-->
सलाम इस्त्रो

सलाम इस्त्रो

संपादकीय पान गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
सलाम इस्त्रो
भारतीय अवकाश संशोधन केंद्र (इस्त्रो)ने बुधवारी अवकाशात एकाचवेळी भारतीय उपग्रह कार्टोसेट-2 डीसह 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करुन विश्‍वविक्रम केला. इस्त्रोच्या या अतुलनीय कामगिरीबदंदल त्यांना सलाम. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा केंद्रातील स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या मदतीने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी उपग्रह अवकाशात झेपावले. त्यानंतर पूर्वनिर्धारित मार्गक्रमण करत सर्वच्या सर्व उपग्रह अवकाशात निश्‍चित स्थानी स्थानापन्न करण्यात इस्त्रोला यश आले. पृथ्वीपासून 500 किलोमीटर दूरवर उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. हे उपग्रह सोडण्याची अंतिम तयारी कालपासून सुरु झाली होती. मंगळवारी सकाळी 5 वाजून 28 वाजता 28 तासांचे काउंटडाऊन सुरु करण्यात आले होते. या मिशनमध्ये भारताच्या तीन आणि अमेरिकेतील खासगी संस्थेच्या 96 उपग्रहांचा समावेश आहे. याशिवाय इस्त्राइल, कझागिस्तान, नेदरलंड स्विर्त्झलंड आणि यूएईचा प्रत्येकी एक उपग्रह यात आहे. यापूर्वी रशियाने 37 उपग्रह एकावेळी प्रक्षेपित करून विक्रम स्थापित केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या नासाने 29 उपग्रह एकावेळी प्रक्षेपित केले होते. मात्र आता भारताने या सर्वांचा विक्रम मोडून 104 उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा एक नवा विक्रम केला आहे. चार महिन्यांपूर्वी अमेरिका, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीने इस्रोच्यावतीने एकाच वेळी 83 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा करार केला होता. यात अमेरिकेचे दोन मोठे उपग्रह देखील होते. मात्र डिसेंबरात अमेरिकेने करार रद्द केला. जानेवारीमध्ये अमेरिकेने इस्त्रोला 20 नॅनो उपग्रह प्रक्षेपित करायचे आहेत, असे सांगितले होते. त्यामुळे उपग्रहांची संख्या वाढत 104 झाली. भारताने उपग्रह स्वबळावर अवकाशात सोडण्याचे तंत्रज्ञान विकसीत करुन आता त्याला दोन दशकाहून जास्त काळ लोटला आहे. त्यानंतर यात सुधारणा करीत इस्त्रोने यात उत्तंग भरारी मारली आहे. या सर्व उपग्रहांना कक्षेत स्थापित करण्यासाठी 29 मिनिटे लागली. त्यातही शेवटची 9 मिनिटे सर्वात महत्वाची होती. 16 व्या मिनिटाला रॉकेटचा चौथा आणि शेवटचा भाग वेगळा झाला. इस्त्रोचे एक केंद्र मॉरिशसमध्ये आहे. मॉरीशसपासून पुढे निघाल्यानंतर उपग्रहांची माहिती 9 मिनिटे खंडीत होईल. कारण त्यापुढे इस्त्रोचे केंद्र नाही. मात्र ही सर्व प्रकेरिया सुरळीत पार पडली आहे. पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपणाचा खर्च 100 कोटी रूपये आहे. इस्त्रोनेे या उपग्रहांंसाठी 200 कोटी रूपयांचा करार केला. त्यामुळे जवळपास 100 कोटींची बचत होणार आहे. एकूण वार्षिक नफ्याच्या ही 50% रक्कम आहे. आजवर एकाच वेळेस 100 उपग्रह प्रक्षेपित करण्याचे धाडस जगातील कोणत्याच देशाने केलेले नाही. उपग्रह लहान असो वा सुक्ष्म. पण त्याला त्याच्या कक्षेत स्थापन करणे हे खूप कठीण असते. पी. एस. एल. व्ही.ने आपल्या उदरातून 101 उपग्रह अवघ्या 600 सेकंदात प्रक्षेपित केले. तब्बल 27000 किमी प्रति तास म्हणजे एखाद्या विमानाच्या 40 पट वेगाने प्रवास करताना हे सगळे उपग्रह एकमेकांना टक्कर होऊ न देता प्रक्षेपित करणे किती गुंतागुंतीच आणि किती कौशल्य त्यात लागू शकते ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. परंतु इस्त्रोने ही अवघड बाब शक्य करुन दाखविली आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पात इस्त्रोसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्के जादा निधी देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच दोन महत्वाच्या मोहिमांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यातील एक मंगळ मोहिमेचा समावेश आहे. पाहिले मंगळ मिशन आपण एकट्यानेच केले होते. दुसर्‍या वेळेस फ्रांस ने ह्या मोहिमेत भागीदारी उचलली आहे. भारताची पहिली मंगळ मोहिम यशस्वी झाल्याने दुसर्‍या मोहीमेसाठी फ्रान्सने सहकार्य करण्याच ठरविले आहे. त्याचबरोबर दुसरी मोहीम शुक्राची हाती घेण्यात येणार आहे. शुक्र या ग्रहाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. यासाठी नासाचे एक शिष्टमंडळ भारताच्या दौर्‍यावर येऊन गेले होते व त्यांनी या मोहिमेबाबत भारताशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. भविष्यातील या सर्व मोहिमांना आजच्या घटनेमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बळ लाभले आहे. त्यामुळे भारताचा या क्षेत्रातील विश्‍वास आणखीनच व्दिगुणीत झाला आहे. पृथ्वीभोवती सध्या 1100 च्या आसपास उपग्रह फिरत आहेत. आता 104 उपग्रहांची बर पडल्यामुळे अवघ्या तब्बल 10% टक्क्यापेक्षा जास्तीने उपग्रहांमध्ये वाढ होणार आहे. यातून या मोहिमेचे महत्व लक्षात येते. भारताच्या ह्या वाढत्या दबदब्यामुळे अमेरिकेतील अनेक प्रक्षेपण करणारे खासगी उद्योजक चिंतेत पडले आहेत. कारण त्यांच्या अत्यधुनिक तंत्रज्ञानापेक्षाही इस्राकडून घेण्यात येणारा उपग्रह प्रक्षेपण खर्च निम्म्याहून कमी आहे. ज्या पद्धतीने इस्रो एकामागून एक वेगळ्या मोहिमा आखत आहे त्यातून तब्बल 135 बिलियन अमेरिकन डॉलर किमतीच्या बाजारपेठेतील भारताचा हिस्सा झपाट्याने वाढतो आहे. आजच्या मोहिमेतून अर्धा खर्च आधीच प्रक्षेपणातून इस्रोने वसूल केला आहे. ह्यामुळे राष्ट्रीय संपत्तीची खूप मोठी बचत झाली आहे. आता या घटनेमुळे इस्त्रोमध्ये एक नवा विश्‍वास, उत्साह व नव्या जोमाने काम करण्याची जिद्द निर्माण झाली आहे. इस्त्रो भविष्यात असे अनेक उपक्रम हाती घेऊल व देशाचे नाव जगात या क्षेत्रात अग्रस्थानी नेऊन ठेवेल यात काहीच शंका नाही.
------------------------------------------------------

0 Response to "सलाम इस्त्रो"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel