील सोसायट्यांमध्ये पाण्याचा लोंढा आला. गुरूराज सोसायटीमध्ये तर दुसर्‍या मजल्यापर्यंत पाणी चढल्याने घबराट उडाली. तसेच, तावरे कॉलनी, बागूल उद्यान, लक्ष्मीनगर या भागातही ओढ्याकाठी पाणी वाढू लागले. दांडेकर पूल परिसरातही काठावरच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे पोलिस आणि अग्निशामक दलाने नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले; तसेच राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनीही धाव घेऊन नागरिकांना मदत केली. या भागातील सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. शहराच्या चहूबाजूंनी असंख्य नागरिकांनी दूरध्वनी केल्याने अग्निशामक दलाचा दूरध्वनी सातत्याने खणखणत होता. तसेच, कोथरूड, सिंहगड रस्ता, दामोदर नगर, किरकटवाडी, अशा अनेक भागांमध्ये सोसायट्यांत प्रचंड पाणी शिरले. अनेक ठिकाणी पार्किंगमधील वाहने वाहून गेली. पुणे शहर व परिसरात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पाकिस्तानची खुमखुमी
आम्ही भारतावर हल्ला करु शकत नाही असे पाकचे पंतप्रधान इम्रान खान बोलले असतानाच दुसरीकडे मात्र पाकिस्तानी नौदलाने समुद्रात युद्ध सराव सुरू केला आहे. पाकिस्तान पुढील काही दिवस समुद्रात रॉकेट आणि क्षेपणास्त्राद्वारे युद्धसराव करणार आहे. या युद्धसरावामुळे भारत सतर्क असून, काही युद्धनौका, पानबुड्या, गस्तीवरील विमानांसह लढाऊ विमान तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या या हालचालीवर भारताची करडी नजर असून पाकिस्तान कोणतेही धाडस करणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न जागतिक पातळीवर नेण्याचा पाकचा प्रयत्न त्यांना काही यश देऊ शकलेला नाही. कारण या प्रश्‍नावर पाकच्या बाजूने ेकही देश उभा राहिला नाही. पाकिस्ताननं अनेकदा अणुबॉम्ब हल्ल्याची धमकीही दिली आहे. पाकिस्तानने धाडस केले तर, भारतीय सुरक्षा दले त्या परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानी सैन्य किंवा तेथील दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याचा धोका वाढला आहे. पाकिस्तानचा हा युद्ध सराव नियमित प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, त्यांचा विचार कधीही बदलू शकतो, असेही सांगण्यात आले असताना त्यावर विश्‍वास ठेवायचा कसा? पाकिस्ताननं उत्तर अरबी समुद्रातून जाणार्‍या मालवाहू जहाजांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून, 25 ते 29 सप्टेंबरपर्यंत बंदूक, क्षेपणास्त्र, रॉकेटद्वारे युद्धसराव सुरू राहील, असे म्हटले आहे. या कालावधीत पाकिस्तानच्या हालचालींवर भारताचे बारीक लक्ष असणार आहे. पाकिस्तानने कोणतेही धाडसी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल. भारतीय नौदल आणि हवाई दलाने तशी तयारी केली आहे, असे सांगण्यात आले आहे. पाकचा हा सराव नियमित असला तरीही सध्याच्या जागतिक पातळीवरील त्यांच्या अपयशानंतर याला विशेष महत्व आहे. पाकची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली असतानाही पाकची युध्दाची खुमखुमी काही संपलेली नाही असेच त्यांचे वर्तन आहे. पाक थेट युध्द सध्या तरी करु शकत नाही अशा स्थितीत भारताला धड शिकविण्याच्या उद्देशाने अतिरेकी पाठविण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. जगातून पाकला याबाबत विरोध होत असला तरीही पाक आपले वर्तन काही सुधारण्यास तयार नाही, असेच सध्याच्या सरावावरुन दिसते.
------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "पुण्यातील काळरात्र / पाकिस्तानची खुमखुमी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel