-->
संपादकीय पान गुरुवार दि. ०४ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
कबड्डीचे नवे रुप स्वागतार्ह
-------------------------
सध्याच्या काळात कोणताही खेल लोकप्रिय व्हायचा असेल तर त्याच्या मागे सेलिब्रेटी असाव्या लागतात. एवढेच नव्हे तर त्याचे माध्यम नियोजन उत्कृष्ट असावे लागते आणि त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे कंपन्यांनी त्या खेळाला दत्तक घेतले पाहिजे. हा सध्याच्या काळातील कोणताही खेळ लोकप्रिय होण्यासाठी असलेला नियम आहे. क्रिकेटची लोकप्रियता गेल्या वीस वर्षात अशाच प्रकारे वाढत जाऊन आता एका सर्वोच्च पातळीवर येऊन ठेपली आहे. आता लोकांना क्रिकेटच्या खेळातील व्यापारीकरण नकोसे झाले आहे. आता मात्र कबड्डी या आपल्या खास देशी खेळाकडे कंपन्यांनी, सेलिब्रेटींनी आपला मोर्चा वळविल्याने हा रांगडा खेळ आता लोकप्रिय होण्याच्या मार्गावर आहे. एका दृष्टीने आपल्या या मैदानी खेळाकडे लक्ष उशीरा का होईना गेले याचे स्वागत झाले पाहिजेे. नुकत्याच आटोपलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेत, कबड्डीसारख्या अस्सल देशी, रांगड्या खेळाला एकदम चकचकीत कॉर्पोरेट रूप मिळालेे, हा खेळ इनडोअर खेळवणे, सोबत लखलखत्या बॉलीवूड सितार्‍यांची उपस्थिती, रंगीबेरंगी फ्लॅशलाइटची उधळण व स्टारसारख्या वाहिन्यांवर त्याचे थेट प्रक्षेपण यामुळे या खेळाची लोकप्रियता वाढली. हा खेळ एकदम सोशल मीडियात चर्चेत आला. एरवी फक्त क्रिकेट, फुटबॉल, टेनिस पाहणारा नव श्रीमंत मध्यमवर्ग या खेळाच्या बदललेल्या रंगामुळे त्याकडे वळला. कबड्डी खेळणार्‍या खेळाडूंना ग्लॅमर आले. क्रिकेटपटू, फुटबॉलपटूंप्रमाणे कबड्डीपटूंची नावे लोक लक्षात ठेवू लागले. अगदी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आणि युरोपातही या खेळाने आपल्या नव्या अवतारामुळे स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला. अन्य मैदानी खेळांपेक्षा कमी वेळेत आटोपणारे  सामने, निकालांची निश्चिती यामुळे या खेळाने प्रथमदर्शनीच तमाम विश्वाला जिंकले. या स्पर्धेचे खरे श्रेय चारू शर्मा यांना द्यायला हवे. कारण त्यांनी देशी खेळाबद्दल आदर या एकाच ध्यासापायी ही मोठी स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली. कबड्डीसारख्या दुर्लक्षित पण अस्सल देशी खेळाबद्दल आपल्या देशामध्ये नव्हे तर परदेशामध्येही कुतूहल निर्माण करणे, त्याचा आदर करणे, या खेळाला व खेळाडूंना प्रतिष्ठा, ओळख देणे, असे उदात्त हेतू उराशी बाळगून त्यांनी धाडसाने ही कल्पना मांडली.  वास्तविक कबड्डी खेळ हा छोट्याशा पटांगणात होत असला तरी या खेळाला स्वत:ची लय, वेग आहे. भरपूर व्यायाम, चापल्य, कौशल्य यांचा सुंदर मिलाफ कबड्डीमध्ये आढळतो. कबड्डी ऊर्फ हुतुतूचा व्यावहारिक अर्थ धांगडधिंगा. हा धांगडधिंगा या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यामध्ये दिसून आला. शत्रूच्या गोटात शिरून गनिमी काव्याने प्रतिस्पर्ध्याचा फज्जा उडवण्याची कला प्रेक्षकांनी उचलून धरली. प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळे डाव टाकणे, पटात शिरलेल्या खेळाडूला सफाईने घेरणे यातला रोमहर्षकपणा लोकांना टी.व्ही.वर पाहायला आवडला. पिळदार देहयष्टीचे खेळाडू, त्यांचे क्रीडाकौशल्य व श्वासावरचे त्यांचे नियंत्रण यावरची कॉमेंट्री प्रेक्षकांसाठी नवी होती. गेल्या काही वर्षांत ऑलिम्पिक, एशियाड व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी संस्मरणीय कामगिरी केल्याने असा देशी खेळ पाहणार्‍यांचा वर्ग निर्माण झाला असताना हाच वर्ग कबड्डीकडे खेचण्याचा आयोजकांचा प्रयत्न यशस्वी ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा स्पर्धा भरवताना पूर्वी बर्‍याच अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रो कबड्डी स्पर्धा वेगळ्या स्वरूपात कशी भरवता येईल, यावर आयोजकांनी बराच खल केला. आयोजकांनी आर्थिक लाभाचा मुद्दा बाजूला ठेवत देशी खेळाबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला, हे महत्त्वाचे आहे. नाहीतर कॉर्पोरेट कंपन्या पुरस्कृत खेळ म्हणजे नफाबाजी, असा दृष्टिकोन आपल्याकडे क्रिकेटने रुजवला आहेच. क्रिकेटचे बाजारीकरण करण्यात सगळ्यात मोठा वाटा कॉर्पोरेट कंपन्यांचाही आहे, हे ढळढळीत सत्य आहे. पण या दृष्टिकोनाला छेद देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने झाला, हे बरे झाले. महत्त्वाचे म्हणजे आज ही संकल्पना रुजली, लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. मीडियानेही त्याला चांगलेच डोक्यावर धरले आहे. सेलिब्रिटीज, अन्य खेळांतील प्रतिष्ठित खेळाडू, भारतातील मोठे उद्योगपती हिरिरीने या खेळाच्या प्रचारासाठी- प्रसारासाठी उतरले. उद्या ही संकल्पना अधिक विस्तारत जाईल यात शंका नाही. महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांच्या बरोबर कुस्ती व कबड्डीविषयी आस्था असणारे अनेक जण आहेत. या सर्वांना सरकारने आतापासून पाठबळ देणे गरजेचे आहे. या खेळासाठी मैदाने उपलब्ध करून देणे, शालेय जीवनात असे देशी खेळ सक्तीचे करणे, यांसारखे उपाय योजता येऊ शकतात. या खेळातील खेळाडूंसाठी नोकर्‍या उपलब्ध करून देणे, खेळाची लोकप्रियता वाढवणे, त्यासाठी निधी उपलब्ध करणे सरकारला सहज शक्य आहे. प्रत्येक वर्षी फक्त व्यावसायिक स्पर्धा नव्हे तर त्या राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, विद्यापीठ व शालेय स्तरावर खेळवणे महत्त्वाचे आहे. कबड्डीलाही हे रूप देणे फारसे अवघड, अशक्यप्राय नाही. कारण या खेळाचा पाया भारतीय आहे. उद्योजकांनी, व्यावसायिकांनी, श्रीमंतांनी या अस्सल भारतीय खेळाच्या विकासासाठी हातभार लावल्यास एक नवा खेळ जगाला मिळेल. त्यादृष्टीने प्रो कबड्डी हे एक उत्तम पाऊल पडले असे म्हणता येईल. आजवर कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात लोकप्रिय होताच. शहरातही अनेक मोजक्या भागात खेळला जात होता. परंतु एक दुर्लक्षीत खेळ म्हणून याकडे पाहिले जात होते. खरे तर आपल्याकडे लोकप्रिय असलेल्या क्रिकेटपेक्षा कितीतरी जास्त चुरस, उत्सुकता या खेळात आहे. आता त्याला ग्लॅमर प्राप्त झाल्यावर याची जाग अनेकांना आली. कबड्डी खेळाला भविष्यात अच्छे दिन येणार हे खरे आहे.
----------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel