-->
संपादकीय पान गुरुवार दि. ०४ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
विचारांचा लढा विचारानेच करा
---------------------------------------
विचारांचा लढा हा विचारानेच केला पाहिजे, विचारांचा लढा हाणामारीतून किंवा संघर्षातून होता कामा नये याची पुन्हा एकदा प्रचिती महाराष्ट्राला आली. यापूर्वी गेल्याच वर्षी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातच भर रस्त्याच हत्या झाली होती. त्यावेळी देखील याच प्रतिगामी शक्तींनी दाभोलकरांच्या विचारांचा मुकाबला विचाराने होत नाही असे दिसल्यावर त्यांना संपविण्याचा डाव आखला. आता त्यापाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालयावर १० ते १५ अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. हा हल्ला भाजपप्रणित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व हिंदुत्त्ववादी संघटनांनी केला असल्याचा आरोप पक्षाचे नेते डॉ. अशोक ढवळे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या हल्यात तथ्यही आहे. या हल्याचा कडक शब्दात निषेध केला पाहिजे. कारण महाराष्ट्र या पुरोगामी राज्यात आता प्रतिगामी क्षक्ती मोठ्या प्रमाणावर डोके वर काढू लागल्या आहेत. हल्लेखोरांनी रसायन सदृश्य द्रव्य फेकल्याचाही दावा सी.पी.एम.चे नेते अजित अभ्यंकर यांनी केला. ऑफिसमधील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करण्यात आली असून, दोषींंवर कडक कारवाई करावी अशी मागणी अभ्यंकर यांनी केला आहे. सीपीएमचे राज्य सेक्रेटरी मिलिंद सहस्त्रबुद्धे यांच्या सांगण्यानुसार, हल्लेखोरातील काही लोक मराठीत बोलत होते तर काही लोक दक्षिण भारतीय भाषेत बोलत होते. ते दक्षिण भारतीय असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. केरळमध्ये आरएसएसच्या एका कार्यकर्त्यांची नुकतीच हत्या करण्यात आली आहे. याचबरोबर डाव्या पक्षांकडून संघाच्या कार्यकर्त्यांवर व संघ कार्यालयावर होणार्‍या हल्लाचा बदला म्हणून आम्ही तुमचे कार्यालय तोडून टाकत असल्याचे ते पुटपुटत होते. काही दिवसापूर्वी डाव्या पक्षाचे कार्यकर्ते व संघाच्या कार्यकर्त्यांत केरळमध्ये संघर्ष झाला होता. त्यातूनच हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपींना अटक करू असे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आल्यानंतर देशात हिंदुत्ववादी संघटनांच्या अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. विविध ठिकाणी धार्मिक विद्वेष पसरवण्याचे काम संघ परिवाराकडून आणि त्यांच्या हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे. पुणे पक्ष कार्यालावर हल्ला करत असताना आम्ही केरळ मधील हल्याचा बदला घेत आहोत असे या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी म्हटले. केरळमध्ये झालेल्या प्रकाराबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. केरळ पोलिस व तेथील न्याय व्यवस्था दोषींना शिक्षा करण्यास समर्थ आहेत. मात्र आम्ही केरळच्या प्रकरणाचा बदल घेत आहोत असे म्हणून पक्ष कार्यालायची तोडफोड करणे म्हणजे कायद्याला आव्हान देण्यासारखे आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कारवायांकडे राज्य सरकार गंभीरपणे पाहत नसल्यामुळे अशा विघातक संघटनांचे फावत आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास न लागणे हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. हिंदुत्ववादी संघटनानी पुणे पक्ष कार्यालयावर केलेला हा दुसरा भ्याड हल्ला आहे. देशात भाजप आणि संघ कार्यकर्त्याच्या फासिस्ट प्रवृत्तीविरोधात एकत्र येण्याचे आवाहन सर्व लोकशाहीवाद्यांना मार्क्सवाद्यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कम्युनिस्ट यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे, मात्र य दोघांतील लढा हा विचारांचा लढा आहे. त्याचा मुकाबला विचारानेच केला जावा. तसेच राज्यातील पुरोगामी शक्तींसाठी यातून एकप्रकारे इशाराच मिळाला आहे. राज्यातील विखुरल्या गेलेल्या पुरोगामी व सर्वधर्मसमभाव मानणार्‍या शक्तींनी आता तरी यानंतर एकत्र येऊन आगामी निवडणुकीत एकत्र लढा दिला पाहिजे आणि सध्या फोफावत चाललेल्या प्रतिगामी शक्तींना आटकाव केला पाहिजे. केंद्रात नरेंद्र मोदींच्या सरकारला सत्तेत जनतेने विकासाच्या मुद्यावर बसविले आहे. हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर लोकांनी मोदींना कौल दिलेला नाही. मात्र भाजपाची पितृसंघटना असलेल्या संघाने मात्र आपल्या हिंदुत्ववादी विचारांना कौल दिला आहे असे समजून मिजाशीत वावरण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच या विचारांचा पाडाव करण्याची गरज या हल्याच्या निमित्ताने झाली आहे.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel