-->
युध्द करण्यापूर्वी...

युध्द करण्यापूर्वी...

सोमवार दि. 04 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
युध्द करण्यापूर्वी...
नुकताच एका वीरसैनिकाच्या पत्नीचा ऑडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात त्यांनी मोठ्या कळकळीने सर्व राजकीय पक्षांना सध्या सीमेवर सुरु असलेल्या तणावांचे राजकीय भांडवल करु नये असे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांची ही कळकळ आपण समजू शकतो. राजकीय नेते याचे भान पाळतील का, याची शंका आहे. गेल्या पंधरा दिवसात सोशल मिडिया तसेच चॅनेल्सवर जो अतिरेक चालला आहे तो थांबविण्याची आवश्यकता आहे. आपम देशभक्ती समजू शकतो, परंतु टी.आर.पी. मिळविण्यासाठी जो बातम्यांचा अतिरेक सुरु आहे त्याला आळा घालण्याची गरज आहे. यातून लोकांची रक्त सळसवून अराजक निर्माण होण्याची शक्यताच जास्त आहे. पाकिस्तानला धडा शिकवणे व त्याासाठी त्यांच्या अतिरेकी तळांवर बॉम्बवर्षाव करणे वेगळे व युध्दाची भाषा करणे वेगळे. युध्द हे जसे पाकिस्तानला परवडणारे नाही तसेच ते आपल्यालाही नाही. भारताच्या बॉम्बवर्षांवानंतर पाकिस्तान जेरीला आला आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु युद्दखोरीची भाषा करणे व त्यातून युध्द करणे हे सोपे नाही. एक बॉम्ब टाकावा आणि पाकिस्तानला उडवून टाकायचे हे बोलण्याइतके सोपे नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात मैत्री ही फायदे बघून केली जाते आणि शत्रुत्व हे सगळ्या गणितांचा विचार करुनच निभवले जाते. युद्धाची आरोळी ठोकताना होणारे परिणाम आणि त्याची चुकवावी लागणारी किंमत याचाही विचार करावा लागतो. भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाचा इतिहास पाहिल्यास आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये चार वेळा  युद्ध झाली. पहिले युद्ध झाले 1948 साली झाले त्यावेळी भारताचे 1 हजार 104 जवान शहीद झाले तर पाकचे 1 हजार 500. दुसरे युद्ध 1965 साली  झाले त्यावेळी भारताचे 3 हजार 264 जवान शहीद झाले तर पाकचे 3 हजार 800. तिसरे युद्ध झाले त्यावेळी 1971 साली भारताचे 3 हजार 843 जवान शहीद झाले तर पाकचे 7 हजार 900. चौथे कारगिलचे युद्ध 1999 साली झाले तेव्हा भारताचे 522 जवान शहीद झाले तर पाकिस्तानचे 696. या युद्धांमध्ये किती नागरिक मारले गेले आणि काय नुकसान झाले याची तर गणतीच नाही. चार युद्ध झाली चारही आपण जिंकली पण प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे युद्दाने प्रश्‍न सुटतोच असे नाही. 2001 साली संसदेवर हल्ला झाला तेव्हाही भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय लष्कराला तर स्टँड ऑफचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात कुठलेही युद्ध झाले नाही. मात्र सीमेजवळ दोन महिने इतके सैन्य उभे ठेवण्यासाठीच भारताला सुमारे 600 दशलक्ष डॉलर म्हणजेच सात हजार कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला. पाकिस्तानकडे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली हत्फ आणि घोरी ही जमिनीवरुन मारा करणारी बॅलिस्टीक मिसाईल आहे, ज्याच्या कक्षेत भारतातील दिल्ली, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, पुणे बंगळुरु, मुंबई आणि चेन्नई ही शहरे येतात. या शहरावरचा हल्ला झालाच तर विध्वंस भयानक असेल. हे आपल्याला परवडणारे नाही. पूर्वीची युद्ध ठराविक भागात लढली गेली, पण आता युद्धाच्या कक्षेत भारतातली अनेक शहरे येऊ शकतात. अमेरिकेतील एका अहवालानुसार, पाकिस्तानजवळ 140 ते 150 अणुबाँम्ब असू शकतात. तर भारताकडे 130 ते 140 च्या आसपास आहेत. जर युद्धच झाले आणि आण्विक युद्धाला तोंड फुटले तर काय होईल? धर्मांध असलेल्या पाकिस्तानच्या नेतृत्वाने मुंबईसारख्या लाखो-करोडोंची वर्दळ असणार्‍या आपल्या शहरावर एखादा अणुबॉम्ब टाकला तर.? याचे उत्तर म्हणून आपणही त्यांच्यावर अणूबॉम्ब टाकू. परंतु यातून एकमेकांना संपविण्याची चढाईच सुरु होईल. खोट्या राष्ट्रप्रेमाच्या युद्धखोरीपायी लाखो निष्पाप नागरिक मारले जातील. त्यामुळे युद्द हे दोन्ही देशांना परवडणारे नाही. युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या अभ्यासानुसार भारत-पाक युद्धात दोन्ही देशांनी त्यांच्या एक तृतीयांश न्युक्लीअर बॉम्बचा वापर केला तरी 2 कोटींपेक्षा जास्त नागरिक पहिल्याच आठवड्यात मरतील. ही संख्या दुसर्‍या महायुद्धात मारल्या गेलेल्यांच्या अर्धी आहे. यात अर्धा ओझोनचा थर नष्ट होईल. ज्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शिरकाव थेट पृथ्वीच्या वातावरणात होईल. त्यामुळे कॅन्सरसारख्या अनेक आजारांबरोबर पृथ्वीच्या तापमानात प्रचंड वाढ होईल. जेवढे भारतीय या युद्धात मरतील त्यांची संख्या 2015 पर्यंतच्या नऊ वर्षात भारतावर झालेल्या दहशवादी हल्ल्यात जेवढे नागरिक आणि सैनिक मारले गेले, त्याच्या 2,221 पटींनी जास्त असेल. युद्धखोरीची भाषा करणारी माध्यमे आणि लष्कराशी संबंध नसलेले जे करमणूक म्हणून युद्धाकडे बघतात अशांनी या सर्व बाबींंचा थंड डोक्याने विचार करणे गरजेचे आहे. यासाठी कूटनीती स्तरावर आपण पाकिस्तानला जेरीस आणू शकतो, आर्थिक कोंडी करु शकतो. पाकिस्तान विरोधात नुकतेच 40 देश आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र आले आहेत. नाक दाबलं की तोंड उघडतं अशी म्हण आहे, त्याधर्तीवरच आपल्याला पाकिस्तानसोबत करावे लागेल. पण युद्ध हा पर्याय मात्र नक्कीच नाही.
--------------------------------------------------------------

0 Response to "युध्द करण्यापूर्वी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel