-->
रत्नागिरी हापूसला फटका

रत्नागिरी हापूसला फटका

संपादकीय पान बुधवार दि. 15 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
रत्नागिरी हापूसला फटका
गेल्या आठवडयात पारा 11 ते 14 अंशांपर्यंत घसरल्याने त्याचा फटका आंब्याला बसला आहे. या कालावधीतील कमाल व किमान तपमानातील फरक सरासरीपेक्षा अधिक होता. थंडीमुळे पुन्हा मोहोर आला आहे. याचा परिणाम म्हणून कैरी गळून गेली आहे. सुमारे 80 टक्के फळगळ झाल्याने मार्चअखेरीस येणारे उत्पादन मोठया प्रमाणात घटणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या 10 टक्के मोहोराला झालेल्या फळधारणेवरच बागायतदारांची धुरा आहे. एप्रिलनंतर बाजारात येणार्‍या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने या वर्षीचा हंगाम फारसा काही समाधानकारक नसेल अशी अपेक्षा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला पोषक वातावरण होते. यंदा चांगला आंबा बाजारात येईल अशी अपे7ा व्यक्त होत होती. आंब्याला मोहोरही चांगला आला. सुरुवातीच्या टप्प्यातील उत्पादन चांगले मिळाले आहे. नुकतीच पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे 25 पेटया बाजारात दाखल झाल्या. 4 हजार ते 8 हजार रुपये पेटीला दर मिळत आहे; परंतु थंडीचा जोर जानेवारीतही कायम राहिल्याने आंब्याबाबत चित्र काही समाधानकारक नाही. कैरी लागलेल्या ठिकाणी मोहोर नव्याने आला. उन्हामुळे सुपारीएवढी झालेली कैरी गळून गेली आहे. त्यातून मार्चच्या दुसर्‍या आठवडयात उत्पादन मिळाले असते. आंबा फळाला 16 अंश सेल्सिअसखाली तापमान चालत नाही. या वेळी 11 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. परिणामी थंडीचा कडाकाही कायम राहिला. सध्या आलेल्या मोहोराचे उत्पादन एप्रिलमध्ये मिळणार आहे. मार्चमध्ये अवघे 10 टक्केच उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. सध्या मार्केटमध्ये कर्नाटक, केरळमधील आंब्याची आवक सुरू झाली आहे. ती पुढे वाढतच जाईल. त्याचे आव्हान रत्नागिरी हापूसपुढे असून दरावर त्याचा परिणाम होतो. यंदा कोकणाचा हा राजा ग्राहकांच्या जिभेवर जाण्यासाठी वेळ लागेल व खिशालाही फटका बसेल असे दिसते.
-------------------------------------------------------------

0 Response to "रत्नागिरी हापूसला फटका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel